SHIRALA

TYPE : GROUND FORT

DISTRICT : SANGALI

HEIGHT : 0

GRADE : EASY

सांगली जिल्ह्यातील शिराळा अथवा ३२ शिराळा या नावांनी ओळखले शहर नागपंचमीच्या दिवशी येथे होणारी जिवंत नागपुजा व नागांची मिरवणुक यासाठी देशभरात प्रसिध्द आहे. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागपुजा व नागांची मिरवणुक यावर बंदी घालण्यात आली आहे. शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९०० च्या पुर्वीपासून आढळतो. श्रीयाळ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गावात नाथ संप्रदायी गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा सुरु केली अशी कथा नाथलीलामृत या ग्रंथात आढळते. काळाच्या ओघात श्रीयाळचे नामकरण शिराळा असे झाले. शिवकाळात शिराळा हे सुभ्याचे मुख्य ठिकाण असल्याने आसपासच्या ३२ गावांचा महसूल येथे जमा केला जात असे. त्यामुळे या गावास बत्तीस शिराळा नाव पडल्याचे सांगितले जाते. इ.स १६४५ साली शिराळा गावात असलेल्या मारुती मंदीरातील मुर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामीनी केली. ... छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी संगमेश्वर येथे कैद केले व तेथुन औरंगजेबाकडे नेले तेव्हा त्यांचा एक मुक्काम शिराळ्यात पडला होता. तेव्हा शिराळा भुइकोटाचे किल्लेदार तुळाजी देशमुख, सरदार अप्पासाहेब दीक्षित,सरदार ज्योताजी केसरकर यांनी चारशे सैनिकांसह त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता पण त्यात ते अयशस्वी झाले. इतिहासातील एका महत्वाच्या घटनेचा साक्षीदार असलेला हा किल्ला आज मात्र पुर्णपणे अबोल झाला आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले शिराळा शहर कराडहुन ४० कि.मी. तर कोल्हापुरहुन ५० कि.मी. अंतरावर आहे. कराड कोल्हापुर महामार्गावरील पेठ नाक्यापासून शिराळा हे अंतर १५ कि.मी. आहे. शिराळा गावाबाहेर एका लहानशा उंचवट्यावर असलेला त्रिकोणी आकाराचा हा भुईकोट १२ एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या सभोवती खंदक आहे. हा खंदक काही ठिकाणी बुजलेला असुन खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. किल्ल्याला बाहेरील बाजूने फेरी मारताना किल्ल्याची तटबंदी व त्यात असलेले बुरुज ठळकपणे दिसुन येतात. रचीव दगडानी मातीत बांधलेली हि तटबंदी अनेक ठिकाणी ढासळली आहे. आपण गाडी रस्त्याने जिथुन किल्ल्यात प्रवेश करतो त्याच्या उजव्या बाजुस असलेल्या तटबंदीत किल्ल्याचा नष्ट झालेला दरवाजा व त्या शेजारील बुरुज पहायला मिळतो. किल्ल्याच्या आतील भागात नगरपरिषदेच्या इमारती असुन एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. किल्ल्याच्या आतील भागात शेती केली जात असल्याने बहुतांशी अवशेष नष्ट झाले आहेत. तटावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन सहजपणे फिरता येत नाही. किल्ल्यामध्ये नव्याने बांधलेले महादेवाचे मंदीर असुन या मंदीरातील शिवलिंग व नंदी मात्र जुने असावेत. या मंदिराशेजारी घडीव दगडात बांधलेली गोलाकार विहीर असुन या विहिरीच्या आतील भागात कमानी बांधलेल्या आहेत. या विहिरीत उतरण्यासाठी विहिरीशेजारी पायरीमार्ग बांधलेला असुन या वाटेने विहिरीतील कमानीत जाता येते. या विहिरीच्या पुढील भागात दुसरी खोदीव विहीर पहायला मिळते. या दोन्ही विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. किल्ल्यात येणारा रस्ता संपतो त्या ठिकाणी एका चौथऱ्यावर घुमटीवजा हनुमान मंदीर असुन या चौथऱ्यावर भग्न झालेल्या दोन विरगळ व एक भग्नमुर्ती ठेवलेली आहे. याशिवाय नगरपरिषदेच्या इमारतीच्या आवारात एका उध्वस्त वास्तुचा घडीव दगडात बांधलेला चौथरा व ढासळलेल्या भिंती पहायला मिळतात. तटावरून फेरी मारताना कोटाचा खंदक बराच खोल असल्याचे जाणवते. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!