SANKASHI

TYPE : HILL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 750 FEET

GRADE : MEDIUM

सह्याद्रीची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे. ही रांग उत्तरेकडे पातळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा नद्यांची खोरी विभागते. यात बाळगंगा खोऱ्याच्या दक्षिणेला सांकशी डोंगररांग आहे. पनवेल पासून २० किमी.वर असणारा सांकशीचा किल्ला जंगलाने वेढलेला असुन एका बाजूला मुंबई गोवा महामार्ग तर दुसऱ्या बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, माणिकगड आहे. पूर्वी कधी काळी हा सांक नावाच्या राजाच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यास त्याच्या नावावरून सांकशी हे नाव पडले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बद्रुद्दिन दर्ग्यावरून त्याला बद्रुद्दीनचा किल्ला किंवा दर्ग्याचा किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला निढवली गावाच्या हद्दीतील साधारण ८०० फुट उंचीच्या टेकडीवर उभा आहे पण येथे जाण्याचा गाडीमार्ग मात्र मुंगोशी गावातुनच जातो. ... पनवेलपासुन -तरणखोप- मुंगोशी मार्गे बद्रुद्दीन दर्गा हे गडाच्या पायथ्याचे ठिकाण ३० कि.मी.वर आहे. दर्ग्याजवळ नविन आणि जूना असे दोन दर्गे असुन जुन्या दर्ग्याजवळून एक ठळक वाट किल्ल्यावर गेलेली आहे. लक्षात ठेवण्याची खुण म्हणजे किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांमधुन एक पाईप खाली दर्ग्यात आणला आहे. या पाईपच्या बाजुने किल्ल्यावर जाण्याची सोपी चढण असणारी वाट आहे. दर्ग्याचा पाया मंदिराच्या घडीव दगडांचा बनविला असुन आसपास मंदिरांची शिल्पे विखुरलेली आहेत. डोंगराच्या उत्तरेकडील उतरणीवर पुर्वी वस्ती असावी त्याचे अवशेष आसपास दिसुन येतात. दर्ग्याच्या बाजुला काही अंतरावर खडकात खोदलेले एक २० x १० आकाराचे ओबडधोबड टाके आहे. हे तोंडाशी अरूंद परंतु आतील बाजूस अधिक रुंद आहे. याच्यासमोर गाझीशाह याची कबर आहे. किल्ल्यावर चढायला सुरुवात केल्यावर १५ मिनिटात आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यापाशी पोहोचतो. पायऱ्याच्या उजवीकडे कातळात कोरलेले दात्री नावाचे पाण्याने भरलेले खांबटाके आहे. या टाक्याकडे जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. पायऱ्या चढुन वर आल्यावर येथे तीन टाकी आहेत व डाव्या बाजुला १० फुट खोलीचे मातीने भरलेले जगमाता नावाचे चौथे टाके आहे. या टाक्यांच्या वरील बाजूस असलेल्या खोदीव देवडीत वज्राई किंवा जगमातेची मूर्ती आहे. ती सांकराजा ज्याने हा किल्ला बांधला त्याची मुलगी आहे असे मानले जाते. हे सर्व पाहुन झाले की आपण एका छोट्याश्या खिंडीपाशी पोहोचतो. येथून वर जाण्याच्या पायऱ्या नष्ट झाल्याने वर चढण्यासाठी कातळात खोबण्या केलेले आहेत त्यामुळे सांभाळून वर चढावे लागते. हा कातळटप्पा चढुन वर पोहोचल्यावर येथुन किल्ल्यावर जायला समोरच्या बाजुने एक तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालुन वर जाणारी अशा दोन वाटा आहेत. उजवीकडे गाजीशाह नामक पाचवे टाके असुन याच पातळीवर उत्तरेकडे आणखी दोन मोठी खांबटाकी आहेत. ही दोन टाकी गोवणी नावाने ओळखली जातात. या टाक्याचे दोन भाग केलेले असुन या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. शेवटच्या टाक्यात शिरण्यासाठी एक ३ x ३ फ़ूट आकाराचा दरवाजा कोरलेला असुन दरवाजांवर पाना-फुलांची नक्षी आहे. ही बहुधा लेणी असावीत कारण दरवाजाच्या दोन्ही बाजुस द्वारपाल असुन त्यांच्यावर मागील बाजुस किर्तीमुख कोरलेले आहेत. बाजूला कातळात कोरलेली मारुतीची अस्पष्ट मुर्ती दिसते. टाकी पाहून आपण किल्ल्याला वळसा घालत पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक कोरडे पडलेल आठवे टाके दिसत. याच्यापुढे कातळात कोरलेली अजुन दोन सुकलेली टाकी दिसतात. त्याच्या पुढे ६० x ५० x १० फ़ूट लांबी रुंदीचे ४ खांबांवर तोललेले गुहा खांबटाक पाहायला मिळते. हे बहुधा धान्य कोठार असावे. गडमाथ्याच्या पश्चिम व दक्षिण बाजुसही धान्यकोठारे आहेत. दक्षिणेस भुयारासारख्या कोठारास चोर टाके म्हणतात. ते पाहुन परत सुकलेल्या टाक्यापाशी येऊन एक छोटा कातळटप्पा चढल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर येतो. वर पाण्याच एक कोरड टाक आहे. समोरच गडाची ढालकाठीची टेकडी दिसते. या टेकडीच्या माथ्यावर वाड्याचे, शिबंदीच्या राहण्याची व सदरेची जोती व इतर काही अवशेष दिसतात. टेकडीवरून उजव्या बाजूने खाली उतरल्यावर डोंगराचा बाहेर आलेला भाग आहे. येथे पाण्याच एक कोरड टाक पाहायला मिळत. ते पाहून चालत गेल्यावर दोन कोरडी टाकी पाहायला मिळतात. या टाक्यांच्या समोर दिसणाऱ्या डोंगराचा बाहेर आलेल्या भागाच्या खाली पाहिल्यावर ५० फुटावर एक गुहा दिसते. तेथे जाण्यासाठी मात्र गिर्यारोहण तंत्राची माहिती व साहित्य असणे आवश्यक आहे. हि गुहा ४० x १५ x ६ फुट आकाराची असुन ती दोन खांबांवर तोललेली आहे. पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पोहोचतो. येथे पठारावर ५ टाकी कोरलेली असुन आजुबाजुला कातळात असंख्य खळगे व चर कोरलेले दिसतात. पावसाचे पाणी वाहात टाक्याकडे जाण्यासाठी चर कोरलेले असुन वाहत जाणाऱ्या पाण्यातील गाळ या खळग्यात साचत असे. पुढे किल्ल्याच्या टोकाकडे एक रांजण खळगा कोरलेला पहायला मिळतो. किल्ल्याच्या या टोकावरून समोर टेकडीकडे पाहिल्यावर हा किल्ला जोडकिल्ला असावा असे वाटते कारण बारकाईने पाहिल्यास समोरच्या डोंगरावर देखील खडकात खोदलेली दोन टाकी दिसतात शिवाय सांकशी गडाचा डोंगर व हा डोंगर केवळ एका दरीने विभागलेले आहेत. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. या किल्ल्यावर इतकी टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा. गड जरी लहान असला तरी ह्यावरुन मिऱ्या डोंगर, घारापुरी, मुंबई, कर्नाळा, माणिकगड, नागफणी इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. पश्चिमेकडे उगमापासून समुद्रापर्यंत नागमोडी वळणाने जाणारी बागसाई नदीचे पात्रही नजरेत भरते. किल्ल्याच्या टेकडीच पठार आणि ५ टाकी असलेल पठार यांच्या मधल्या घळीतून खाली उतरल्यावर आपण वर चढुन आलेल्या कातळ टप्प्यापाशी पोहोचतो. येथून आल्या वाटेने किल्ला उतरता येतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास २ तास लागतात. मुसलमान राजवटीपुर्वी सांकशी किल्ला कोकणचे शिलाहार किंवा यादवांचे हिंदु मांडलिक राजे यांपैकी कोणाचा तरी असावा. पुर्वी पेणचा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रातून आढळतो. सांकशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला. त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर. राणाकंसच्या काळात सांकसई किल्ल्यावरुन या सांकसे तालुक्याचा कारभार चाले. सागरगडच्या पाळेगाराने राणासंकच्या साकसईवर स्वारी करून त्याचे राज्य बुडविले. सोळाव्या शतकाच्या पुर्वार्धात हा किल्ला गुजरात सुलतान अहमद शहाच्या ताब्यात गेला. इ.स. १५४०मध्ये अहमदनगरचा सुलतान बुरहान निजामशहा पहिला (१५०९-१५५३) याच्या सैन्याने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या विनंतीनुसार पोर्तुगीजांनी हा किल्ला परत घेण्यासाठी ३०० सैनिक पाठविले. हे सैन्य पाहुन निजामशाही सैन्याने किल्ला सोडला. काही काळानंतर निजामशाही सैन्याने किल्ला घेण्यासाठी पुन्हा चाल केली. त्यामुळे गुजरात सेनापतीने किल्ल्याचा ताबा पोर्तुगीजांकडे सोपविला. वसईचा पोर्तुगीज कप्तान डी मेंझेस याने किल्ल्याच्या रक्षणार्थ सैन्य रवाना केले. दोन्ही सैन्यात चकमक उडुन निजामशाही सैन्य पराभुत झाले यावेळी ट्रान्कोसो नावाच्या पोर्तुगीज सैनिकाने मोठा पराक्रम गाजवला. परंतु निजामशहाशी मैत्री संपादन करण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरॉयने सांकशी आणि कर्नाळा किल्ला ५००० सोन्याचे परदाव म्हणजेच १७५०० रुपये एवढी रक्कम बुरहान निजामशहा पहिला यास देऊन हे किल्ले खरेदी केले. इ.स. १६७०च्या सुमारास शिवाजी महाराजांचा सरदार आबाजी सोनदेव याने तो स्वराज्यात दाखल करून घेतला. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे आला. सन १८२७ मधे रामोशी व इंग्रजांमधे ह्या किल्ल्यावर किंवा जवळ काही झटापटी झाल्याचा उल्लेख मिळतो. सन १८६६ पर्यंत सांकशी हे एका उप-विभागाचे मुख्यालय असुन त्यात १९८ खेडी समाविष्ट होती. हे मुख्यालय १८६६ मध्ये पेणला हलविल्यानंतर सांकशीचे महत्त्व कमी झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!