SAWARGAON WAYAL
TYPE : FORTRESS
DISTRICT : JALANA
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अलीकडील काळापर्यंत नांदते राहीले. यामुळेच आपल्याला मराठवाडा भटकंती करताना किल्ल्यायेवजी मोठ्या प्रमाणात गढी पहायला मिळतात. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आता हे गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. सावरगाव वायाळ गढी हि त्यापैकी एक. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. जालना जिल्ह्यात देखील रोहीलगड व मस्तगड हे दोन किल्ले वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात गढी दिसुन येतात.
...
हे प्रमाण अगदी ३० कि.मी. वर एक गढी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. जालना जिल्ह्यातील मंठा या तालुक्याच्या ठिकाणाहुन लोनारकडे जाताना १८ कि.मी.अंतरावर सावरगाव वायाळ गाव आहे. महामार्गापासुन हे गाव साधारण २ कि.मी.आत आहे. या गावात शिंदे यांची आजही काही प्रमाणात तग धरून असलेली चौबुर्जी गढी आहे. गढीची आज मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन तटबंदीत केवळ दोन बुरुज शिल्लक आहे. गढीची शिल्लक असलेली तटबंदी साधारण ३० फुट उंच आहे. गढीचा दरवाजा जमिनीच्या पातळीत असुन त्याच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात दगडी शिल्प असुन लाकडी बांधकामावर मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले आहे. गढीच्या आतील भागात शिंदे यांच्या वंशजांची घरे असुन गढीचा मूळ अवशेष म्हणजे आतील तीन मजली वाडा आजही शिल्लक आहे. या वाड्याचे व गढीचे बहुतांशी बांधकाम हे घडीव दगडात केल्याचे दिसुन येते. हे बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे. वाडयाच्या आतील भागात दगडी तळघरे असुन ती अंतर्गत मार्गाने एकमेकाशी जोडलेली आहेत. गढीच्या तटबंदीचे दगड गावातील इतर बांधकामासाठी करण्यात आला असुन मातीचा वापर शेतीसाठी केला असे गढीचे वंशज सांगतात. गढीत पाण्याची कोणतीही सोय दिसुन येत नाही. गढीच्या शिल्लक असलेल्या तटबंदी वरून संपुर्ण गाव नजरेस पडतो. गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात.
© Suresh Nimbalkar