SAUTADA

TYPE : FORTRESS

DISTRICT : BEED

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौतडा हे गाव विंचरणा नदीवर असलेल्या भव्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळी पर्यटनाशिवाय कोणताही पर्यटक या गावाकडे फिरकत नाही. पण दुर्गप्रेमीना भटकंती करण्यासाठी या गावात एक नव्हे तर चक्क दोन गढ्या आहेत. या गढी गावात मोरे व सानप यांच्या गढ्या म्हणुन ओळखल्या जातात. मोरे यांची गढी अवशेष रुपात शिल्लक आहे तर सानप यांची गढी आजही तग धरून आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेले हे गाव अहमदनगर व श्रीगोंदा येथुन ९० कि.मी.तर पाटोदा येथुन १८ कि.मी अंतरावर आहे.यातील सानप यांची गढी गावाबाहेर असुन मोरे यांची गढी गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. वावर नसल्याने या दोन्ही गढ्या आता अखेरची घटका मोजत आहेत. सानपांची गढी आतील वाड्याचे अवशेष वगळता आजही आपले अस्तित्व राखुन असल्याने सर्वप्रथम आपण हि गढी पाहुन घ्यावी. गावात गढी हा शब्द प्रचलित नसल्याने आपण सानप यांचा किल्ला कोठे आहे विचारले असता सहजपणे या गढी जवळ पोहोचतो. मुख्य रस्त्यावरून सौताडा गावात प्रवेश केल्यावर सरळ जाणाऱ्या रस्त्याने आपण गावाच्या दुसऱ्या टोकास गेल्यास सानप यांच्या गढीजवळ पोहोचतो. ... गढीजवळ पोहोचल्यावर गढीची तटबंदी व त्यातील भव्य बुरुज आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही. चौकोनी आकाराची हि गढी साधारण पाव एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकाला चार गोलाकार बलदंड बुरुज आहेत. गढीचे तळातील अर्धे बांधकाम हे घडीव दगडांनी केलेले असुन त्यावरील बांधकाम हे पांढऱ्या चिकणमातीच्या विटा वापरून करण्यात आले आहे. गढीचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन गढीत प्रवेश करण्यापुर्वी दरवाजासमोर काही अंतरावर कातळात खोदलेला लहान तलाव पहायला मिळतो. गढीच्या बांधकामासाठी दगड काढताना हे तळे निर्माण झाले असावे. गढीच्या दरवाजासमोर एक मोठा चौथरा असुन त्यावर दगडी तुळशी वृन्दावन बांधलेले आहे. येथुन थोडेसे चढुन गढीच्या दरवाजात जाता येते. येथे बहुदा पायऱ्या असाव्यात पण गढीच्या दरवाजाची कमान व आसपासचे बांधकाम ढासळल्याने त्या मातीखाली गाडल्या असाव्यात. गढीच्या दोन बुरुजाना जोडणारे भिंतीवजा बांधकाम करून त्यात हा दरवाजा बांधण्यात आला आहे. गढीत प्रवेश केल्यावर आत छप्पर उडालेल्या पडक्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. वाड्याचे तळातील बांधकाम दगडांनी केलेले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. आत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी असल्याने फिरता येत नाही. सानप गढी पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. हि गढी पाहुन झाल्यावर गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले मोरे गढी पहाण्यास जावे. या गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन केवळ तटबंदीचा भाग काही ठिकाणी शिल्लक आहे. या गढीचे बांधकाम सानप गढी प्रमाणे असले तरी यात बुरुज दिसत नाही. गढीचे दगड माती वापरून गढीच्या आसपास नवीन घरे बांधण्यात आली आहेत. गढीच्या दरवाजाची कमान पुर्णपणे विटांनी बांधलेली असुन हि कमान मात्र आजही शिल्लक आहे. या विटांचा वापर करून सुरेख नक्षीकाम केलेले आहे. या गढीच्या भागात देखील मोठ्या प्रमाणात झाडी वाढली. पहाण्यासारखे विशेष काही नसल्याने दहा मिनिटात या गढीची फेरी पुर्ण होते. सौतडा गावाचा हा वारसा काळाच्या ओघात नष्ट होत आहे पण गढीच्या वंशजाचे व स्थानिकांचे त्याकडे लक्ष नसल्याने अजुन वाताहत होत आहे. गावात असलेल्या गढीच्या वंशजांना आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती नाही हे या गढीचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!