SAGARESHWAR

TYPE : MEDIEVAL SHIVMANDIR

DISTRICT : SINDHUDURG

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले - उभादांडा येथील सागरेश्वर किना-यावरील श्री सागरेश्वराचे मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. वेंगुर्ल्याहून रेडीकडे जाताना खाडी पुलानंतर उभादांड हे गाव लागते. या गावातुन मुख्य रस्त्याहून उजवीकडे वळून सागरेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता लहान असल्याने छोटे वाहन देखील सांभाळून न्यावे लागते. शांतता, नैसर्गिक सान्निध्य असलेल्या ह्या मंदिरात बीचवर आलेले पर्यटकही भेट देतात. दगडी बांधकामातील हे पुरातन शिवालय समुद्रकिनाऱ्यावर सुरुच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले असुन मंदिराच्या चारही बाजूला भक्कम तटबंदी आहे. जमिनी पातळीपासून पासून ५ ते ६ फुट खाली असणारे हे मंदीर बांधताना जमीनीला समांतरच होते पण समुद्रावरून सतत उडणाऱ्या वाळूमुळे आसपास वाळु जमा होऊन त्याची टेकडी झाली व मंदिर जमीन पातळीपासून खाली गेले आहे. ... मंदिराच्या आवारात दरवाजा समोरच औदुंबरचे झाड असुन त्याच्या एका बाजूला षटकोनी दीपमाळ तर दुसऱ्या बाजुस तुळशी वृंदावन आहे. याशिवाय मंदिराच्या आवारातच भक्त निवासासाठी दोन तीन खोल्या आणि एक विहीर आहे. समुद्रापासून अगदी जवळ असुनही या विहीरीचे पाणी गोड आहे. मंदिराची रचना गाभारा व सभागृह अशी असुन गाभाऱ्याच्या दारावर गणेशपट्टी व वरील बाजुस कीर्तिमुख आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजुस देवी भगवतीची तर डाव्या बाजुस गणपतीची दगडी मुर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये सोवळ्याशिवाय प्रवेश नाही. गाभाऱ्याच्या भिंतीत मंदिराचा इतिहास सांगणारा दगडामध्ये देवनागरीत कोरलेला एक शिलालेख बसवलेला असुन त्यावरील मजकुरात खोडाखोड केलेली आहे त्यामुळे तो सप्रमाण मानता येत नाही. शिलालेखात कोरलेल्या मजकुराप्रमाणे शके १७७७ मध्ये म्हणजेच इ.स.१८५५ साली सांडे नावाच्या एका ब्राम्हणास किनाऱ्यावर वाळुमध्ये रुतलेले शिवलिंग सापडले. सागरतीरी सापडले म्हणुन याचे नाव सागरेश्वर. सावंतवाडी संस्थानाने ही जमीन देवस्थानास इनाम म्हणुन दिलेली आहे. महाशिवरात्रीस येथे मोठा उत्सव असतो. सागरतीरी हे मंदिर असल्याने सोमवती तसेच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्थानात तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंग देवता व रयत या सागरेश्वर किनारी येतात. श्री देव सागरेश्वर मंदिर व सागरेश्वर किनारा हे वेंगुर्ला तालुक्यातील महत्वपुर्ण पर्यटन स्थळ आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!