SINDKHED RAJA

TYPE : GADHI/ NAGARKOT

DISTRICT : BULDHANA

HEIGHT : 0

GRADE : EASY

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा हे तालुक्याचे शहर आहे. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेलेले हे ठिकाण राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतील मुख्य ठिकाण होते. सिंदखेडराजा येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गढीत जिजाऊचा जन्म झाला त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व आहे. सिंदखेडराजा गावात राजे लखोजीराव जाधव यांच्या गढीबरोबर काळा कोट , रंगमहाल , निळकंठेश्वर मंदिर, सजना बारव, रामेश्वर मंदिर , लखुजी जाधव व त्यांच्या पुत्रांच्या समाधी, पुतळा बारव , चांदनी तलाव आणि मोती तलाव या सारख्या अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत. सिंदखेडराजा शहर बुलढाणा शहरापासुन ८० कि.मी.अंतरावर तर जालना शहरापासुन केवळ ३० कि.मी. अंतरावर आहे. सिंदखेडराजा गावाच्या मध्यभागात असलेली हि गढी पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळात प्रवेश शुल्क भरून गढीत जाता येते. ... गढीबाहेर नव्याने विकसित केलेल्या उद्यानात जिजामातेचा पुर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. गढीची दगडी तटबंदी साधारण १५ फुट उंच असुन फांजीवरील भाग विटांनी बांधला आहे. गढीचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन नक्षीकामाने सजवलेले आहे. दरवाजाची इमारत तीन मजली असुन वरील भागात सज्जा व नगारखाना आहे. इ.स. १५७६ साली बांधलेल्या या गढीच्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. देवड्यामधुन दरवाजावरील भागात जाण्यासाठी जिना आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच सहा फुट उंचीचे राजवाड्याचे जोते पहायला मिळते. कधीकाळी दुमजली असलेल्या या राजवाड्याचे आज केवळ जोते शिल्लक आहे. पुरातत्त्व खात्याने आत मोठया प्रमाणावर संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. राजवाड्याच्या जोत्यावर जाण्यासाठी कोपऱ्यात पायऱ्या असुन जोत्यावर चढले असता जोत्याच्या पश्चिम दिशेला दोन टोकाला दोन खोल्या आहेत. यातील दुसऱ्या टोकाला म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशेला असलेली खोली जिजामाताचे जन्मस्थान आहे. या खोलीत जिजामाता आणि लहानग्या शिवबाचा पुतळा बसवलेला आहे. वाड्याच्या चौथऱ्याखाली तळघर असुन या तळघरात हवा व प्रकाश जाण्यासाठी वाडयाच्या मध्यभागी असलेल्या चौकात झरोके ठेवलेले आहेत. तळघरात जाण्यासाठी जोत्यावर चार ठिकाणी जीने आहेत. या जिन्याने खाली उतरल्यावर तळघरात एका बाजुस खोल्या असुन तळघराच्या भिंतीत कोनाडे आहेत. तळघर पाहून परत वाड्याच्या जोत्यावर यावे. जोत्यावरून गढीच्या अंतर्गत भागात नजर फिरवली असता गढीच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या कोपऱ्यात गोलाकार विहीर पहायला मिळते. गढीचे दोन भाग पडलेले असुन एका भागात राहण्याची सोय म्हणजे राजवाडा तर दुसऱ्या भागात दरबार व कचेऱ्या असाव्यात. या दोन्ही भागांना वेगळे ठेवणारी प्राकारभिंत असुन या भिंतीत घोडयाची पागा असावी. एका उंच चौथऱ्यावर असलेल्या दरबाराच्या वास्तुचे पुरातत्व खात्याने मोठया प्रमाणात संवर्धन केले आहे. या वास्तुच्या मागे असलेल्या तटबंदीच्या कोपऱ्यात दोन दालने असलेले कोठार पहायला मिळते. या ठिकाणी आपली गढीची फेरी पूर्ण होते. गढी पाहुन बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर मेहकरच्या दिशेने दोन मिनीटे चालत गेल्यावर रस्त्याच्या समोरील बाजुस एक लहान रस्ता आत जाताना दिसतो. या रस्त्याच्या टोकाला आत एका शेतामध्ये अतिशय सुंदर अशी पण आज पुर्णपणे उध्वस्त झालेली पुष्करणी आहे. या पुष्करणीत आतील बाजुस खूप मोठया प्रमाणात गजशिल्पे तसेच सुरसुंदरी कोरल्या आहेत. पुतळा बारव आवर्जुन पहावी अशीच आहे. येथुन परत फिरून मुख्य रस्त्याने जालनाच्या दिशेने दहा मिनिटे चालत गेल्यावर तिसऱ्या गल्लीत आपल्याला काळाकोट व रंगमहाल पहायला मिळतो. रंगमहाल पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण निळकंठेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरासमोर एक पुष्करणी असुन हि पुष्करणी सजना बारव म्हणुन ओळखली जाते. हि बारव राजे रावजगदेवराव जाधव यांनी बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात एक भलेमोठे तुळशी वृंदावन तसेच शेषशायी विष्णूची भग्न झालेली मुर्ती आहे. मंदिराचा खालील भाग घडीव दगडांनी बांधलेला असुन वरील भाग विटांनी बांधलेला आहे. मंदिराचे सभागृह बंदीस्त असुन मधील चौकात कोरडी पडलेली विहीर आहे दरवाजाच्या उजवीकडे मंदिराच्या भिंतीत आपल्याला कोरीव शिलालेख पहायला मिळतो. निळकंठेश्वर पाहुन पुढे रामेश्वरकडे जाताना वाटेत काही समाधी व उघडयावर असलेल्या मुर्ती पहायला मिळतात. ऱामेश्वर मंदिर काळ्या पाषाणात एका चौथऱ्यावर बांधलेले असुन मंदिराच्या आवारात काही तुळशी वृंदावन आहेत. रामेश्वर मंदिराशेजारी इस्लामी शैलीत बांधकाम असलेली लखुजीराजे जाधवांची , त्यांचे पुत्र आणि नातवाची भव्य समाधी आहे. या समाधीच्या आवारात इतर लहानमोठया सात समाधी आहेत. या शिवाय गावात इतर अनेक लहानमोठया वास्तु पहायला मिळतात. सिंदखेडराजाचे मुळ नाव कोणते याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते सिंदुराज राजाने वसवलेल्या या गावाचे कालांतराने सिंदखेड झाले असावे तर काहींच्या मते गावाभोवती विपुल प्रमाणात सिंदीची झाडे असल्याने सिंदखेड नाव पडले असावे. पण नीळकंठेश्वर मंदिरातील शिलालेखावर असलेला परगणे सिद्पूमर उल्लेख पहाता सिद्पूमरचे सिंदखेड व जाधव राजांचे गाव म्हणून सिंदखेडराजा असे झाले असावे. सिंदखेडराजा शहरात असलेली पुतळाबारव म्हणजेच सुरसुंदरीची शिल्पे असलेली पुष्करणी पहाता या शहराचा इतिहास अकराव्या शतकापर्यंत मागे जातो. त्यानंतर बहमनी काळात अलाउद्दीन अहमद (कारकीर्द.१४३६– ५८) या सुलतानाने १४५० मध्ये तेथील काजीस हा परगणा जहागीर म्हणून दिला पण नंतरच्या काळात सिंदखेड येथे मुळे घराण्याची सत्ता दिसुन येते. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे असताना गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवाना १५७६ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. लखुजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गढी बांधली तसेच बाजारपेठ वसवली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या. लखुजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी झालेला जिजाऊचा जन्म व इ.स. १६१० मध्ये शहाजीराजांशी झालेले त्यांचे लग्न अशा दोन महत्वाच्या घटना सिंदखेडराजा येथे घडल्या. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. लखोजीराजे यांचे बंधु राजे भुतजी /जगदेवराव यानी इ.स.१६३० ते इ.स.१६४० दरम्यान त्यांच्या समाधीचे बांधकाम केले. हि समाधी आजही सिंदखेडराजा येथे पहायला मिळते. राजे लखुजी यांचे नातु रावजगदेवराव जाधवराव यांनी इ.स.१६९० दरम्यान आपला कारभार सिँदखेडराजा येथुन देऊळगावराजा येथे हलवल्याने सिँदखेडराजाचे महत्व कमी होऊन देऊळगावराजाचे महत्व वाढीस लागले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!