SAAP

TYPE : GADHI

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रात मध्ययुगीन काळातील अनेक वास्तु असल्या तरी त्या वास्तु त्याच्या मूळ स्वरुपात पहायला मिळणे तसे कठीणच पण याला अपवाद ठरते ती साप येथील सरदार कदम यांची गढी. पर्यटकांच्या माहितीपासुन दुर असलेली हि गढी आजही तिच्या मुळ स्वरुपात असल्याने चित्रपट निर्मात्यांच्या चांगलीच परिचयाची आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले असुन आजही काही न काही चित्रीकरण सुरु असते. असे असले तरी सध्या इंदोर येथे स्थायीक असलेले सरदार कदम यांचे वंशज इंद्रोजी कदम यांच्या परवानगीने आजही पर्यटकांना हि गढी आत बाहेरून पहाता येते. साप राजवाडा म्हणुन ओळखली जाणारी हि गढी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात रहिमतपुरपासुन केवळ ५ कि.मी. अंतरावर असल्याने येथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. आयताकृती आकाराची हि गढी दीड एकरपेक्षा जास्त परिसरात पुर्वपश्चिम पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत एकुण सहा बुरुज आहेत. ... गढीचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन या दरवाजाच्या दोन्ही बाजुला दोन व चार टोकाला चार अशी या बुरुजांची रचना आहे. तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग घडीव दगडांनी बांधलेला असुन त्यावरील भाग मात्र विटांनी बांधलेला आहे. संपुर्ण तटबंदीमध्ये बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा,त्यातील दिंडी दरवाजा व वरील बाजुस असलेला नगारखाना आजही सुस्थितीत असुन या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. यातील एका खोलीतुन फांजीवर जाण्यासाठी दगडी जिना आहे. इतर कोठुनही फांजीवर जाण्यासाठी मार्ग नाही. गढीत प्रवेश केल्यावर समोरच सरदार कदम यांचा लाकडी बांधकामातील दुमजली चौसोपी वाडा नजरेस पडतो तर डाव्या बाजुस कारंज्यासाठी बांधलेला हौद पहायला मिळतो. दरवाजाशेजारील तटबंदीत असलेल्या तुळईच्या खोबण्या पहाता या ठिकाणी कधीकाळी घोड्याच्या पागा असाव्यात. गढीच्या आवारात वाडयाभोवती फेरी मारताना हौदाच्या पुढील भागात दगडी रहाट असलेली व घडीव दगडात बांधलेली भलीमोठी विहीर पहायला मिळते. विहिरीच्या पुढील भागात एका वास्तुचे अवशेष नजरेस पडतात. गढीच्या उर्वरीत आवारात बाग केलेली असल्याने इतर कोणतेही अवशेष ठळकपणे दिसुन येत नाहीत. गढीचे आवार पाहुन आपला गढीतील वाडयात प्रवेश होतो. वाडयाचे एकुण आकारमान पहाता या वाडयाला दोन सोपे असावेत पण वाडयाच्या आतील भागात कदम यांच्या वंशजांचे वास्तव्य असल्याने आपल्याला केवळ बाहेरील सोप्यात प्रवेश मिळतो. या ठिकाणी मध्ययुगीन काळातील अनेक वस्तु नीटपणे मांडुन ठेवण्यात आलेल्या आहेत. या सोप्याच्या दोन बाजुच्या भिंतीमधुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत. वाड्याची रचना अतिशय सुंदर असुन आपण वाड्यात प्रवेश करतो त्याच्या वरील बाजुस कोरीव लाकडी खांबांनी सजवलेला अतीशय सुंदर असे सभागृह आहे. येथे आपली गढीची फेरी पुर्ण होते. याशिवाय गढीबाहेर उजव्या बाजुस असलेल्या शेतात गोलाकार आकाराची एक भलीमोठी सहा मोटेची दगडी बांधकाम असलेली विहीर पहायला मिळते. या विहिरीत उतरण्यासाठी तळापर्यंत गोलाकार दगडी पायऱ्या असुन या पायऱ्यांच्या वाटेवर या विहिरीच्या बांधकाम संदर्भातील देवनागरी व उर्दु भाषेत दगडावर कोरलेला शिलालेख वाचायला मिळतो. संपुर्ण गढी व परीसर फिरण्यास एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!