SHIRUD

TYPE : FORTRESS

DISTRICT : DHULE

धुळे जिल्ह्यतील धुळे या तालुक्याच्या ठिकाणाहुन २५ कि.मी.अंतरावर असलेले शिरुड गाव येथे असलेल्या कालिका देवीच्या मंदिरामुळे पंचक्रोशीत बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. पण आपल्या सारख्या दुर्गप्रेमीना या मंदीराची ओळख होते ती येथे असलेल्या गढीवजा किल्ल्यामुळे. हे मंदिर दगडी प्राकाराच्या आत बांधलेले असुन मंदीराचा संपुर्ण प्राकार हा या गढीच्या तटबंदीच्या आत वसलेला आहे. मंदीराच्या प्राकाराची भिंत व गढीचे बांधकाम पहाता गढीची हि तटबंदी नंतरच्या काळात बांधली गेली असावी. गावात कालिका मंदीर प्रसिद्ध असल्याने त्याची चौकशी केली असता आपण सहजपणे या गढीजवळ पोहोचतो. गावातुन कालिका मंदिराकडे जाताना वाटेत चांगदेव मंदीर (देवमठी) नावाने ओळखला जाणारा दगडी बांधकाम व बुरुज असलेला वाडा पहायला मिळतो. या वाड्याकडून ५ मिनिटात आपण कालिका मंदिराजवळ पोहोचतो. मंदिराकडे आपला प्रवेश हा गढीच्या तुटलेल्या तटबंदीतुन होतो. आयताकृती आकाराची हि गढी साधारण दीड एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकावर चार व पुर्व दिशेला असलेल्या दरवाजा जवळ एक असे एकुण पाच बुरुज पहायला मिळतात. ... कालिका देवीचे मंदिर हे गढीच्या दक्षिणपूर्व भागात बांधलेले असुन त्याला लागुनच गढीची तटबंदी बांधलेली आहे. गढीचे पुर्व दिशेच्या तटबंदीत बांधलेले मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन एका बुरुजाच्या आधारे बांधलेले आहे. कालिका देवीचे मंदीर व त्याचा प्राकार साधारण १२ गुंठ्यावर विस्तारला आहे. मंदीराचा परिसर वगळता गढीचा उर्वरीत भाग बुलडोझरने सपाट केला असल्याने तटबंदी व पाच बुरुज वगळता गढीचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. त्यातील एका बुरुजाची पुर्णपणे पडझड झाली आहे. कालिका मंदिराची एकुण बांधणी व त्यात असलेल्या दगडांची झालेली झीज पहाता कालिका देवीचे हे मंदीर साधारण बाराव्या शतकातील असावे असे वाटते. प्राकाराच्या भिंतीत असलेला मंदीराचा दरवाजा उत्तराभिमुख असुन कोरीव खांबावर त्याची कमान तोललेली आहे. दरवाजाच्या आतील बाजुस प्राकाराच्या भिंतीस लागून असलेल्या अकरा ओवऱ्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या असुन त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. दगडी खांबावर तोललेल्या मुख्य मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन पुरातत्व खात्याने त्याची दुरुस्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल आहे. मंदिराच्या मागील बाजुस एक चौथऱ्यावर बांधलेली विहीर असुन या विहिरीस बारा महीने पिण्यायोग्य मुबलक पाणी असते. संपुर्ण मंदिर पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. मंदिर वगळता गढीच्या आतील कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने आपले दुर्गदर्शन येथेच पुर्ण होते. संपुर्ण गढी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीचा कोणत्याही प्रकारचा इतिहास स्थानिकांना माहित नसल्याने व कागदपत्रात डोकावत नसल्याने ही गढी पुर्णपणे अपरिचीत आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!