SARANGKHEDA

TYPE : GADHI

DISTRICT : NANDURBAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

सारंगखेडा म्हटले कि आपल्याला आठवतो तो इथला घोडेबाजार. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रा घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे. पण सारंगखेडा येथे असलेली रावळाची गढी मात्र सहसा कोणाला माहित नाही. अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्ण नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. ... सांरंगखेडा गढी हि त्यापैकी एक. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. सांरंगखेडा गढी दक्षिण नंदुरबार भागात शहादा तालुक्यात शहादा पासुन १५ कि.मी. अंतरावर तर नंदुरबारपासुन ४२ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या एका टोकाला तापी नदीकाठी हि गढी असुन गढीच्या आत रावळ परिवारांची घरे आहेत. गढीची तापी नदीच्या दिशेला असलेली तटबंदी नदीच्या पाण्यामुळे पुर्णपणे ढासळलेली असुन केवळ दोन बाजुची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. गढीच्या तटबंदीत एकही बुरुज दिसुन येत नाही. रावळ परिवारांच्या वाढत्या घरांनी आतील संपुर्ण परीसर व्यापलेला असुन गढीतील मुळ अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. साधारण पाउण एकरमध्ये पसरलेल्या या गढीच्या उत्तरेला एका कोपऱ्यात मुख्य दरवाजा असुन हा फारसा जुना असल्याचे जाणवत नाही. गढीच्या आत एका घुमटीत शेंदुर फासलेले तांदळा दिसुन येतात. तटबंदीची उंची १०-१५ फुट असुन तटबंदीचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले आहे. गढीच्या पूर्वेकडील तटबंदीबाहेर तटबंदीला लागुन एका चौथऱ्यावर बांधलेल्या तीन घुमटीवजा समाधी आहेत. येथुन नदीपात्राकडे जाणारी वाट असुन वाटेच्या दुसऱ्या बाजुला एका उंचवट्यावर एक लहानसे जुने शिवमंदीर आहे. नदीपात्रातून सावरखेडा व टाकरखेडा यामध्ये तापी नदीवर असलेल्या धरणाचे सुंदर दर्शन होते. गढीत पाण्यासाठी विहिरीची सोय दिसुन येत नाही. गढीतील उंचवट्यावरून तापी नदीचे दूरवर पसरलेले पात्र व लांबवरचा प्रदेश दिसुन येती. गढीत असलेल्या वस्तीमुळे आपल्याला थोडक्यात गडफेरी आटोपती घ्यावी लागते. खानदेश प्रांत साडे बारा रावळाचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील वतनदाराना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी,परमार,प्रतिहार अशा वेगवेगळ्या कुळांचा समावेश होतो. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा ८.लामकानी ९.चौगाव १०.हातमोइदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावळाच्या अधिकारात त्यावेळेस सत्तेवर आलेल्या सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही. खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. यात १३ व्या शतकात तंवर परिवारातील संग्रामसिंह रावल यांनी नंदुरबारवर हल्ला केला व तेथील गवळी शासकाला हरवुन सत्ता ताब्यात घेतली. त्यांचे वंशज जयसिंह रावळ यांनी भोंगरा गाव वसवून तापी नदीकाठी सारंगखेडा येथे आपली जहागीर स्थापन केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!