SARJEKOT-KULABA

TYPE : SEA FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 0

GRADE : EASY

अलिबागच्या समुद्रात कुलाबा व सर्जेकोट हे जोडकिल्ले उभे आहेत. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारात मोडतात. हे किल्ले भरतीच्यावेळी चहूबाजूंनी वेढल्यामुळे जलदूर्ग बनतात तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडल्यामुळे भुईकोट बनतात. ओहोटीच्या वेळेस अलिबाग किनाऱ्याहून तिथे चालत जाता येते. सर्जेकोट हा अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचा सख्खा शेजारी. खरे तर हा कोट नव्हे तर एक मोठा बुरूजच आहे. कित्येकदा सर्जेकोटाला कुलाब्याचा अठरावा बुरूज म्हटले आहे. सर्जेकोट हा किल्ला जंजिरे कुलाब्याच्या रक्षणासाठी बांधला गेला होता. भक्कम तटबंदीचा हा छोटेखानी किल्ला आजही सागराच्या प्रचंड लाटांचा तडाखा खात आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे. भरतीच्या वेळेस दोन्हीं किल्ले वेगळे होऊ नये म्हणुन एकेकाळी सेतू आणि भिंतीद्वारे हा किल्ला मुख्य किल्ल्यासोबत जोडला गेला होता. आता मात्र या सेतूची पडझड झालेली असुन भरतीच्या वेळेस याचा काही भाग पाण्याखाली जातो. ... बहुदा तो बांधला गेला तेव्हा त्याच्या उंचीमुळे समुद्राचे पाणी भरतीच्या वेळीही वरपर्यंत येत नसावे. या सेतुवरून सर्जेकोटावर जाता येते. या सेतुवर देखील दोन बुरुज बांधण्यात आले आहेत. सर्जेकोट हा खरतर वेगळा किल्ला किंवा अलिबागचा उपदुर्ग म्हणण्याइतका मोठा नाही. ह्या कोटाचा दरवाजा पश्चिमेकडे म्हणजे समुद्राच्या बाजूला आहे व त्याच्या पाठिमागच्या बाजूला अलिबागचा किनारा आहे. त्यामुळे किनाऱ्यावरुन ह्याचा दरवाजा दिसत नाही. सर्जेकोटाच्या दरवाजाची पडझड झाली असुन त्याचे पाचही भक्कम बुरूज मात्र ताठ मानेने उभे आहेत. साधारण २६ मीटर × २७ मीटर आकार असलेल्या ह्या कोटाचा तीन मीटर जाड तट मात्र आजही भक्कम आहेत. सर्जेकोटमध्ये प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम नजरेस पडते ती एक विहीर आणि तटाशेजारी फुलांनी बहरलेल चाफ्याच झाड. समोरच तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणाहुन पायऱ्या आहेत. तटाला बिलगून असणाऱ्या पायऱ्या छोट्या आकाराच्या आहेत तर दुसऱ्या पायऱ्या मात्र ऐसपैस आहेत. या पायऱ्यांवरुन आपल्याला तटाच्या फांजीवर जाता येते. किल्ल्यात वेताळ मंदिर होते असा उल्लेख आहे. तटावरून पश्चिमेला कुलाबा किल्ला दिसतो तर दुरवर उत्तरेस खांदेरी-उंदेरी हि दुर्गजोडी नजरेस पडते. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात किल्ल्या समीप दुसरा डोंगर असु नये असल्यास असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते अन्यथा शत्रु त्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो. आज्ञापत्रातील या आज्ञेनुसार संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला. यापूर्वी १६७९ साली खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिद्दीने उंदेरीचा ताबा घेतला व त्यावर किल्ला बांधला व मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित ह्या घटनेपासून बोध घेऊन सर्जेकोट व त्याला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी सेतू संभाजी महाराजांनी बांधला. छत्रपती शिवरायांनी १६८० साली कुलाबा किल्ला बांधण्यास सुरवात केली पण त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्या दोन्ही किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. जून १६८१ साली ह्या किल्ल्याच बांधकाम शंभाजी राजांच्या अखत्यारीत पुर्ण झाले. या किल्ल्याचा इतिहास कुलाबा किल्ल्याशी जोडला गेला असल्याने याला स्वतंत्र असा इतिहास नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!