SINDHUDURG

TYPE : SEA FORT

DISTRICT : SINDHUDURG

HEIGHT : 0

GRADE : EASY

भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंशी लढण्यासाठी जलदुर्गाचे महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. यातील एक अत्यंत महत्वाचा जलदुर्ग म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग !!! सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळखच या किल्ल्याच्या नावाने होते. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मालवण बंदर गाठावे लागते. सिंधुदुर्ग किल्ला ज्या कुरटे बेटावर वसला आहे ते बेट मालवण बंदरापासुन १ कि.मी. आत समुद्रात आहे. मालवण बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी नियमीत बोटसेवा आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पुर्व दिशेस बांधलेले असुन अगदी जवळ जाईपर्यंत ते दिसत नाही. कुरटे बेटावर या किल्ल्याचा परिसर साधारण ४८ एकरवर पसरलेला असुन तटबंदीची लांबी साधारण तीन कि.मी. आहे. तटाची उंची साधारण ३० फुट असून रूंदी १२ फूट आहे. या संपुर्ण तटबंदीत एकुण ५२ बुरुज असून चढउतार करण्यासाठी ४५ जिने आहेत. ... किल्ल्याच्या तट-बुरुजांवर बंदुका व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या आहे. नौकेतुन तटाजवळ उतरल्यावर वक्राकार तटबंदीतून आत शिरल्यावर गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. शिवकालीन दुर्गरचनेचा हा दरवाजा आजही सुस्थितीत आहे. महादरवाजावर नंतरच्या काळात विटांनी बांधलेला नगारखाना असुन दरवाजाजवळ एक तुटकी तोफ पडलेली आहे. दरवाजासमोर एक छोटेसे घुमटीवजा मंदिर असुन त्यात दगडात कोरलेला हनुमान आहे. येथुन तटबंदीवर गेल्यावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा पहायला मिळतात. तटबंदीवरून फिरताना आपल्याला दोन घुमट्या पहायला मिळतात. गडाच्या बांधकाम करतेवेळी शिवाजी महाराज गडावर आले असता ओल्या चुन्यावर महाराजाच्या डाव्या पायाचे व उजव्या हाताचे ठसे उमटले होते व त्यावरच ह्या घुमट्या उभारण्यात आल्या आहेत. २१ नोव्हेंबर १७६३ ला संभाजी महाराजांच्या पत्नी जिजाबाई यांनी लिहीलेल्या पत्रात या ठशांवर घुमटी व कोनाडा बांधून त्यांची दररोज पूजाअर्चा करण्याची व नैवेदय दाखविण्याची आज्ञा केली होती. महादरवाजातून आत आल्यावर बांधीव पायवाटेने सरळ जाताना जरीमरी देवीचे लहानसे मंदिर दिसते. यात एक शिलालेख असुन त्यात १८८१ मध्ये हे मंदिर बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. गडाच्या मध्यभागी शिवराजेश्वर म्हणजेच शिवाजी महाराजांचे मंदीर असुन छत्रपती राजाराम महाराजांनी या मंदिराची बांधणी इ.स.१६९५ मध्ये केली. या मंदिरात महाराजांची वीरासनातील दाढी नसलेली व नावाड्याची टोपी घातलेली मुर्ती आहे. या मुर्तीची पुजाअर्चा संकपाळ घराण्याकडे असुन मुर्तीवर असलेला मुखवटा व वस्त्रे यामुळे मुळ मुर्ती पहाता येत नाही. मंदिरात शिवरायांची म्हणुन एक चार फुट लांबीची तलवार दाखवली जाते. या मंदिराच्या मागील भागात महादेवाचे मंदिर असुन या मंदिराच्या आत चौकोनी आकाराची खोल बारव आहे. या मंदिरात नंदी तसेच शिवलिंग आहे. मंदिराच्या परीसरात दुधबाव, दहीबाव व साखरबाव या नावाच्या तीन गोड्या पाण्याच्या खोल विहिरी आहेत. या विहीरींना चौकोनी आकाराची तटबंदी असुन या विहीरचा वापर गडावरील लोक पिण्याच्या पाण्यासाठी करतात. दहीबाव व साखरबाव जवळजवळ असुन दुधबाव राजवाड्याच्या अवशेषाजवळ आहे. ह्या विहीरींच्या पुढे एका मोठया वाड्याचे जोते आहे. याशिवाय पाण्याची अतिरिक्त गरज पुर्ण करण्यासाठी गडावर तट बांधण्यासाठी दगड काढल्याने निर्माण झालेला तलाव आहे. याशिवाय किल्ल्यावर महापुरुष मंदिर आहे. राजवाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून अलिप्त असा उंच बुरुज आहे. हा बुरुज दर्याबुरुज/निशाणकाठी बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर इ.स.१८१२ पर्यंत मराठ्यांचा २८ फूट उंच भगवा ध्वज फडकत होता. समुद्रातुन दुरपर्यंत हा ध्वज सहजपणे नजरेस पडत असल्याने या ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. या बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव असुन बुरुजाच्या मागील बाजुस काही अंतरावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर पडल्यावर चंद्रकोरीच्या आकाराची लहानशी पुळण लागते. ह्या जागेस राणीची वेळा म्हणतात. या दरवाजाच्या समोरील बाजूस चुन्याचा घाणा आणि चुना साठवण्याचे हौद पहायला मिळतात. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही येथे पहायला मिळतो. चुन्याच्या घाण्याच्या बाजूला असलेल्या जिन्याने फ़ांजीवर चढुन पुढे गेल्यावर बुरुजात असलेली खोली पाहायला मिळते. फ़ांजी वरुन चालत चोरदरवाजा पुढे आल्यावर तटबंदीत असलेली हनुमानाची मुर्ती दिसते. फ़ांजीवरून पुढे चालत गेल्यावर एक वाट भगवती देवीच्या मंदिराकडे जाते. भगवती देवीचे मंदिर कौलारू असुन मंदीरात उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात तलवार घेतलेली भवानीमातेची सुंदर मुर्ती आहे. मंदिर पाहून परत फ़ांजीवर येऊन किल्ल्याच्या प्रवशव्दाराकडे चालत जाताना प्रवेशव्दारपासून चौथ्या बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने थेट समुद्रात उतरता येत असे. आज हा दरवाजा दगडांनी चिणून बंद करण्यात आला आहे. पुन्हा फ़ांजीवर येऊन पुढे चालत गेल्यावर पुढच्या बुरुजाच्या भिंतीवर गणपती कोरलेला आहे. त्यापुढे असलेल्या बुरुजाला दुहेरी तटबंदी असुन हा चिलखती बुरुज आहे. येथून मुख्य दरवाजाकडे आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला व्यवस्थितपणे पहाण्यासाठी तीन तास लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन इतिहास थोडाबहुत स्पष्ट करणारे काही शिलालेख अलीकडील काळात सापडले आहेत. नेरूर येथे सापडलेल्या चालुक्यकालीन शिलालेखावरुन प्राचीन काळी या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असावी असे अनुमान काढता येते. कोकणचा हा भाग मराठयांच्या ताब्यात येण्यापुर्वी या भागावर आदिलशाही राजवट होती. इ.स. १६५७ मध्ये जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य ताब्यात घेऊन आणि अफझलखानाला मारून शिवाजीमहाराज सैन्यांसह कोकणात उतरले. शिवरायांनी कोकणावर स्वारी करून कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतली. कल्याण बंदरात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा शुभारंभ केला आणि तेथे नव्या युद्धनौका बांधण्याचे काम हाती घेतले. युद्धनौका बांधण्याचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पदरी अनेक पोर्तुगीज कारागीर कामाला ठेवले. त्यांच्या माहितीचा वापर करून घेत आधुनिक युरोपीय पद्धतीच्या जहाजांची निर्मिती चालू केली. आदिलशहाची ठाणी काबीज करून महाराज मालवण किनाऱ्यावर आले तेव्हा कोकणची स्थिती भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे अत्याचार, जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, मंदिरांची तोडफोड, स्त्री-पुरूषांना पकडून परदेशात गुलाम म्हणून केली जाणारी विक्री हा कोकण प्रांतातला नेहमीचा प्रकार होता. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळाकभिन्न खडक असलेले बेट सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधमासाठीसाठी निवडले गेले. भूमीपूजनाचा मुहूर्त काढण्यासाठी मालवण गावचे वेदशास्त्रसंपन्न जानभट अभ्यंकर यांना आमंत्रित केले गेले. मालवण समुद्रकिनाऱ्यावर ज्या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले त्या ठिकाणाला मोरयाचा धोंडा म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली. या ऐतिहासिक दगडावर गणपती, चंद्र, सूर्य, शिवलिंग यांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. या ठिकाणी विधिवत गणेशपुजन व सागरपुजन करत सागराला नारळ अर्पण करून किल्ल्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर शिवाजी महाराज नौकेतून कुरटे बेटावर गेले. त्यांनी तिथे मार्गशिर्ष शके १५८६ व्दितीय म्हणजे २५ नोव्हेंबर १६६४ रोजी किल्ल्याच्या मुहूर्ताचा पहिला दगड बसविला व किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेल्या सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठमोठे चिरे बसवण्यात आले. तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमा, शके १५८९, म्हणजे २९ मार्च १६६७ या दिवशी सिंधुदुर्गाचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद सापडते. शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे 'चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार। चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले। या किल्ल्याच्या वास्तुशांती प्रसंगी महाराज स्वत: उपस्थित होते. महाराजांनी सर्व कारागिरांना भरघोस पारितोषिके वाटली. विशेष कामगिरीबद्दल सोन्या-रुप्याची कडीदेखील वाटली गेली. स्थपती हिरोजी इंदुलकर ह्याने किल्ल्याचे बांधकाम केले तर गोविंद विश्वनाथ प्रभू हा ह्या किल्ल्याच्या बांधकामाचा मुख्य स्थपती होता. शिवाजी महाराज स्वतः ह्या बांधकामात विशेष लक्ष देत होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्लेबांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत. हिरोजीला त्यानी लिहीलेल्या पत्रातून बारीकसारीक गोष्टींमधे असलेले त्याचे लक्ष व आग्रह आपल्याला दिसतो. महाराज एका पत्रात लिहितात आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे. अवघे काम चखोट करणे. पाया योग्य घेणे. पायात ओतण्यासाठी शिसे धाडावयाची व्यवस्था केली असे. नीट पाहोन मोजोन माल कह्यात घेणे. वाळू धुतलेलीच वापरणे, चुनकळी घाटावरोन उटण पाठवित आहो. रोजमुरा हररोज देत जाणे. त्यास किमपी प्रश्नच न ठेवणे आणि सदैव सावध रहाणे. किल्ल्याच्या बांधकामासाठी सुरत लुटून मिळविलेली संपत्ती खर्च केली. शत्रूंकडून किल्ल्याच्या बांधकामास व्यत्यय येऊ नये यासाठी महाराजांनी काही सैन्य येथे तैनात केले. या गडाच्या निर्मितीमुळे पश्चिम सागरावर मराठयांचे साम्राज्य प्रस्थापीत झाले. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. छ.शिवाजी महाराजांच्या तसेच छ. संभाजीराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात असताना इ. स. १७१३ मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला. शाहू आणि ताराबाई यांच्यातील वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराराणींकडे आला. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी २८ जानेवारी १७६५ रोजी सिंधुदुर्ग किल्ला ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले फोर्ट ऑगस्टस. कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठयांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली व त्याच्या मोबदल्यात १७९२ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे करवीरच्या छत्रपतींना काही अटींवर परत दिला आणि मालवणला वखार घालण्यास संमती मिळविली. १८१२ मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चाच्यांचा बंदोबस्त केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!