SENDURSANA
TYPE : FORTRESS
DISTRICT : HINGOLI
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला किल्ल्यायेवजी मोठ्या प्रमाणात गढी पहायला मिळतात. हे प्रमाण अगदी ३० कि.मी. वर एक गढी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अगदी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने सुस्थितीत राहीले. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आता हे गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आपल्याला मध्यम आकाराचे दोन किल्ले व दोन गढी पहायला मिळतात. सेंदुरसना येथे लहानशा टेकडावर बांधलेली सरदार देवकाते यांची गढी त्यापैकी एक. सेंदुरसना गावात असलेली हि गढी हिंगोली पासुन ४५ कि.मी.अंतरावर असुन औंढा नागनाथ येथुन २० कि.मी.अंतरावर आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. स्थानिकांना हे ठिकाण परिचयाचे असल्याने शोधाशोध न करता सेंदुरसना गावाबाहेर असलेली हि गढी व तिचा दरवाजा दुरूनच नजरेस पडतो. आयताकृती आकाराची हि गढी साधारण एक एकरवर पसरलेली असुन गढीचे मुख्य गढी व परकोट असे दोन भाग पडलेले आहेत.
...
गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन याचे खालील बांधकाम घडीव दगडात तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. उर्वरीत तटबंदी हि रचीव ओबडधोबड दगडात बांधलेली असुन गढीच्या तटबंदीत चार व परकोटास दोन असे सहा बुरुज या तटबंदीत आहेत. तटबंदीची उंची साधारण २० फुट आहे. मुख्य गढीत एका बुरुजावर विटांनी बांधलेले पण आता पडझड झालेले दालन असुन गढीच्या मध्यात बुजलेले टाके आहे. या व्यतिरिक्त गढीत इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. गढीच्या दरवाजासमोर दोन्ही बाजुच्या बुरुजापासून टेकडीच्या उताराच्या दिशेने बांधत नेलेली परकोटाची तटबंदी आहे. या तटबंदीच्या टोकावर बुरुज बांधून हि तटबंदी एकमेकाला जोडुन परकोटाचा परीसर बंदिस्त करण्यात आला आहे. परकोटात कोणतेही अवशेष दिसत नाहीत. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पुर्वी सेंदुरसना गावाला तटबंदी असुन गावात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा होता. गढीसोबत गावाचा फेरफटका केल्यास हा दरवाजा आजही आपल्याला पहायला मिळतो. याशिवाय गावात जीर्णोद्धार केलेले निळकंठेश्वर महादेवाचे मंदिर असुन या मंदिराशेजारी एक पुष्करणी आहे. सेंदुरसना गढी सरदार देवकाते घराण्याची असुन जिवाजीराव देवकाते हे या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात. गंगथडी मधील सेंदुरसना गाव पेशव्यांनी देवकाते घराण्याला इनाम दिले होते याशिवाय गढीचा कोणताही इतिहास उपलब्ध नाही.
© Suresh Nimbalkar