SATAVALI

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : RATNAGIRI

HEIGHT : 0

GRADE : RATNAGIRI

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात लांजा शहरापासून १८ कि.मी.वर तर राजापुरपासुन २५ कि.मी.अंतरावर साटवली गाव आहे. मुचकुंदी नदीकिनारी वसलेले साटवली हे गाव ऐतिहासिक काळात एक दुय्यम बंदर होते. मुचकुंदी नदीमार्गे चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर साटवली किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. गढी प्रकारातील या किल्ल्याला साटवली गावावरूनच साटवलीचा किल्ला म्हणुन ओळखले जाते. या गढीपासून काही अंतरावर असलेल्या मुचकुंदी नदीपात्रात व्यापारी गलबते लागत असत. माल उतरवण्यासाठी येथे धक्का बांधण्यात आला होता पण सध्या तो अस्तित्वात नाही. माल उतरवण्याची व साठविण्याची व्यवस्था या ठिकाणी असल्याने या ठिकाणाला बंदरसाठा या नावानेही ओळखले जाई. येथुन हा माल बैलांच्या पाठीवरून घाटावर व आसपासच्या प्रदेशात पाठवला जाई. साठवणीचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावाला साठवली व पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन साटवली हे नाव पडल्याचे सांगण्यात येते. ... साटवली किल्ल्याची निर्मिती नेमकी केव्हा झाली हे माहित नसले तरी शिवकाळात हा किल्ला अस्तित्वात होता. साटवली गावातून किल्ल्याकडे जाताना रस्त्यावरच ओंकारेश्वर मंदिराच्या चौथऱ्यावर काही मुर्ती, वीरगळ व सतीशिळा ठेवलेल्या पहायला मिळतात. वाटेतच एक पायऱ्या असलेली व दोन भागात विभागलेली दगडी बांधकामातील चौकोनी विहीर पहायला मिळते. खाजगी वाहानाने साटवली शाळेसमोरून गावात जाणाऱ्या रस्त्याने ५ मिनिटात थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी जाता येते. किल्ल्यासमोरच मुचकुंदी नदीचे पात्र आहे. साटवली गढीची सध्या अतिशय दुरावस्था झालेली असुन भग्नावस्थेतील या गढीला झाडा-झुडपांचा विळखा पडला आहे. टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्याचा पसारा अर्धा एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण पाच बुरुज आहेत. किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा एका कोपऱ्यावर बांधलेला असुन त्याच्या शेजारी दोन बुरुज व उर्वरित तीन टोकाला तीन बुरुज अशी त्याची रचना आहे.किल्ल्याची तटबंदी व बुरुज यांची बांधणी करताना केवळ चिऱ्याचे मोठमोठे दगड एकमेकांवर रचलेले असुन त्यात सांधणीसाठी चुना अथवा कोणतेही मिश्रण वापरलेला नाही. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेली असुन दोन बुरुजामधील उध्वस्त दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच एक प्रचंड मोठे झाड असुन या झाडाच्या उजव्या बाजूस एक चौकोनी कोरडी पडलेली विहीर आहे. या विहीरीत खुप मोठया प्रमाणात काचेच्या बाटल्यांचा कचरा टाकण्यात आला आहे. विहिरीच्या पुढील भागात एक मोठा उध्वस्त चौथरा असुन आजूबाजुला तीन लहान चौथरे दिसुन येतात. किल्ल्यात झाडी वाढल्याने या झाडीतुन वाट काढतच बुरुजावर व तटावरील फांजीवर जावे लागते. बुरुजावर तोफेच्या व बंदुकीच्या मारगीरीसाठी असलेल्या जंग्या दिसुन येतात. किल्ल्याच्या पुर्व व दक्षिण बाजूस खोल खंदक असुन या खंदकातुनच चिरे काढुन बांधकामासाठी वापरलेले असावेत. किल्ला पाहुन झाल्यावर गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर पहायला जावे. लाकडी बांधकामातील हे मंदिर अतिशय सुंदर असुन या मंदिराच्या आवारात एक तोफ पहायला मिळते. किल्ला व हे मंदिर पहायला एक तास पुरेसा होतो. अफजलखानच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी कोकणात मोहीम आखली. त्यावेळी राजापूर ताब्यात आल्यावर साटवली गढी घेण्यासाठी दोरोजी या सरदाराला पाठवले. मराठा सैन्य येत आहे हे पाहुन तेथील सुभेदार सैन्यासह राजापुरला पळाला व पुढे जैतापुरला गेला. तिथे दाभोळहून आलेल्या अफझलखानाच्या जहाजांवर त्याने आश्रय घेतला. साटवलीचा दुसरा उल्लेख आढळतो तो इंग्रज कागदपत्रात. इंग्रज अधिकारी गिफर्ड हा खारेपाटण येथे कैदेत होता. मराठ्यांनी त्याला तेथुन सातवली किंवा विशाळगड किल्ल्यावर नेण्याचे ठरवले. मराठ्यांचा हा बेत गिफर्डने इंग्रजांना कळविला. त्यावेळी गिफर्डच्या सुटकेसाठी हेन्री रेविंगटनने योजना आखली. मराठे गिफर्डला घेऊन जात असलेल्या वाटेवर इंग्रजांनी सुमारे १० मैलांवर त्यांची वाट रोखली. खारेपाटणच्या किल्ल्यातून गिफर्डला घेऊन जाताना त्यांची इंग्रजांशी नेमकी कोठे गाठ पडली व त्यांच्यात चकमक झाली की नाही हे समजत नाही पण इंग्रजांनी त्याची सुटका केली. वरील उल्लेख हे राजापूरकर इंग्रजांनी सुरतेच्या इंग्रजांना २३ फेब्रुवारी १६६० रोजी लिहिलेल्या पत्रात आलेले आहेत. इ.स.१७१३ मधे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर साटवली किल्ला कान्होजीं आंग्रेकडे राहीला. पुढे १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांचे बिनसल्यावर पेशव्यानी इंग्रजांच्या मदतीने आंग्य्रांचा मुलुख घेतला व तुळाजी आंग्रे यांच्याकडे असलेला साटवली किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. असे ऐतिहासिक महत्त्व असणारी हि गढी नामशेष होण्यापुर्वी एकदा तरी भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!