SIDDHATEK

TYPE : MANDIR/GADHI/NAGARKOT

DISTRICT : AHMEDNAGAR

गणपती हे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. गणेश उपासना न करणारा भक्त तसा विरळाच. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राला अष्टविनायक यात्रा परिचित आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गावात असलेला सिद्धिविनायक सर्वांनाच माहित आहे. कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती असुन उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. गडकोटांची भटकंती करताना या मंदीराजवळ असलेल्या हरिपंत फडके यांच्या गढीवजा वाड्यास भेट देताना प्रथम सिद्धिविनायकचे दर्शन व त्याबद्दल लिहिणे क्रमप्राप्त आहे. सिद्धटेक गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले असुन सिद्धटेकला जाण्यासाठी सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. पुर्वी दौंडवरून शिरापूर येथे जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागत असे पण आता नदीवर पूल झाल्याने गाडी थेट सिद्धटेक गावात जाते. याशिवाय दौंड-काष्टीमार्गे पेडगाव येथील बहादूरगड पाहून देखील सिद्धटेकला जाता येते. हे अंतर साधारण ४८ कि.मी. आहे. पेशवेकाळात महत्त्व असलेले हे मंदिर एका छोट्याशा टेकडीवर वसलेले असुन या टेकडीच्या पायथ्याशी मूळ सिद्धटेक गाव वसलेले आहे. ... मंदिराकडे जाताना आपला गावातील प्रवेश हा एखाद्या किल्ल्याचे तटबंदीतील प्रवेशद्वार शोभावे अशा एका एका भल्या मोठ्या प्रवेशद्वारातुन होतो व आपण मंदिराजवळ पोहोचतो. हा दरवाजा व त्यातुन मंदिराकडे जाणारा फरसबंदी दगडी फरसबंदी मार्ग पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला. दरवाजाच्या दर्शनी भागात कमानीवर दोन शरभ व दोन कमळे तसेच काही नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस देवड्या असुन त्यातील एका देवडीत दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देखील कमळाची दोन फुले व कमानीच्या मध्यावर कुस्ती करणारे दोन मल्ल कोरलेले आहेत. पुढे दुकानांच्या गर्दीतुन वाट काढत आपण मंदिराजवळ पोहोचतो. पश्चिमाभिमुख असलेले दगडी बांधकामातील हे मंदीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले असून दर्शनी भागातुन मंदिराचा चौथरा साधारण १२ फुट उंच आहे. मंदीराचा गाभारा १५ x १० फुट लांबी रुंदीचा असून पितळेच्या मखरात दगडी सिहासनावर गणेशाची मूर्ती विराजमान झालेले आहे. सिद्घिविनायकाची पाषाणमूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद असून सोंड उजवीकडे झुकलेली आहे. गजाननाच्या मांडीवर ऋद्घि-सिद्घी बसल्या आहेत तर उजव्या-डाव्या बाजूंस जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शेजघर असुन शेजारी शिवपंचायतन आहे. मंदिराबाहेर सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना अशी मंदिराची रचना आहे. मंदीर परीसरात मारुती,शिवाईदेवी व महादेव यांची छोटी मंदिरे असून नदीजवळ भैरवमंदीर आहे. मुद्गल पुराणातील वर्णनानुसार सृष्टीचा निर्माता ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असताना मधु आणि कैटभ या दोन राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने सिद्धी प्राप्त करून असुरांचा वध केला. श्री गणरायांनी विष्णूला सिद्धी (शक्ती) ज्या ठिकाणी प्राप्त करून दिली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाऊ लागली. श्री मोरया गोसावी यांनी प्रथम येथेच उग्र तपश्चर्या केली होती व नंतर ते मोरगावी गेले. गणपतीचे दर्शन आटोपून बाहेर आल्यावर डावीकडील दुकानांच्या रांगेत एक लहान बोळ आहे. मंदिराबाहेर प्रदक्षिणा करण्याचा मार्ग देखील याच बोळातून जातो. या बोळातच सरदार हरिपंत फडके यांचा वाडा आहे. सद्यस्थितीत वाडा पूर्णपणे भुइसपाट झाला असून त्याची केवळ तटबंदी व या तटबंदीमध्ये असलेला दरवाजा शिल्लक आहे. या दरवाजास लोखंडी जाली लावलेली असल्याने आत जाता येत नाही पण या जाळीतून आतील परिसर पहाता येतो. आयताकृती आकार असलेला हा वाडा साधारण पाव एकरवर पसरलेला असून त्याच्या तटबंदीत एकही बुरुज दिसून येत नाही. वाड्याची तटबंदी व दरवाजा घडीन दगडात बांधलेला असून दरवाजाच्या कमानीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. तटबंदीत असलेला हा दरवाजा पुर्वाभिमुख बांधलेला आहे. जाळीमुळे आत जाता येत नसल्याने आपली वाड्याची भटकंती येथेच आटोपती घ्यावी लागते. हरीपंत फडके यांची जन्म तारीख उपलब्ध नसल्याने साधारण १७२९ ते २० जून १७९४ अशी त्यांची कारकीर्द मानली जाते. हरीपंत फडके हे १८ व्या शतकात उत्तर पेशवाईतील एक मुत्सद्दी व महत्त्वाचे सरदार होते. त्यांचे घराणे मूळचे कोकणातील गुहागराचे. येथील दीक्षित–पटवर्धन घराण्यांबरोबर हे घराणे इ. स. १७०० च्या आसपास देशावर आले. बाळाजी हरी हे हरिपंतांचे वडील दिक्षित-पटवर्धनांकडे काम करीत. ते १७५५ साली वारले. १७६१ पर्यंत हरिपंत दीक्षित-पटवर्धनांकडे सावकारीच्या कामावर कारकून होते. पुढे थोरल्या माधवराव पेशव्याने त्यांना नाना फडणीसांच्या हाताखाली कारकुनीचे काम दिले. हरिपंत स्वकर्तृत्वाने चढत सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत हुजूरातीत सेनापती बनले. सन १७७१ मध्ये माधवराव पेशवे आजारी असताना त्यांनी हरिपंतांवर नारायणरावांची जबाबदारी सोपवली. पेशव्यांनी त्यांना आपले कोकणातील केळशी महालाचे देशमुखी वतन दिले. रत्नागिरी प्रांतातील ३३ गावे, सुवर्णदुर्गाखालील हरणाई आणि पुणे प्रांतातील सिध्दटेक हा गाव इनाम दिला. धोंडो बल्लाळ यांना इनाम गावचा कमाविसदार (वसुली अधिकारी) म्हणून नेमले. त्याच वेळी हरिपंतांनी गजाननावरील श्रद्धेपायी सिध्दटेक येथे सिध्दिविनायका जवळ आपल्या राहण्यासाठी वाडा बांधला. साधारणपणे २५३ वर्षांपुर्वीचा हा वाडा आहे. त्यांनी सिध्दटेकला गणेशाची चांदीची मूर्ती तर पर्वतीवर सोन्याची मूर्ती अर्पण केली. नारायणराव पेशव्यांच्या कारभारात त्यांना अधिकारपद देण्यात आले. नारायणराव पेशव्याच्या वधप्रसंगी आपल्या हातून निर्णयप्रमाद घडल्याच्या भीतीने ते वधाची बातमी कळताच बारामतीस पळून गेले पण पुढे बारभाईचे कारस्थान, तोतयाचे बंड, मोरोबाचे बंड, रघुनाथरावांचा व खुन्यांचा पाठलाग, टिपूशी युद्ध या राजकारणात हरिपंत फडके यांचे सहाय्य लाभले. सवाई माधवराव यांच्या बालपणीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. २० मे १७८६ मध्ये म्हैसूर राज्याविरुद्ध बदामीच्या वेढा दरम्यान हरीपंत फडके यांना ५०००० सैन्याचे सेनापती पद देण्यात आले व त्यांनी या युद्धात विजय मिळवला. निजामाने त्यांना वजारतमान हा किताब दिला होता. इंग्रजांशी सामना, हैदरचा पराभव, खंडणी वसूली यामुळे हरिपंतांचा पेशवाईत धाक निर्माण झाला. हरिपंत नाना फडणीसांचे मुख्य सल्लागार होते. कित्येकदा त्यांनी सौम्यपणे नानांच्या चुका दाखविल्या व मतभेद व्यक्त केला. राज्यहिताची दृष्टी, निःस्वार्थीपणा, निर्भीडपणा, गुणग्राहकता व लोकसंग्रहाची दृष्टी हे त्यांचे विशेष गुण होत. खर्ड्याच्या लढाईनंतर सिद्धटेक येथे याच वाड्यात २० जून १७९४ रोजी त्यांचे निधन झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!