SASUNAVGHAR

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी वसई ते भिवंडी- कल्याण या सागरी मार्गावरील उल्हास खाडीच्या काठावर संरक्षणासाठी तसेच प्रशासकीय सोयीसाठी अनेक लहान-मोठ्या वास्तु बांधल्या. यातील बहुतांशी वास्तुंची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. या बहुतेक कोटांची माझी भटकंती झालेली असुन यातील मी पाहिलेला आगळावेगळा कोट म्हणजे ससुनवघर कोट. हा नेमका कोट असावा कि अजुन काही वेगळे असावे या गोष्टीचे मला आजही नीटसे आकलन झालेले नाही. मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेला हा कोट महामार्गावर असुन देखील फारसा कोणाला माहित नाही. मुंबईहुन वसईकडे जाताना ससुनवघर गावाजवळ आल्यावर उजवीकडे महामार्गाला लागुन असलेले दुर्गामातेचे मंदीर दिसते. या मंदिरापुढे त्याच बाजुस काही अंतरावर साधारण १००० फुटावर आनंद धाबा आहे. या धाब्याजवळच वसईच्या दिशेला पुलाजवळुन एक पायवाट खाली ओढयाकडे उतरताना दिसते. या ठिकाणी खाजगी मालमत्ता असा फलक लावलेला आहे. ... येथे खाली उतरल्यावर डाव्या बाजूस ओढा असुन थोडे पुढे गेल्यावर स्मशान दिसते. या स्मशानापुढे काही अंतरावर पोर्तुगीजांनी ओढ्यावर बांधलेले दगडी धरण आहे. या धरणाच्या बांधकामासाठी दगड व चुन्याचा वापर केलेला असुन बंधाऱ्याच्या एका टोकास १फुट व्यास असलेल्या पाईपचे तोंड आहे. आज हे धरण बहुतांशी गाळाने भरलेले असुन या पाईपची आतील बाजु त्यात गाडली गेली आहे. या धरणात आजही काही प्रमाणात पाणी साठते. या धरणाच्या उजवीकडे टेकडीच्या उतारावर मोठ्या प्रमाणात वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. यात सर्वात वरील बाजूस ३० x ५० फुट आकाराचे पाण्याचे मोठे टाके आहे. या टाक्याच्या खालील बाजुस व शेजारी इतर लहान बंदिस्त टाकी असुन या टाक्यातील पाणी नालीच्या सहाय्याने या टाक्यातून फिरवलेले आहे. या इतर टाक्यात काही ठिकाणी कमानी असुन आत उतरण्यासाठी दरवाजे आहे. या सर्व टाक्यांना आतील बाजुने चुन्याचा गिलावा केलेला आहे. सर्वात तळाशी असणाऱ्या टाक्यातील पाणी शेवटी नालीच्या सहाय्याने पुन्हा बंधाऱ्यात सोडले आहे. या शिवाय येथे रहाण्यासाठी असलेल्या काही घरांचे अवशेष आहेत. हा कोट म्हणजे गोव्याच्या आग्वाद किल्ल्याप्रमाणे जहाजांना पाणी पुरवठा करण्याचे ठिकाण तर नसेल? कारण वसई किल्ल्यात कोणत्याही प्रकारचा मोठा पाणीसाठा दिसुन येत नाही. शिवाय या ठिकाणापासुन वसई खाडी फक्त ४५०० फुटावर आहे. कदाचीत या ठिकाणाच्या रक्षणासाठीच मालजी कोटाची निर्मीती करण्यात आली असावी असे समजण्यास वाव आहे. काहीही असो पण या वास्तुची पुर्ण पडझड होण्याआधी या जागेचा व स्थापत्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. धरण व आसपासचे अवशेष डोळसपणे पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. कोटापेक्षा पुर्णपणे वेगळी असलेली हि वास्तु पाहण्यासाठी या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!