SACHIN
TYPE : FORTRESS
DISTRICT : SURAT
HEIGHT : 0
GRADE : EASY
सुरत किल्ल्याची भटकंती करताना आम्हाला सुरत शहरापासुन जवळच असलेल्या सचीन संस्थानाची व तेथे असलेल्या किल्ल्याविषयी माहिती मिळाल्याने आमची पाउले आपसुकच तेथे वळली. सचीन हे रेल्वे स्थानक असुन सुरत रेल्वे स्थानक ते सचिन रेल्वे स्थानक हे अंतर १० कि.मी. आहे. सचीन हे संस्थान व किल्ला सुरत किल्ल्यापासुन साधारण २० कि.मी.अंतरावर आहे. सचीन फोर्ट अशी या वास्तुची ओळख असली तरी हा किल्ला नसुन उत्तर पेशवेकाळात बांधलेली गढी आहे. हि गढी सचिन पोलीस ठाण्याजवळ असुन पोलीस ठाण्याजवळ आल्यावर रस्त्याशेजारी असलेली गढीची तटबंदी नजरेस पडते. गढीची मालकी खाजगी असल्याने परवानगी घेऊनच आत प्रवेश करावा. गढीची जुनी तटबंदी विटांची असली तरी आता मात्र त्यावर सिमेंटचा मुलामा चढवण्यात आला आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार, रस्त्याच्या दिशेने दोन व मुख्य दरवाजा शेजारी दोन असे एकुण आठ बुरुज आहेत.
...
गढीचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेस दोन बुरुजात बांधलेले असुन पुर्व दिशेला दुसरा दरवाजा आहे. गढीच्या दोन्ही दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या आहेत. गढीच्या आतील बाजुस चार टोकावर असलेल्या बुरुजात कोठार बांधलेली आहेत. गढीचा आतील संपुर्ण परीसर सपाट करण्यात आला असुन कोणत्याही वास्तु शिल्लक नाहीत. आता थोडे सचिन संस्थानाच्या इतिहासाकडे पाहूया. जंजीरा संस्थानाचा शासक सिद्दी अब्दुल रहमान याचा मुलगा सिद्दी अब्दुल करीम याचा वारसा हक्क डावलुन सिद्दी जोहर याने जंजीरा संस्थानाचा ताबा घेतला. त्यामुळे सिद्दी अब्दुल करीम हा पुण्याला पेशव्यांच्या आश्रयास आला. त्याने १७९१ मध्ये मराठ्यांशी करार केला व आपले जंजिरावरील सर्व हक्क सोडले. या बदल्यात त्याला त्यावेळी खानदेशात असलेला हा प्रदेश व त्याच्या आसपास असलेली २७ गावे जहागीरी म्हणुन बहाल करण्यात आली. मराठयांच्या अधीन राहुन इ.स. १७९१ साली सिद्दी अब्दुल करीम मोहम्मद खान यांनी नवाब हि पदवी धारण करत सचिन राज्याची स्थापना केली व या राजघराण्याची सुरुवात झाली. ब्रिटीश काळात या संस्थानास ९ तोफांच्या सलामीचा मान होता. या संस्थानाचे स्वतःचे घोडदळ, न्यायालय,चलन आणि स्टॅम्प पेपर होते, तसेच आफ्रिकन लोकांचा समावेश असलेले बँडपथक होते. नवाब सिद्दी इब्राहिम मुहम्मद याकूत खान तिसरा याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुर्व आफ्रिकन मोहिमेत विशेष कामगिरी बजावली. इ.स. १७९१ ते १९४७ या काळात या घराण्यात एकुण ७ नवाब होऊन गेले. त्यांची नावे व कारकीर्द खालीलप्रमाणे—
६ जून १७९१ ते ९ जुलै १८०२ अब्दुल करीम मोहम्मद याकुत खान पहिला
९ जुलै १८०२ ते २५ मार्च १८५३ इब्राहिम मोहम्मद याकुत खान पहिला
२५ मार्च १८५३ ते १ डिसेंबर १८६८ अब्दुल करीम मोहम्मद याकूत खान दुसरा
१ डिसेंबर १८६८ ते ४ मार्च १८७३ इब्राहिम मोहम्मद याकुत खान दुसरा
४ मार्च १८७३ ते ७ जानेवारी १८८७ अब्दुल कादिर खान
७ फेब्रुवारी १८८७ ते १९ नोव्हेंबर १९३० इब्राहिम मोहम्मद याकुत खान तिसरा
१९ नोव्हेंबर १९३० ते १५ ऑगस्ट १९४७ हैदर मोहम्मद याकुत खान
सचिन राज्याचे शेवटचे शासक नवाब सिद्दी इब्राहिम मुहम्मद याकूत खान तिसरे यांनी ८ मार्च १९४८ रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वाक्षरी केली व हे राज्य त्यावेळच्या मुंबई प्रांतातील सुरत जिल्ह्याचा भाग बनले.
© Suresh Nimbalkar