SHINGVENAIK

TYPE : CITY FORT / FORTRESS

DISTRICT : AHMEDNAGAR

HEIGHT : 0

अहमदनगर मनमाड महामार्गाने शिर्डीकडे जाताना अहमदनगर पासुन साधारण २५ कि.मी. अंतरावर शिंगवे नाईक नावाचे गाव आहे. या गावाचा येथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या रस्त्याने शिर्डीकडे जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजुस दोन बुरुजात बांधलेला प्रशस्त असा भुईकोटाचा दरवाजा दिसुन येतो. एखाद्या किल्ल्याचा दरवाजा वाटावा असा हा दरवाजा कधीकाळी शिंगवे नाईक गावाभोवती असलेल्या परकोटाचा मुख्य दरवाजा आहे. वाढत्या लोकवस्तीने परकोटाच्या तटबंदीचा घास घेतला असुन हा दरवाजा व त्याशेजारी काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी वगळता कोटाच्या इतर कोणत्याही खुणा शिल्लक नाहीत. कोटाचा दरवाजा व त्याशेजारील दोन्ही बुरुज घडीव दगडात बांधलेले असुन फांजीच्या वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. फांजीवरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. दरवाजाची उंची साधारण १८ फुट असुन दरवाजाच्या दर्शनी भागात कमानी शेजारी दोन्ही बाजुस कमळे व मध्यावर कलश कोरलेला आहे. विटांनी केलेले बांधकाम चर्या,देवळ्या व चौकोनी आकार कोरून सजवण्यात आले आहे. त्याच्या वरील भागात एक बाजुस टोकावर थोडा उंच मनोरा असुन त्यावर ध्वजस्तंभाची जागा आहे. ... दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाचे लाकडी दार मात्र काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस तटाला लागुन दरवाजाच्या वरील भागात तसेच तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या बाहेरील बाजु प्रमाणे आतील बाजु देखील सुशोभित करण्यात आली असुन तटाला लागुन देवतेचे स्थान आहे. या परकोटाच्या आत असलेली तुकोजी नाईक यांची गढी पुर्णपणे ढासळली असुन या गढीतील वाड्याची केवळ एक बाजु शिल्लक आहे. शिल्लक असलेली हि बाजु देखील कोसळण्याच्या स्थितीत असुन कधी कोसळेल त्याचा नेम नाही. जीर्ण झालेल्या या वास्तुत सध्या कुणीही वास्तव्यास नाही.या वाड्याच्या समोरील बाजुस तुकोजी नाईक यांनी बांधलेले राममंदिर आहे. दगडी प्राकारात बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर असुन मंदिराच्या तीन बाजुस भागात ओवऱ्या तर एका बाजुस गर्भगृह आहे. मंदीराच्या आवारात विहीर असुन गर्भगृहाच्या भिंतीवर मंदिराचे बांधकाम दर्शविणारा शिलालेख आहे. येथे आपले शिंगवे गावाचे दर्शन पुर्ण होते. कोटाचा दरवाजा,वाडा व राममंदिर पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. तुकोजी नाईक यांच्या वंशजांशी भेट न झाल्याने त्यांचा इतिहास जाणून घेता आला नाही. बहिर्जी नाईक यांचे नेमके गाव आज इतिहासाला ठाऊक नसल्याने काहीजण शिंगवे नाईक हे बहिर्जी नाईकांचे गाव असल्याचे सांगतात पण कागदोपत्री त्याला कोणताही आधार नाही. शिंगवे नाईक गावामध्ये असलेल्या राम मंदीरात हे मंदिर शके १६९४ म्हणजे इ.स.१७७२ साली शिंगवे गावचे पाटील तुकोजी नाईक यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. काही स्थानिक हे तुकोजी नाईक बहिर्जी नाईक यांचे पुत्र असल्याचे सांगतात. शिलालेखात तुकोजी नाईक या नावासोबत भिकाजी कुलकर्णी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. इ.स.१७७२ हा माधवराव पेशव्यांचा कार्यकाळ असुन शिवकाल व या काळात बरेच अंतर आहे. गावाभोवती असलेला परकोट देखील या मंदिरासोबत बांधला गेला असावा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!