SAIWAN
TYPE : HILL FORT
DISTRICT : PALGHAR
HEIGHT : 270 FEET
GRADE : EASY
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. उत्तर कोकणवर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी या भागाच्या रक्षणासाठी व कारभारासाठी समुद्रकिनाऱ्यालगत तसेच खाडीतुन जहाजांची वाहतुक ज्याभागात होत असे त्या ठिकाणी खाडीच्या काठावर अनेक लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. वैतरणा खाडीची उपनदी असलेल्या तानसा नदीच्या काठावर पोर्तुगीजांची निर्मिती असलेला सायवान किल्ला हा काळाच्या ओघात नष्ट झालेला असाच एक किल्ला. अनेक ठिकाणी हा किल्ला पुर्णपणे नष्ट झाल्याचे वाचनात येत असले तरी आजही या किल्ल्याचे तुरळक अवशेष दिसुन येतात. वज्रेश्वरी मार्गावर असलेला हा किल्ला मुंबई-अहमदाबाद मार्गावर विरार जवळील शिरगाव फाटा येथुन ११ कि.मी.अंतरावर तर विरार रेल्वे स्थानकापासुन २३ कि.मी.अंतरावर आहे. सायवान गाव वज्रेश्वरी मार्गावर असुन विरारकडून जाताना सिमेंटच्या रस्त्याने गावात उजवीकडे वळल्यावर गावाच्या टोकापर्यंत जावे.
...
गावात हा किल्ला कोणाला फारसा माहित नसुन काही वयोवृद्ध नागरीक या जागेचा जुन्या काळातील चौकी म्हणुन उल्लेख करतात. आपणही या किल्ल्याची चौकशी करताना चौकी म्हणुन विचारणा करावी. रस्त्याच्या या टोकावर डाव्या बाजूस उतारावर मंगल रामा नाईक यांचे घर असुन उजवीकडे चढावर एक मातीचा रस्ता डोंगराच्या दिशेने जाताना दिसतो. या रस्त्याने थोडे वर आल्यावर तारेचे कुंपण असलेले एक घर असुन या घराच्या उजव्या बाजूने कुंपणाबाहेरून एक पायवाट टेकडीवर जाताना दिसते. या वाटेने साधारण १० मिनिटे चालल्यावर वनखात्याने हद्दीच्या खुणेसाठी रचलेला दगडांचा ढीग दिसतो. थोडे पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटलेले असुन आपण डावीकडील पायवाटेने वर निघावे. या वाटेने थोडे वर आल्यावर डावीकडील झाडीत डोंगर उतारावर असलेल्या या किल्ल्याची १५-२० फुट लांब, ५ फुट रुंद व ४ फुट उंचीची गाडली गेलेली तटबंदी पहायला मिळते. या शिवाय एका बुरुजाचा तळपाया व त्यासाठी वापरलेला चुना दिसुन येतो. याशिवाय किल्ल्याच्या इतर कोणत्याही खुणा नाही असल्यास ते सर्व अवशेष येथील दाट झाडीत लपलेले आहेत. पायथ्यापासून इथवर येण्यास २० मिनिटे पुरेशी होतात. येथुन दूरवर वळणे घेत जाणारे तानसा नदीचे पात्र नजरेस पडते. सायवानची हि टेकडी मंदाकिनी,तुंगारेश्वर पर्वत, गुमतारा,कामनदुर्ग, मांडवी,टकमकगड या सारख्या किल्ल्यांनी वेढलेली आहे. इ.स.१६५७ साली महाराजांनी कल्याण-भिवंडी घेतल्यावर मराठ्यांच्या या भागातील हालचाली वाढल्या व पोर्तुगीजांच्या ताब्यातील सायवनवर वचक ठेवण्यासाठी त्यांनी या भागात तानसा नदीजवळ एक टेहळणी बुरुज बांधला. त्यावेळी सायवन किल्ल्यास चार बुरुज असुन त्यावर दहा तोफा असल्याचे उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रात येतो. त्याकाळी भरतीच्या वेळेस जहाजांचा प्रवास वैतरणा खाडी व तेथुन तानसा नदीतुन थेट सायवनपर्यंत होत असे. इ.स.१६८३ साली संभाजी महाराजांनी उत्तर कोकणात पोर्तुगीजांवर घातलेल्या धाडीत सायवानचा उल्लेख येतो. १५ नोव्हेंबर १७२३ साली सरदार पिलाजी जाधव यांनी चार हजार स्वारानिशी सायवानवर हल्ला केला व पोर्तुगीजांना जरब बसविली. इ.स.१७३९ साली चिमाजीअप्पांच्या वसई मोहीमेवेळी जोसे द मिरांडा सायवानचा किल्लेदार होता. यावेळी चिमाजीअप्पा यांनी वसई जवळील बहादरपुरा येथुन ३००० सैन्य पाठवुन २१ एप्रिल १७३७ साली किल्ल्याला वेढा दिला. १३ दिवसांनी किल्लेदार जोसे द मिरांडा शरण आल्याने किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. यावेळी किल्ल्यातुन बराचसा दारुगोळा व धान्य मराठ्यांना मिळाले. साष्टीच्या बखरीत सायवानला मजबुत तटबंदी असल्याचा उल्लेख येतो. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील इतर लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar