SANJAAN

TYPE : GROUND FORT

DISTRICT : VALSAD

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात येथील स्थानिक राज्यकर्त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांसोबत पोर्तुगीजांसारख्या परकीय सत्ताधीशांनी बांधलेले अनेक किल्ले आहेत. चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेनंतर हा प्रांत मराठयांच्या ताब्यात आल्यावर यातील किल्ले देखील मराठयांच्या अधिपत्त्याखाली आले. दमणच्या सरहद्दीवर असलेला संजाण हा असाच एक भुईकोट किल्ला. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. वापीच्या अलीकडे असलेले संजाण रेल्वे स्थानक या किल्ल्याला जवळ असले तरी येथे थांबणाऱ्या गाड्या अनियमीत असल्याने भिलाड येथे उतरुन रिक्षाने तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथुन संजाण येथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील तलासरी येथुन २२ कि.मी. आत असलेला हा किल्ला भिलाडहुन १३ कि.मी. तर वापीहुन २९ कि.मी.अंतरावर आहे. संजान रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेहुन सरळ जाणाऱ्या रस्त्याने साधारण १.५ कि.मी.अंतरावर हा किल्ला असुन रिक्षाने अथवा चालत २० मिनिटात तेथे पोहोचता येते. ... किल्ला परीसरात फारसा परिचित नसल्याने रिक्षा ठरवताना पुराना किल्ला किंवा तुटलेल्या किल्ल्याचे अवशेष अशीच चौकशी करावी. रस्त्याने जाताना डाव्या बाजुस या किल्ल्याची उध्वस्त तटबंदी व त्यातील एक बुरुज नजरेस पडतो. या बुरुजावर मोबाईलचा मनोरा उभारलेला आहे. किल्ला खाजगी मालमत्ता असुन आत नारळाची बाग असल्याने परवानगी घेऊनच आपली भटकंती सुरु करावी. किल्ला पाहण्यासाठी कोणतीही हरकत घेतली जात नाही. या जागेच्या मालकांच्या बंगल्यामागुनच किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी वाट आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला तीन एकरवर पसरलेला असुन त्याच्या चार टोकावर चार बुरुज आहे. किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळलेली असुन त्यात असलेले प्रवेशद्वार पुर्णपणे नष्ट झालेले आहे. किल्ल्याच्या आत असलेल्या नारळाच्या बागेमुळे आतील अवशेष पुर्णपणे नष्ट झालेले आहेत. तटबंदी व बुरुजांचा खालील भाग दगडांनी बांधलेला असुन वरील भागात विटांचे बांधकाम केलेले आहे. यातील मोबाईल मनोरा असलेल्या बुरुजाजवळ चर्च ऑफ अवर लेडी ऑफ बर्थ चर्चची उध्वस्त वास्तु पहायला मिळते तर दुसऱ्या बुरुजावर विटांनी बांधलेल्या उध्वस्त चौकीचे अवशेष आहेत. तिसऱ्या बुरुजावर वरोली नदीच्या दिशेने, तिच्या मुखावर व पात्रावर टेहळणीसाठी विटांनी बांधलेला उंच मनोरा असुन त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. चौथ्या बुरुजावर कोणतीही वास्तु दिसून येत नाही. तटावरून फेरी मारताना उत्तर दिशेला तटाखाली एक विहीर पहायला मिळते. किल्ल्याचा दरवाजा शिल्लक नसला तरी त्याचे ठिकाण दर्शविणारे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याच्या पश्चिम दिशेला वरोली नदीचे पात्र असुन पोर्तुगीजांनी या नदीच्या काठावरच हा किल्ला बांधला. संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पर्शिया येथुन परागंदा झालेल्या पर्शियन समुदायाने म्हणजे पारशी समाजाने ७ व्या शतकात (इ.स.६९८ मध्ये) संजान शहर वसवल्याचे मानले जाते. इ.स.१४८० साली संजान शहर गुजरात सुलतान महंमद बेगडा याच्या याच्या ताब्यात आले. त्यानंतर दमण येथे वसलेल्या पोर्तुगीजांनी संजाणचा ताबा घेतला व येथे कोट बांधला. इ.स. १५५९ मध्ये पोर्तुगीजांच्या दमण प्रांतातील संजान हा परगणा व त्याचे मुख्य ठिकाण होते. वरोली नदीपात्रातून या भागाशी बोटीने वहातुक होत असे. इ.स.१६३८-१६८५ दरम्यान मराठयांशी वारंवार घडलेल्या चकमकीत संजान किल्ल्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले पण मराठयांना किल्ल्याचा ताबा घेता आला नाही. यानंतर मराठयांनी पोर्तुगीजांविरुद्ध उघडलेल्या वसई मोहिमेत इ.स.१७३८ दरम्यान संजान प्रांत व किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. १८ व्या शतकात संजान ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते आधी मुंबई राज्याचा भाग बनले व नंतर गुजरातमध्ये सामील झाले. २००२-२००४ दरम्यान भारतीय पुरातत्व खात्याने संजान बंदर येथे केलेल्या उत्खननात ८ व्या शतकात या भागात स्थायिक झालेल्या पारशींच्या समुदायाशी संबंधित वसाहतीचे अवशेष उघडकीस आले जे १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंत येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास होते. या उत्खननात पोर्तुगीज काळातील किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष देखील समोर आले. याशिवाय शिलाहार काळातील काही मुर्ती व बांधकामाचे अवशेष येथे आढळुन आले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!