SHIRSANGI

TYPE : GADHI

DISTRICT : BELGAON

HEIGHT : 0

GRADE : EASY

बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना आपल्याला ३६ पेक्षा जास्त गढीकोट पहायला मिळतात. येथील काही गढ्या म्हणजे एक प्रकारचे भुईकोटच आहेत आणि काही किल्ले व कोट इतक्या सुस्थितीत आहेत कि जणू काय ते हल्लीच बांधलेले आहेत. असाच एक भुईकोट आपल्याला सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावात पहायला मिळतो. शिरसंगी गाव हे आजुबाजुच्या परिसरात येथे असलेल्या कालीकादेवी मंदिरासाठी प्रसिद्ध असुन येथील गढी लिंगराज देसाई यांचा किल्ला म्हणुन प्रसिद्ध आहे. शिरसंगी गावाला पौराणीक इतिहास असुन शृंग ऋषींनी येथे तप करून कालीकादेवीला प्रसन्न केले व तिची येथे स्थापना केल्याचे सांगीतले जाते. हे मंदीर साधारण ११ व्या शतकातील आहे. शिरसंगी गाव बेळगाव पासुन ९५ कि.मी.अंतरावर तर तर सौंदत्ती या तालुक्याच्या ठिकाणाहुन २२ कि.मी.अंतरावर आहे. शिरसंगी गावात प्रवेश करतानाच कोटाचे बुरुज व तटबंदी नजरेस पडते. ... चौकोनी आकाराचा हा कोट अर्ध्या एकरवर पसरलेला असुन कोटाच्या चार कोपऱ्यात चार गोलाकार बुरुज आहेत. संपुर्ण तटबंदी व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. मुख्य दरवाजापुढील भागात कोटाचे दगडी भिंतीने बंदीस्त केलेले आवार असुन या आवारात शिरण्यासाठी दोन बाजुना दरवाजे आहेत. कोटाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन त्यातील लाकडी दारे आजही शिल्लक आहे. या दरवाजाच्या डावीकडे आत जाण्यायेण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. मुख्य दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस चौथऱ्यावर पुर्वी कचेरी असल्याचे सांगीतले जाते. या दरवाजाने आत शिरल्यावर दोन्ही बाजुस तटावर जाण्यासाठी बंदीस्त पायऱ्या आहेत तर समोरच लिंगराज देसाई यांचा दुमजली वाडा आहे. वाडयाच्या दर्शनी भागात वापरलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. वाडयाच्या दोन्ही बाजुस तटबंदीपर्यंत सोपे बांधलेले असुन त्यातुन आतील भागात जाण्यासाठी दरवाजे आहेत. वाडयात देसाई यांची कारकीर्द व वंशावळ दर्शविणारे छायाचित्र लावलेले आहे. वाडयाच्या वरील भागात जाण्यासाठी भिंतीत जिना बांधलेला आहे तर मागील बाजुस लहान शिवमंदिर आहे. तटबंदी व बुरुजात काही ठिकाणी लहानमोठी कोठारे बांधलेली आहेत. तटाजवळ एका ठिकाणी पाण्याचे लहान टाके बांधलेले आहे. पायऱ्या चढुन दरवाजा वरील भागात गेले असता संपुर्ण कोट नजरेस पडतो. तटावरून संपुर्ण कोटाला फेरी मारता येते. कोट फिरण्यास अर्धा तास पुरेसा होता. कोटाचे एकुण बांधकाम पहाता हो कोट फारसा जुना असल्याचे दिसत नाही. शिरसंगी गावातील शेवटचे देसाई म्हणजे लिंगराज देसाई. त्यांच्या कारकीर्दीत (१८७२-१९०६) शिरसांगी, नवलगुंड आणि सौंदत्तीमधील काही प्रांताचे ते देसाई होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती तसेच हा कोट देखील वीरशैव शैक्षणिक संस्थेला विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणगीदाखल दिला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!