SAPTASHRUNGI

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 3980 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्ध पीठ मानले जाते. सप्तशृंग म्हणजे सात शिखरांचा पर्वत. या सात शिखरांवर ब्रह्माणी, वैष्णवी, माहेश्वरी, इन्द्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा या सप्तमातृकांचा वास असल्याचे मानले जाते. याशिवाय गडावर जगदंबा मातेचे म्हणजेच वणीच्या देवीचे मंदिर आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केल्याचे मानले जाते. इतिहासात सातमाळ डोंगररांगेतील किल्ला म्हणुन संदर्भ असणारे हे ठिकाण आज केवळ तीर्थक्षेत्र म्हणुनच ओळखले जाते. नाशिक-कळवण मार्गावरील नांदुरी हे गडपायथ्याचे गाव नाशिकहुन ५२ कि.मी.अंतरावर असुन वणीपासुन १२.कि.मी.अंतरावर आहे. नांदुरी गावातुन गडाच्या माचीवर रस्ता गेला असुन हे अंतर साधारण १० कि.मी.आहे. याशिवाय नांदुरी गावातुन गडावर जाण्यासाठी पायवाट असून या वाटेवर साधारण ३५० पायऱ्या आहेत. ... या पायऱ्या चढुन माचीपर्यंत जाताना पाच शिलालेख पहायला मिळतात. यातील एक शिलालेख संस्कृत भाषेत तर उर्वरित चार शिलालेख मराठीत आहेत. या शिलालेखात कान्होजी, रुद्राजी व कृष्णाजी या तीन भावानी जेष्ठ शके १६९० सर्वधारी संवत्सर शुक्रवार ते चैत्र शके १६९१ विद्रोही संवत्सर म्हणजेच इ.स.१७६८ दरम्यान या पायऱ्या बांधल्याचा उल्लेख येतो. या शिलालेखात त्यांचे आडनाव रायराव व वडिलांचे नाव गिरमाजी असा उल्लेख आला असुन पायऱ्यासोबत त्यांनी धर्मशाळा, गणपती मंदिर व रामतीर्थ कुंड बांधल्याचा उल्लेख येतो. गडाचे बालेकिल्ला व माची असे दोन भाग पडले असून बालेकिल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४०५० फुट तर माचीची उंची ३७०० फुट आहे.सप्तशृंगी देवीचे मंदिर बालेकिल्ल्याच्या कातळकड्यालगत असुन तिथपर्यंत जाण्यासाठी ४७२ पायऱ्या आहेत. या पायऱ्या पेशव्यांचे सरदार खंडेराव दाभाडे यांची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी इ.स.१७१० साली बांधल्या. या पायऱ्याची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. सप्तशृंगी देवीचे मंदिर दोन शिखरांमधील गुहेत असुन देवीची अठरा हातांची ८ फूट उंच मुर्ती कातळात कोरलेली आहे. तिच्या प्रत्येक हातात धनुष्य, बाण, वज्र, चक्र, त्रिशूळ, तलवार, कुऱ्हाड, गदा, ढाल,पाश, शक्ती या शस्त्रांसोबत, मणिमाळा,शंख, घंटा, दंड,पानपात्र, कमंडलू व कमळ आहे. देवीची मूर्ती गडाच्या कातळात कोरलेली असुन या कातळाला देवीचे रूप मानले गेल्याने या कातळावर पाय ठेवण्यास म्हणजेच बालेकिल्ल्यावर जाण्यास परवानगी नाही. येथुन वर गडावर जाण्याचा मान दरेगावचे पाटील घराण्याला असुन ते दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री गडावर चढुन नवा ध्वज व दिवा लावतात. देवीची प्रदक्षिणा करण्यासाठी संपुर्ण गडाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे पण सतत दरड कोसळत असल्याने हा मार्ग बंद आहे. आपल्याला मंदिर पाहुन झाल्यावर किल्ला म्हणुन जो काही भाग पहाता येतो तो फक्त माचीचा भाग. तीर्थक्षेत्रामुळे माचीवर एक लहानसे बकाल शहर वसले आहे व यात किल्याचे सर्व अवशेष हरवुन बसले आहेत. गडाच्या दक्षिणेस अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले शिवालय नावाचे कुंड आहे. याच्या काठावर सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणुन ओळखले जाणारे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या आसपास अनेक अवशेष विखुरलेले असून चुन्याच्या घाण्याचे चाक पहायला मिळते. मंदिराबाहेर उजवीकडे अनेक प्राचीन मूर्ती मांडलेल्या असुन डाव्या बाजूला एक बारव व अनेक लहान मोठ्या समाधी आहेत. त्याच्याजवळच गंगा आणि यमुना ही दोन टाकी आहेत. शिवालय तीर्थाजवळच मारुतीचे व गणपतीचे मंदिर आहे. गणेश मंदिरात मंदिराच्या बांधकामाचा शिलालेख आहे. शिवालयापासून जवळच शीतकडा आहे. या शीतकड्यासमोर मार्कंडेय किल्ला उभा आहे. या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात किल्ल्याचे अवशेष म्हणजेच ढासळलेली तटबंदी तसेच खाली उतरत जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला तटबंदी बांधण्यासाठी कातळात काढलेले लांबलांब चिरे पहायला मिळतात. सतीकड्या जवळ उभे राहुन सप्तशृंगी मंदिराकडे पाहिले असता काळ्या दगडात बांधलेले एक मंदीर आपले लक्ष वेधुन घेते. सप्तशृंगी ट्रस्टच्या धर्मशाळेमागुन या महाकालेश्वर मंदिराकडे जाता येते. संपुर्णपणे काळ्या दगडात बांधलेले हे महाकालेश्वर मंदीर गुजरातमधील धरमपुर येथील सूरतच्या एका राजाने बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या बाजुला या राजाच्या समाधीचा चौथरा असून त्यावर पडझड झालेले वीट बांधकाम आहे. या मंदिराजवळच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विटांची सुरेख बारव आहे. या बारवेचे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. पुर्वी गडावर १०८ कुंड असल्याचे स्थानिक सांगतात पण सद्यस्थितीत गडाच्या माचीवर १२ ते १५ कुंडे आहेत. यात पाण्याने भरलेली आठ दगडी कुंड आहेत. यातील सरस्वती कुंड, लक्ष्मीकुंड, तांबुलकुंड, अंबालयकुंड, शीतलकुंड ही पाच लहान कुंडे तर कालीकुंड, सूर्यकुंड व दत्तात्रेयकुंड ही तीन मोठी कुंडे आहेत. माचीच्या उत्तर बाजूस असलेल्या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा असल्याने हे कुंड तांबूलकुंड म्हणुन ओळखले जाते तर काजलकुंड या कुंडातील पाणी काळसर रंगाचे आहे. पुर्वेला दाजीबा मंदिरापासून जवळच सूर्यकुंड व कालीकुंड आहेत. ती पेशव्यांच्या सरदार छत्रसिंग ठोकेंनी बांधली आहेत. नांदुरी गावातुन पायथ्यापासुन चालत आल्यास मंदीर व संपुर्ण माची पाहण्यासाठी ६ तास लागतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!