SIDDHGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : THANE
HEIGHT : 3215 FEET
GRADE : HARD
मुंबई –ठाणे परिसरात एका दिवसाच्या भटकंतीसाठी अनेक गडकिल्ले आहेत. यात मुरबाड तालुक्यातील मुरलेल्या भटक्यांचा देखील कस काढणारे ठिकाण म्हणजे भीमाशंकर डोंगररांगेतील सिद्धाचा डोंगर उर्फ सिद्धगड. या किल्ल्याशेजारी असलेला गोरखगड किल्ला भटकंतीसाठी प्रसिद्ध असला तरी सिद्धगडाकडे मात्र भटक्यांची पाऊले फारच कमी प्रमाणात वळतात. भीमाशंकर अभयारण्यामुळे गर्द झाडी व घनदाट अरण्यात असलेला हा किल्ला मुंबई पासुन १२० कि.मी.अंतरावर तर ठाण्यापासुन फक्त ८० कि.मी.अंतरावर आहे. गडाच्या उत्तर बाजुला नारिवली गाव तर दक्षिण बाजुला बोरवाडी गाव असुन या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. कल्याण-मुरबाड-म्हसा-नारीवली–उचले-धापटपाडा असा एक गाडीमार्ग असुन हे अंतर ६० कि.मी.तर कल्याण-मुरबाड-म्हसा–जांभूर्डे-बोरवाडी या दुसऱ्या गाडीमार्गाचे अंतर ७० कि.मी.आहे. नारिवली गावाच्या दिशेने सार्वजनिक वाहनांची सोय असल्याने बहुतांशी भटके नारिवली गावाकडून गडावर जाणे पसंद करतात.
...
सोबत जीपसारखे खाजगी वाहन असल्यास आपण नारिवली गावापुढील उचले गावातुन धापटपाडा गाठु शकतो. यामुळे चालण्याचे अंतर साधारण तासाभराने कमी होते. धापटपाडा व बोरवाडी येथुन गडावर जाणाऱ्या वाटा मळलेल्या असल्या तरी धापटपाडा मार्गे जाताना पावसाळ्यात या मार्गावर असलेल्या धबधब्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असल्याने या मार्गाला दोन ठिकाणी धबधब्यावर जाण्यासाठी फाटे आहेत. या फाट्यावर चुकण्याची शक्यता असल्याने वाटचाल सुरु करण्यापुर्वी धापटपाडा गावातुन वाट समजुन घ्यावी. सिद्धगड किल्ला माची व बालेकिल्ला असा दोन भागात विभागला असुन माचीवर सिद्धगडवाडी हे १०-१२ घरांचे गाव वसले आहे. या वाडीतील लोक खाली गावात ये-जा करत असल्याने वाट चांगली मळलेली आहे. नारिवली अथवा बोरवाडी येथुन माचीवरील सिद्धगडवाडीत जाण्यास तीन तास व तेथुन बालेकिल्ल्यावर जाण्यास दीड तास लागतो. उचले गावातुन चालत धापटपाडा गाठण्यास अर्धा तास लागतो. तेथुन मळलेल्या वाटेने १० मिनिटात आपण गावामागील पठारावर पोहोचतो. येथुन समोर पहिले असता उजवीकडे मुख्य डोंगरापासून सुटावलेला एखाद्या जहाजासारखा दिसणारा सिद्धगड, डावीकडे आहुपे तर मध्यभागी धमधम्याचा डोंगर दिसतो. येथे एक झोपडे असुन येथुन उजवीकडील वाट धबधब्याकडे तर डावीकडील वाट माचीवर सिद्धगडवाडीत जाते. या दोन्ही वाटा मळलेल्या आहेत. येथुन अर्ध्या तासाची चढाई करून आपण दुसऱ्या झोपडीपाशी येतो. या झोपडीकडुन १० मिनीटे चालत गेल्यावर पुन्हा एक वाटेला फाटा असुन तैलरंगाने रंगवलेला बाण आहे. हा फाटा व बाण सहजपणे दिसत नाही. येथुन सरळ जाणारी वाट धबधब्यासाठी जाते तर डावीकडील वाट गडाच्या माचीवर जाते. येथुन पुढील वाट मात्र प्रशस्त व मळलेली असुन चुकण्याची शक्यता नाही. या वाटेने वर चढत अर्ध्या तासात आपण ओढयाचे पात्र ओलांडुन पलीकडे जातो व गडाच्या बांधीव वाटेला सुरवात होते. या वाटेने वर चढत जाताना उजवीकडे एका ठिकाणी सपाटीवर कातळात खोदलेले पाण्याचे लहानसे टाके दिसते. हे टाके पाहुन पुढे आल्यावर गडाचे पडझड झालेले बांधकाम दिसते. विखुरलेल्या या अवशेषात अनेक घडीव दगड असुन या ठिकाणी दरवाजाचा अडसर कोरलेले दगड पहायला मिळतात. उजवीकडील कातळावरून वाहुन येणारे पाणी वाटेवर येऊ नये यासाठी या भागात कड्याखाली ओबडधोबड दगडांचा नाला बांधलेला आहे. या कड्यावर अर्धवट खोदलेले पाण्याचे एक टाके असुन डावीकडील कड्यावर पाण्याचे दुसरे टाके खोदलेले आहे. डावीकडील टाक्याकडे जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे सर्व बांधकाम पहाता या भागात गडाची चौकी अथवा दरवाजा असण्याची शक्यता आहे. येथुन पुढे दहा मिनिटात बांधीव पायवाटेने आपण गडाच्या माचीवरील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजात पोहोचतो. दरवाजाची डावीकडील तटबंदी झाडीने झाकोळली असुन उजवीकडे घडीव दगडात बांधलेली तटबंदी पहायला मिळते. दरवाजाच्या अलीकडे डाव्या बाजुला दिसणारी वाट बोरवाडीतुन आलेली वाट आहे. दरवाजातुन आत न जाता सर्व प्रथम बोरवाडीच्या वाटेला लागावे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर डावीकडे झाडीत लपलेली एक कोरीव समाधी पहायला मिळते. या समाधी शेजारी दिवा लावण्यासाठी लहानसा कोरीव स्तंभ आहे. या समाधीशेजारी मातीत गाडलेला समाधीचा दुसरा चौथरा आहे. या समाधी पाहुन पुढे पठारावर आल्यावर अजुन दोन घडीव समाधी पहायला मिळतात. पठाराच्या काठाने दरीच्या दिशेने फेरी मारली असता टोकावर तटबंदीच्या पायासाठी खोदलेले चौकोनी व गोलाकार आकाराचे मोठमोठे खळगे पहायला मिळतात तर काही ठिकाणी रचीव दगडांची ढासळलेली तटबंदी दिसते. या ढासळलेल्या तटबंदीतुन बोरवाडीकडे जाणारी वाट दिसते. येथुन मागे फिरून पुन्हा दरवाजाकडे यावे. दरवाजाच्या आतील बाजुस देवडीचा चौथरा असुन आतील पाणी वाहुन जाण्यासाठी बाहेरील बाजुस दगडी पन्हाळ बांधलेले आहेत. दरवाजातुन आत येऊन काही अंतर पुढे गेल्यावर डाव्या बाजुस उंचवट्यावर एक मंदीर पहायला मिळते. मंदीर असलेल्या या उंचवट्याच्या खालील भागात दोन विरगळ पहायला मिळतात. येथुन पुढे आल्यावर उजवीकडील झाडीत चौकोनी आकाराच्या व चारही बाजुस कोरलेल्या अजुन दोन विरगळ पहायला मिळतात. येथुन पुढे सरळ जाणारी वाट सिद्धगडवाडीत जाते तर डावीकडे वळलेली वाट उंचवट्यावरील नारमातेच्या देवळाकडे जाते. उंच चौथऱ्यावर बांधलेले हे देऊळ पुरातन असुन गाभाऱ्यात नारमातेची तांदळा स्वरूपातील मुर्ती आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी दोन बाजुस घडीव दगडांच्या पायऱ्या असुन मंदिराचा गाभारा व त्याच्या दोन बाजुस असलेली ओसरी यात २०-२५ जणांची राहण्याची सोय होईल. मंदिराच्या आवारात १८-२० विरगळ मांडलेल्या असुन प्राचीन मंदिराचे काही अवशेष पहायला मिळतात. मंदिराशेजारी उघडया चौथऱ्यावर दोन शिवपिंड, दोन नंदी, गणेशमुर्ती, भैरवमुर्ती व इतर काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. या चौथऱ्याशेजारी दगडावर तोंड फुटलेली तोफ ठेवलेली आहे. मंदिराचा परीसर पाहुन झाल्यावर आल्या वाटेने मागे फिरावे व मुळ वाटेने सिद्धगडवाडी कडे निघावे. या वाटेवर डावीकडे एका उंच खडकावर दगडी भांडे कोरलेले आहे. दगडी भांडे पाहुन पुढे आल्यावर पुन्हा एक वाट डावीकडे झाडीत जाताना दिसते. या वाटेने आत गेल्यावर आठ दहा दगडी गोळे व एका झाडाखाली दगड रचुन त्यात ठेवलेला तांदळा पहायला मिळतो. येथुन मागे फिरून पुन्हा सरळ रस्त्याने निघाल्यावर आपला सिद्धगडवाडीत प्रवेश होतो. धापटपाडा येथुन सुरवात केल्यापासुन माचीवर येण्यास ३ तास लागतात. सिद्धगडवाडी म्हणजे १०-१२ घरांची वस्ती असुन येथे महादेव कोळी जमातीचे लोक राहतात. गावात प्रवेश करताना डावीकडे एक शाळा असुन या शाळेत १५-२० जणांची राहण्याची सोय होते. वाडीतील मातीची काही घरे जुन्या घरांच्या घडीव चौथऱ्यावर बांधलेली आहेत. माचीवर पावसाळी पाणी साठविण्याचा एक तलाव व दोन विहिरी असुन या दोन्ही विहिरीचे पाणी गावकरी पिण्यासाठी वापरतात. सिद्धगडवाडीतुन बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दिड तासांचा उभा चढ असल्याने व गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने वाडीतुन पुरेसे पाणी सोबत घेऊनच चढाईची सुरवात करावी. वाडीत शिरण्यापुर्वी अलीकडेच डाव्या बाजुला झाडीत बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. सुरवातीची वाट दाट झाडीतुन जाणारी असल्याने व फारशी मळलेली नसल्याने वाडीतून वाट समजुन घ्यावी किंवा वाटेच्या सुरवातीला काही काळ वाटाड्या सोबत घ्यावा. या वाटेने अर्ध्या तासाची थकवणारी चढाई केल्यावर नव्याने बांधलेली एक समाधी पहायला मिळते. बारकाईने पाहिल्यास हि समाधी गडाच्या वाटेवर असलेल्या चौकीच्या चौथऱ्यावर उभारलेली आहे. येथुन १० मिनीटे चढुन गेल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस कड्यात कोरलेली एक गुहा पहायला मिळते. गुहेचा तोंडाकडील भाग घडीव दगडांनी बंदीस्त केला असुन त्यात दरवाजा बांधलेला आहे. गुहेत जाण्यासाठी एकावर एक दगड रचुन पायऱ्या बनविल्या आहेत. गडाच्या वाटेवर मुक्काम करायचा झालास १५-२० लोकांना या गुहेत राहता येईल. गुहेच्या दोन्ही बाजुस कातळात कोरलेली पाण्याची २-२ म्हणजे एकुण ४ टाकी असुन यात डाव्या बाजुचे एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेसमोरून गडाची माची, गोरखगड व आहुपे डोंगराचे सुंदर घडते. येथुन पुढे कातळातील पायवाट,पायऱ्या,पुन्हा पायवाट पुन्हा पायऱ्या असा अर्ध्या तासाचा चढ चढत आपण बालेकिल्ल्याखाली पोहोचतो. या ठिकाणी वाटेवरच पहारेकऱ्यासाठी खोदलेली एक लहान आकाराची गुहा पहायला मिळते. या गुहेच्या डावीकडुन कातळात कोरलेल्या पायऱ्या चढुन नंतर पायवाट व त्यानंतर ३०-३५ बांधीव पायऱ्या असा प्रवास करत आपण बालेकिल्ल्याच्या तटाजवळ पोहोचतो. तटाजवळ मध्यम आकाराचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. किल्ल्याचा या भागात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन भग्न तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. निमुळत्या आकाराचा गडमाथा समुद्रसपाटीपासुन २१७० फुट उंचावर असुन साधारण ४ एकरवर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. गडावर प्रवेश केल्यावर समोरच दगडी नंदी असुन त्यासमोर कडयाच्या काठावर कातळात कोरलेले शिवलिंग ठेवलेले आहे. बालेकिल्ल्याचे दोन भाग पडलेले असुन उजवीकडे तटबंदीने बंदीस्त केलेल्या भागात मोठया प्रमाणात वाड्यांचे अवशेष असुन डावीकडील लांबलचक भाग सोंडेच्या दिशेने निमुळता होत गेला आहे. डावीकडुन माथा फिरायला सुरवात केल्यावर सुरवातीस एका रेषेत कातळात कोरलेली ३ टाकी पहायला मिळतात. यातील शेवटचे टाके काही प्रमाणात बांधकाम केलेले आहे. या टाक्यांच्या पुढील भागात डोंगर उतारावर ४ टाक्यांचा समुह दिसतो. यातील १ टाके बुजलेल्या अवस्थेत असुन उर्वरित ३ टाक्यात पाणी असले तरी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहुन पुढे ५ मिनिटांची वाटचाल केल्यावर एका ठिकाणी १५ फुटांचे सोपे प्रस्तरारोहण करून आपण सोंडेच्या खालील भागात उतरतो. या ठिकाणी भगवा झेंडा रोवलेला आहे. याच्या पुढील भागातील सोंडेची तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीत २ बुरुज पहायला मिळतात. सोंडेच्या टोकावर साधारण ४० फुट उंचीचा मोठा बांधीव बुरुज असुन या बुरुजात गडावरून खाली उतरण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. हा बुरुज जवळ जाईपर्यंत दिसुन येत नाही. दरवाजाची चौकट व कमान आजही शिल्लक असुन दरवाजाचा तळातील ४-५ फुट उंचीचा भाग दगड टाकुन बंद करण्यात आला आहे पण यातुन बाहेर जाता येते. या दरवाजाच्या वाटेने काही अंतर खाली उतरता येते पण पुढची वाट मात्र वापरात नसल्याने पुर्णपणे मोडलेली आहे. बुरुजावर मशाल रोवण्यासाठी असलेले घडीव दगड पहायला मिळतात. बुरुजाच्या समोरील बाजुस टेकडीवर कातळात कोरलेली पाण्याची २ कोरडी पडलेली टाकी दिसतात. गडमाथ्याचा डावीकडील भाग पाहुन झाल्यावर पुन्हा माथ्यावर प्रवेश केलेल्या ठिकाणी येऊन उजवीकडील भाग पहाण्यास सुरवात करावी. सोंडेचा हा भाग तटबंदीने बंदीस्त केला असुन आत जाण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी ओवऱ्या आहेत. तटबंदीच्या आतील भागात एक ढासळलेला बुरुज पहायला मिळतो. या भागात मोठया प्रमाणात वास्तुचे चौथरे असुन डावीकडील उतारावर कातळात कोरलेले पाण्याचे लहान टाके आहे. यातील एका चौथऱ्यावर रचलेले दगड पहाता या ठिकाणी बहुदा मंदीर असावे. गडाच्या या टोकावर चौकीच्या पडक्या भिंतीचे अवशेष पहायला मिळतात. या भागातुन भीमाशंकर, पदरगड, जांभुर्डे धरण, कोथळागड, माथेरान, प्रबळगड, पेब, मलंगगड,गोरखगड, मच्छिंद्रगड इतका दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. सिद्धगडाच्या इतिहास विशेष उपलब्ध नसला तरी किल्ल्यावरील कातळात कोरलेली गुहा पहाता हा किल्ला गायदरा या घाटमार्गाच्या रक्षणासाठी ९ व्या शतकात शिलाहारांनी बांधला असावा. इ.स.१६५७–५८ दरम्यान कोकण मोहिमेत हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला तो इ.स.१६९३ पर्यंत स्वराज्यात होता. २० ऑक्टोबर १६९३ रोजी मोगलांनी पुन्हा या किल्ल्याचा ताबा घेतला. त्यानंतर तो स्वराज्यात केव्हा दाखल झाला याची नोंद येत नाही पण पेशवे दप्तरातील नोंदीनुसार इ.स. १७३४ मधील वसई मोहिमेत सिद्धगडावर काही काळ मराठा सैन्य होते. १८१८ साली इंग्रजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा करून किल्ल्याचे नुकसान केले. १९४२च्या 'चले जाव'च्या चळवळीत क्रांतिकारक भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ला सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले. आज बोरवाडीत त्यांचे हुतात्मा स्मारक उभे राहिले आहे त्याचे दर्शन घ्यावे आणि परतीच्या प्रवासाला निघावे.
© Suresh Nimbalkar