SANTOSHGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : SATARA

HEIGHT : 2890 FEET

GRADE : MEDIUM

सातारा जिल्ह्यातील सीताबाई डोंगरात उगम पावणारी माणगंगा नदी आपल्या काठावरील १५० कि.मी.चा प्रदेश सुपीक करत पंढरपुर जवळ सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. माणगंगा नदीकाठी असलेल्या या माणदेशात पुर्व-पश्चिम गेलेली सह्याद्रीची उपरांग महादेव डोंगररांग म्हणुन ओळखली जाते. फलटण तालुक्यात या महादेव डोंगररांगेत मोळघाटावर तसेच माणगंगेच्या उगमाशी असलेल्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी एका डोंगर सोंडेवर संतोषगड बांधला गेला. गडाखाली असलेल्या ताथवडे गावावरून हा किल्ला ताथवड्याचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. काही वर्षापुर्वी केवळ गाडलेल्या अवशेष रुपात दिसणारा हा किल्ला शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था पुणे यांच्या सततच्या प्रयत्नाने व मेहनतीने आज त्याच्या मूळ रुपात लोकांसमोर आला आहे. त्यांच्या या शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या उत्खननाला मानाचा मुजरा. फलटणहुन संतोषगड २० कि.मी. अंतरावर असुन पुण्यापासुन सासवड-जेजुरी-लोणंद-फलटणमार्गे हे अंतर १२० कि.मी.आहे. ... ताथवडे गावात शिरल्यावर वेशीवरील मारुती मंदीर, झाडाला असलेला दगडी पार व समोरील दगडी चौपाळ या खुणा मध्ययुगीन काळापासून हे गाव अस्तीत्वात असल्याची साक्ष देतात. ताथवडा गावात बाळसिध्दाचे अतिशय सुंदर मंदिर असुन प्रभुराम, विठ्ठल-रखुमाई व शंकर यांची मंदिरे आहेत. बाळसिध्द म्हणजेच भैरव मंदिराला दगडी तटबंदी असुन मंदीरासमोर दगडी दीपमाळ आहे. मंदिराच्या आवारात जाण्यासाठी दोन दरवाजे असुन महादरवाजावर नगारखाना आहे. मंदिराच्या आवारात एक विरगळ, गजलक्ष्मी व गणपतीचे शिल्प पहायला मिळते. मंदिराच्या पायरीवर असलेल्या शिलालेखावरून या मंदिराचे बांधकाम विसाजी शामराव देशपांडे यांनी चैत्र भानु संवत्सर जेष्ठ शुध्द पंचमी शके १६८४ म्हणजे इ.स.१७६२ साली केल्याचे समजते. ताथवडा गावातून एक सोपी पायवाट अर्ध्या तासात आपल्याला गडावर घेऊन जाते. साधारण वीस मिनिटांच्या चढाईनंतर वाटेला दोन फाटे फुटतात. यातील उजवीकडील वाट गडावर जाते तर डावीकडील वाट गडाच्या पुर्व बाजुस येते. गडावर न जाता प्रथम डावीकडील अवशेष पाहुन घ्यावेत. या वाटेवर एक आश्रम असुन या आश्रमाशेजारी दोन मोठया गुहा आहेत. डोंगराच्या पोटात उतरत जाणाऱ्या या गुहा सध्या बिकट अवस्थेत आहेत. या दोन्ही गुहेत पाणी असुन एका गुहेत आत खोलवर जाता येते. आश्रमाच्या पुढे काही अंतरावर नव्याने बांधलेले लहानसे महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर वळणावर असल्याने आश्रमाकडून दिसत नाही. या मंदिराच्या वाटेवर अजुन एक गुहा पहायला मिळते पण त्यासाठी स्थानिक माणुस सोबत असायला हवा. महालक्ष्मी मंदिराचे ठिकाण म्हणजे गडाचे जुने मेट असुन येथे काही वास्तु अवशेष पहायला मिळतात. येथुन गडाची संपुर्ण रचना लक्षात येते. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागला असला तरी किल्ल्याची माची एकसंध नाही. गडाच्या उत्तरेकडील पश्चिम सोंडेवरून गडावर येणारा मार्ग असुन या भागात काही प्रमाणात वस्तीचे अवशेष आहेत. गडावर येणाऱ्या या वाटेवरून एक निमुळती वाट गडाच्या पुर्व सोंडेखाली असलेल्या माचीवर येते. गडाच्या बालेकिल्ल्यावरून देखील एक वाट खाली पुर्व माचीवर येते पण हि वाट काही ठिकाणी ढासळल्याने धोकादायक झाली आहे. गडाची तिसरी सोंड बालेकिल्ल्यात असुन ति दुहेरी तटबंदीने बंदीस्त केली आहे. खालुन हे सर्व पाहील्यावर मूळ वाटेवर परत येऊन गड चढण्यास सुरवात करावी. या वाटेने एकुण तीन दरवाजे पार करत आपण गडावर पोहोचतो. किल्ल्याचा पहिला पुर्वाभिमुख दरवाजा डोंगर उतारावर बांधलेला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूस बुरुज बांधलेले आहेत. सध्या या दरवाजाची केवळ चौकट शिल्लक आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीला लागुन डोंगर उतारावर बांधलेली एक भिंत थेट या दरवाजाच्या बुरुजापर्यंत येते. येथुन एका बांधीव वाटेने आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात येतो. तटबंदीत बांधलेल्या या दरवाजाची चौकट व अर्धी कमान आजही शिल्लक असुन हा दरवाजा पार केल्यावर आपला गडाच्या पश्चिम दिशेच्या माचीत प्रवेश होतो. दरवाजा समोरील भागात उत्खननात नव्याने समोर आलेला एक चौथरा व त्यावरील भिंत दिसुन येते. माचीच्या या भागातील तटबंदी आजही शिल्लक असुन टोकावर एक बुरुज दिसुन येतो. माचीवरून खाली दरवाजाकडे जाण्यासाठी एक लहान कमानीदार दरवाजा असुन त्यातुन खाली उतरण्याची वाट मात्र मोडली आहे. माचीची बांधीव तटबंदी वीस फूट उंच तर रुंदी दहा फुट आहे. माचीचा हा भाग पार केल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या गोमुखी बांधणीच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजाच्या अलीकडे डाव्या बाजुला एक निमुळती वाट किल्ल्याच्या पुर्व दिशेला असणाऱ्या माचीत जाते. सध्या या वाटेवर मोठया प्रमाणात झाडी माजली आहे. दरवाजावरील अर्धी कमान ढासळली असली तरी आतील पहारेकऱ्याच्या देवड्या शिल्लक आहेत. दरवाजाची चौकट व एकुण रचना पहाता किल्ल्याच्या मूळ बांधकामातील हा दरवाजा शिवपुर्वकालीन आहे. आपण आज पहात असलेले तीनही दरवाजे अनेक वर्षे जमिनीखाली गाडले होते. शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था पुणे यांच्या परिश्रमाने आज हे दरवाजे व किल्ला मोकळा श्वास घेत आहेत. संतोषगड समुद्रसपाटीपासून २८९४ फुट उंचावर असुन पायथ्यापासुन हि उंची ५२० फुट आहे. साधारण त्रिकोणी आकार असलेल्या बालेकिल्ल्याला तिन्ही टोकास बुरुज असुन दक्षिणेकडील बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. यातील एका वास्तुच्या कोनाड्यात मारुती व दुसऱ्या कोनाड्यात गणपतीची मुर्ती पहायला मिळते. येथुन डावीकडे वळल्यावर गडाची प्रशस्त सदर पहायला मिळते. सदरेच्या पुढील भागात किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे किल्ल्याचा पुर्व टोकाचा बुरुज असुन या बुरुजावरून खाली माचीवर जाण्यास पायऱ्यांची वाट आहे. या वाटेवर एक लहान दरवाजाची चौकट असुन त्यापुढील वाट मात्र नष्ट झाली आहे. सदरेच्या मागील बाजूस गडाचा अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. अंबरखान्याच्या मागील बाजूस ५० x ४० फुट आकाराचे व तितकेच खोल खडकात खोदलेले टाके आहे. या टाक्यातील दगड बालेकिल्ल्याच्या बांधकामात वापरून पाणीसाठा निर्माण केला असावा. या विहीरीचे पाणी १९९३ पर्यंत नळाने ताथवडा गावात आणले जात होते. सध्या टाक्यात फारच थोड्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते. शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्थेने या टाक्यातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर काढला आहे. टाक्यात उतरण्यासाठी एका बाजुला खडकात कोरलेल्या पायऱ्यावर दरवाजा कोरलेला असुन एक लहान शिवमंदीर बांधले आहेत. स्थानिक लोक या मंदिरास तातोबा महादेव म्हणुन ओळखतात. टाके पाहुन पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाखाली दुसरी तटबंदी असुन या तटबंदीत जाण्यासाठी बुरुजाच्या दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. या तटबंदीत डाव्या बाजुला गडाबाहेर जाण्यासाठी चोरदरवाजा असुन त्यात उतरता येते मात्र दुसऱ्या बाजूस काही प्रमाणात माती जमा असल्याने बाहेर पडता येत नाही. चिलखती तटबंदीतुन डाव्या बाजुच्या दरवाजाने बाहेर पडल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पश्चिम भागात येतो. येथे एका ठिकाणी दगडात मारूतीची अर्धवट कोरलेली मुर्ती पहायला मिळते. या भागातुन किल्ल्याच्या पश्चिमेस असलेला मोळघाट व गडाची पश्चिम माची नजरेस पडते. या वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजात येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. आश्रमापासून संपुर्ण किल्ला भटकण्यास दोन तास लागतात. काही ऐतिहासिक संदर्भानुसार शिवपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या या किल्ल्याचे संतोषगड नामकरण शिवाजी महाराजांनी केल्याचे मानले जाते. किल्ला बांधल्याचा नेमका कालखंड उपलब्ध नसला तरी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात असलेले पुरावे आढळतात. मोगल व आदिलशाही १६५७ च्या दफ्तरात या गडाचा उल्लेख तातोरा असा येतो तर मराठयांच्या पत्रव्यवहारात याचा उल्लेख ताथवडा, तानवटा, ताथोडे, ताथोडा असा येतो. इ.स. १६६५ मधे बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला पुरंदर तहानंतर मोगल-मराठे संयुक्त फौजांनी ७ डिसंबर १६६५ रोजी जिंकला. ताथवडा जिंकल्यावर औरंगजेबाने महाराजांना पोषाख व जडावाची कट्यार पाठवली. त्यानंतर परत आदिलशहाच्या ताब्यात गेलेला हा किल्ला व आसपासचा प्रदेश इ.स.१६७३ मधे शिवाजी राजांनी जिंकून घेतला. महाराजांनी संतोषगडाची डागडुजी व नामकरण बहुधा याच काळात केले असावे. संभाजी महाराजांच्या काळात मराठयांच्या ताब्यात असलेला हा किल्ला इ.स.१६७९ मधे मोगलांनी जिंकून घेतला. पुढे १७२० मधे शाहु महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. इ.स.१८१८पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला जनरल प्रित्झलरने तोफांचा मारा करुन गड उध्वस्त केला व ताब्यात घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!