SHILOTTAR KOT

TYPE : FORTRESS

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

मध्ययुगीन काळात कल्याण-भिवंडी हि मोठी बंदरे असुन खाडीमार्गाने वसई येथे थेट समुद्राशी जोडली होती. या भागावर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी वसई ते भिवंडी- कल्याण या सागरी मार्गावरील उल्हास खाडीच्या काठावर अनेक लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. वसई-भिवंडी महामार्गावर पोर्तुगीजांची निर्मिती असलेला असाच एक लहानसा कोट म्हणजे शिलोत्तर कोट. वसई-भिवंडी महामार्गावर चिंचोटी येथुन ८ कि.मी.अंतरावर असणारा हा कोट वसई रेल्वे स्थानकापासुन १८ कि.मी.अंतरावर आहे. वसईहुन भिवंडीकडे जाणाऱ्या बसने पोमण येथे उतरून शिलोत्तर कोटास जाता येते. शिलोत्तर गाव येथे अस्तिवात असले तरी येथे वाढत असलेल्या औद्योगीकरणामुळे हा परीसर आता पोमण औद्योगीक वसाहत म्हणुन जास्त ओळखला जातो. काही वर्षापुर्वी महामार्गावरून सहजपणे दिसणारा हा कोट आता मात्र दिसत नाही. वसईहुन जाताना शिलोत्तर गाव महामार्गाच्या उजवीकडे तर शिलोत्तर कोट महामार्गाच्या डाव्या बाजूस आहे. ... गावातील वयस्कर लोकांना हे ठिकाण माडी म्हणुन परीचीत असले तरी नवीन पिढीला याचा गंधही नाही. वसईहुन जाताना महामार्गावरील जैन मंदिर पार केल्यावर कामण पोलीस चौकी लागते. या चौकीपासुन पुढे आल्यावर ५०० मीटर अंतरावर एक लहान रस्ता डावीकडे जाताना दिसतो. या रस्त्याने २ मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडील झाडीत शिलोत्तर कोटाच्या भिंती नजरेस पडतात. पोर्तुगीजांनी बांधलेल्या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. साधारण २०x २० फुट आकाराचा हि दुमजली वास्तु असुन याचा वरील भाग आज पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. या कोटाच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चुन्याचा वापर केलेला आहे. कोटाच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. सद्यस्थितीत १२ फुट उंच असणाऱ्या या वास्तुची मूळ उंची २०-२२ फुट असावी. या कोटाचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे ठाणे अथवा कचेरी म्हणुन होत असावा. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!