SAINT GEORGE FORT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : MUMBAI

HEIGHT : 0

GRADE : EASY

छत्रपती शिवाजी टर्मिनसला लागून असलेलं सेंट जॉर्ज रुग्णालय तसं सर्वाच्याच परिचयाचं. पण कधीकाळी या रुग्णालयाच्या परिसरात एक किल्ला होता हे आज कोणालाही माहिती नाही. सध्याच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला लागून असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या जागेत हा किल्ला होता. आज हा किल्ला शिल्लक नसला तरी त्याच्या आत असलेली दारुगोळा कोठाराची वास्तु आजही अस्तित्वात असून ती सेंट जॉर्ज किल्ला याच नावाने ओळखली जाते. सध्या हि वास्तु राज्य संरक्षित स्मारक असून ती पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या ताब्यात आहे. कोठाराची हि वास्तु आजही चांगल्या स्थितीत असुन त्याची वेळोवळी दुरुस्ती करण्यात आली आहे. हा किल्ला जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा त्याचे उत्तरेकडील टोक सध्याच्या मसजीद भागात महात्मा फुले मंडई समोर मोहम्मद अली रोडच्या सुरवातीला असलेल्या पेट्रोल पंपच्या जवळपास होते. २००२ पर्यंत येथे जमिनीत गाडलेली एक भलीमोठी तोफ होती ... पण सध्या ती येथे अस्तित्वात नाही. सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या फाटकातून आत शिरल्यावर रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी उजव्या बाजूच्या रस्त्याला गेलं की डाव्या बाजूला एक रस्ता जातो. या रस्त्यावरून पुढे जाताना समोरच ब्रिटिशकालीन दगडाच्या भक्कम भिंती दिसतात. या भिंतीवर पुरातत्त्व विभाग अशी पाटी लावलेली आहे. पुरातत्त्व विभागाचं हे कार्यालय म्हणजे पूर्वीच्या सेंट जॉर्ज किल्ल्याचे दारूगोळ्याचं कोठार होय. किल्ल्यातील हि वास्तु आजही तिच्या मूळ स्वरूपात शिल्लक आहे. किल्ल्याचे इतकेच काय ते शिल्लक राहिलेले अवशेष. सेंटजॉर्ज किल्ल्यातील ही वास्तू दक्षिणाभिमुख आहे. या वास्तूच्या पोर्तुगीज धाटणीच्या अतिशय जाडजूड भिंती बाहेरच्या बाजुला उताराच्या तर आतील बाजुस जमिनीशी काटकोनात बांधल्या असल्याने या भिंतींना मजबुती आली आहे. या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला गोळीबारासाठी खाचा असुन हवा खेळती राहण्यासाठी झरोके आहेत. या खाचा आतील बाजुने एकेरी दिसत असल्या तरी बाहेरच्या दिशेला मात्र त्या दुहेरी आणि तिहेरी आहेत. बाहेरून या खाचा उंच व लांबट दिसत असल्या तरी आतील बाजुने त्या निमुळत्या आहेत. कार्यालयीन वापरामुळे या खाचा व झरोके काही ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. कोठाराच्या मुख्य दालनाच्या मधोमध दारुगोळा साठवण्याचे दालन असुन या दालनांना पूर्व-पश्चियम व दक्षिणेला मार्गिका व उत्तरेकडे एक छोटी खोली आहे. मार्गिकांचे छत गोलाकार असुन मधल्या खोलीचं छत निमुळते चौकोनी आकाराचं आहे. कोठाराच्या पश्चिोम व दक्षिण मार्गिकांखाली तळघर असुन त्यात जाण्यासाठी कार्यालयाच्या आतील भागात जमिनीलगत एक लाकडी दरवाजा आहे. हा दरवाजा वरच्या दिशेने उघडला की आत एक भुयारी मार्ग पाहायला मिळतो. या भुयारी मार्गात उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी आहे. भुयारी मार्गात पाणी असल्याने व तळघराचा पुढचा मार्ग बुजून गेल्याने तिथे कोणी उतरत नाही. त्याचा वापर नेमका कशासाठी होत असावा ते स्पष्ट होत नाही. या किल्ल्यात आणखी एक भुयार होतं जे आता रुग्णालयातील स्वाइन फ्लू विभागात आहे. या वास्तुच्या पूर्वेकडील बाजूस पी डिमेलो रोड असुन त्याला लागुनच असलेल्या कोठाराच्या भिंतीत गोळीबाराच्या खाचा व झरोके पहायला मिळतात. सध्या या भिंतीवर झाडी-झुडुपे वाढली आहेत. ब्रिटिशांना नेपोलियन भारतावर चालून येईल अशी भीती वाटत होती आणि जर त्याने मुंबईवर हल्ला केला तर मुंबईतील गोऱ्या लोकांच्या बचावासाठी ब्रिटिशांनी फक्त त्यांच्याच वास्तव्याकरीता मुख्य किल्ल्याच्या उत्तरेस पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ मुंबई किल्ल्याला जोडूनच इ.स. १७६९ मध्ये फोर्ट जॉर्ज हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या पूर्वेकडील भिंतीस लागून असलेल्या समुद्रात गलबते नांगरण्याची सोय होती. युद्धाच्या धामधुमित संकटकालीन योजना म्हणून बांधलेला हा किल्ला अत्यंत काळजीपूर्वक बांधला असुन वास्तूच्या बाह्य भिंतीचे स्वरुप व झरोके काळजीपूर्वक केलेल्या नियोजनाची साक्ष देतात. या किल्ल्यातील वास्तूंना तळघरे होती व ती अन्य वास्तूंच्या तळघरांना भूमिगत मार्गांनी जोडली होती. नेपोलियनचे आक्रमण झाल्यावर मुख्य किल्ल्यावरील व नौदलातील लोक फ्रेंच सेनेशी लढताना अपयशी झाल्यास सर्व ब्रिटिश मंडळी गलबतांमधून ठाण्याला किंवा पनवेलला मराठ्यांच्या आश्रयाला जातील अशी ही योजना होती. गव्हर्नर बाऊचियरने मराठ्यांशी तशी बोलणी केली होती. इंग्रज-फ्रेंच युद्धात फ्रान्सच्या पराभवानंतर ब्रिटिशांना सागरी शत्रू उरलेच नाहीत. नंतरच्या काळात ब्रिटिशांचा संपुर्ण भारतावर अंमल आला. इ.स. १८६२ ते १८६५ या काळात सर बार्टर फ्रियन याने हा किल्ला पाडून टाकला. नंतर १८८९ ते १८९२ या काळात मुंबईच्या बंदर व रेल्वे विकासासाठी या भागात अनेक बदल घडविण्यात आले. किल्ल्याच्या आवारात एक रुग्णालय बांधुन त्याला सेंट जॉर्जच नाव देण्यात आलं टाकली. रुग्णालय बांधताना तटबंदी पाडून आतील वास्तूही पाडून टाकल्या गेल्या किंवा त्याच्या रचनेत बदल करण्यात आला व दारूगोळा कोठार सोडुन खुद्द ब्रिटिशांच्या काळात किल्ल्याचे स्वरूपच बदलून गेले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी काही निवासस्थाने बांधण्यात आली. इ.स.१८२७ साली बनविण्यात आलेल्या नकाशात सेंट जॉर्ज किल्ला स्पष्टपणे दाखविण्यात आला आहे. दारुगोळा कोठाराचे वर्णन फ्रॅगमेंट ऑफ ओर्ल्ड फोर्ट वॉल असे करण्यात येत असे. ब्रिटिश लोक अत्यंत कमी शक्यता असलेल्या गोष्टींचाही काळजीपूर्वक विचार करून त्यावर ठोस उपाययोजना करत याचे हा किल्ला एक उत्तम उदाहरण आहे. (संदर्भ-मुंबई परिसरातील अर्थात एकेकाळच्या फिरंगणातील किल्ले- लेखक भा.वि.कुलकर्णी)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!