SAROLABADDI
TYPE : FORTRESS
DISTRICT : AHMEDNAGAR
HEIGHT : 0
अहमदनगर-बीड महामार्गाने अहमदनगरहुन बीडच्या दिशेने जाताना १० कि.मी.अंतरावर सारोळाबद्दी नावाचे लहानसे खेडेगाव आहे. हे गाव मुख्य रस्त्यावरून साधारण अर्धा कि.मी.आत आहे. या गावाचा येथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे गावाच्या मध्यभागी असलेली गढी. हि गढी नेमकी कोणाची हे ठाऊक नसल्याने गावाच्या नावाने म्हणजे सारोळाबद्दी गढी म्हणुन ओळखली जाते. गावात प्रवेश केल्यावर समोरच गढीचा प्रशस्त बुरुज व त्याला लागुन नव्याने बांधलेले थडगे नजरेस पडते. गढीच्या आसपास असलेले अवशेष पहाता पुर्वीची गढी हि आज शिल्लक असलेल्या गढीपेक्षा बरीच मोठी असावी व या उंच गढीभोवती परकोट असल्याचे दिसुन येते. आता हा परकोट पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याच्या जागी काही ठिकाणी घरे बांधली आहेत. सध्या शिल्लक असलेली गढी हि चौकोनी आकाराची व चौबुर्जी म्हणजे चार बुरुजांची आहे. हि गढी साधारण १२ गुंठे परिसरावर पसरलेली असुन तिची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. तटबंदीची उंची साधारण २५ फुट असुन तटाचा खालील अर्धा भाग ओबडधोबड दगडांनी तर उर्वरीत भाग पांढऱ्या मातीत बांधलेला आहे. गढीचा दरवाजा आता पुर्णपणे नष्ट झाला असुन तुटलेल्या तटबंदीतुन आपला गढीत प्रवेश होतो.
...
गढीच्या आत घडीव दगडात बांधलेला वाड्याचा चौथरा असुन तो बहुतांशी मातीत गाडला गेला आहे. या वाड्याशिवाय इतर काही वास्तुचे अवशेष असुन त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. गढीचा हा भाग उंचावर असल्याने त्यात पाण्याची सोय कोठेही दिसुन येत नाही. पाण्याची सोय बहुदा परकोटात केलेली असावी. संपुर्ण गढी पहाण्यास व गढीभोवती फेरी मारण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीत राहणारे मुस्लीम कुटुंब सध्या गढीबाहेर पक्क्या घरात वास्तव्यास आहेत पण त्यांना देखील गढीचा व आपल्या पुर्वजांचा इतिहास ठाऊक नाही. निजामशाही काळात बांधलेली गढी यापुढे त्यांचे ज्ञान सरकत नाही.
© Suresh Nimbalkar