ROHILGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : JALNA
HEIGHT : 2060 FEET
GRADE : MEDIUM
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहीलागड नावाचे एक लहान खेडेगाव आहे. जालना जिल्ह्यात असलेला पाच गडकोटापैकी एकमेव गिरीदुर्ग असलेला रोहिलागड नावाचा दुर्लक्षित किल्ला या गावात आहे. गावामागे एका मध्यम आकाराच्या डोंगरावर असलेल्या या किल्ल्याची निर्मिती नेमकी कोणी केली हे माहित नसले तरी डोंगराच्या अर्ध्या उंचीवर खोदलेली लेणी या किल्ल्याचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. तालुक्याचे शहर असलेले अंबड हे मध्ययुगीन काळातील एक महत्वाची बाजारपेठ होते. अंबड देवगिरी हा व्यापारी मार्ग या गावाजवळुन जात असल्याने या भागात असलेला हा एकमेव डोंगर पहाता या मार्गाचे रक्षण करण्यासाठी रोहीलागड किल्ल्याची उभारणी करण्यात आली असावी. किल्ल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणी करण्याकरता होत असावा. रोहीलागड गाव औरंगाबादहुन ४० कि.मी. तर जालन्याहुन ३५ कि.मी. अंतरावर असुन औरंगाबाद-बीड महामार्गावरील रोहिलागड फाट्याहुन ७ कि.मी. आत आहे.
...
गावात शिरताना वाटेतील महादेव मंदिराबाहेर काही कोरीव शिल्प व मंदिराचे घडीव कोरीव खांब नजरेस पडतात. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या लेण्यासमोरील सपाट जागेत गावकरी शेती करत असल्याने गावातुन या लेण्यापर्यंत जाण्यासाठी मळलेली वाट आहे. गावातुन १५ मिनिटात आपण या लेण्यापर्यंत पोहोचतो. डोंगरावरून वाहुन आलेल्या दगडमातीमुळे लेण्याचा दर्शनी भाग मोठया प्रमाणात बुजलेला आहे. अर्धवट कोरलेले हे लेणे बऱ्यापैकी मोठे असुन लेण्याचे छत ११ खांबावर तोललेले आहे. लेण्याच्या दर्शनी भागात खडकात खोदलेले पण सद्यस्थितीत बुजलेले एक पाण्याचे टाके आहे. या टाक्यात उतरण्यासाठी लेण्याच्या आतील बाजुस पायऱ्या कोरलेल्या आहेत. लेण्याच्या एका अर्धवट कोरलेल्या देवडीत उगीचच शेंदुर फासलेला आहे. या लेण्याशेजारी अजून एक मोठे लेणे लेणी असुन या लेणीमुखावर मोठया प्रमाणात दगडमाती पसरल्याने हे लेणे आतून पहाता येत नाही. लेण्यापासून गडमाथा केवळ काही फुट उंचीवर असुन त्यावर चढाई करण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट लेण्याच्या माथ्यावरून सरळ वर चढत जाते तर दुसरी वाट लेण्याच्या डावीकडुन डोंगराला वळसा घालत वर चढते. समोरील चढ दिसायला सोपा असला तरी त्यावर असलेल्या मुरमाड मातीने अनेकदा घसरायला होते. यामुळे शक्यतो दुसऱ्या वाटेने जावे शिवाय दुसऱ्या वाटेने गेल्यास या वाटेच्या वरील भागात असलेले खडकात खोदलेले गुहेवजा भलेमोठे कोरडे खांबटाके पहायला मिळते. या टाक्याच्या दर्शनी भागात दोन खांब असुन आतील भागात असलेले खांब मात्र पूर्णपणे कोसळले आहेत. मुळात कमी पाऊस असलेल्या या भागात तसेच ठिसुळ दगड असल्याने या टाक्यात पाणी टिकून राहणे ही कठीण गोष्ट आहे व कदाचीत याचमुळे हा किल्ला ओस पडला असावा. येथुन पुढे आल्यावर रचीव तटबंदीचे अवशेष पहात आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. आपण प्रवेश करतो त्याशेजारी डाव्या बाजुस एक उंचवटा आहे. बुरुजासारखा दिसणारा हा भाग म्हणजे किल्ल्यावरील सर्वात उंच भाग असुन या उंचवट्यावर एका वास्तुच्या बांधकामाच्या भिंती पहायला मिळतात. येथुन आपल्याला संपुर्ण किल्ला एका नजरेत पहायला मिळतो. साधारण त्रिकोणी आकार असलेला किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून २०७० फुट उंचावर असुन किल्ल्याचा परीसर ५ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याचे दक्षिणेकडील टोक म्हणजे ४५० फुट लांब व ७५ फुट रुंदीची डोंगरसोंड आहे. या उंचवट्याच्या उजव्या बाजुस सपाटीवर आपल्याला नाणेघाटाची आठवण करून देणारा दगडी रांजण पहायला मिळतो.पण या रांजणाचा खालील तळ मात्र फुटलेला आहे. येथुन डाव्या बाजुने म्हणजे रोहिलागड गावाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या किल्ल्याच्या तटावरून गडफेरीस सुरवात करावी.वाटेच्या सुरवातीला खडकात खोदलेले साचपाण्याचा तलाव आहे. पावसाळा वगळता यात पाणी नसते. वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले पाण्याचे खांबटाके असुन यात खांब असलेल्या भागात मोठया प्रमाणात माती साठलेली आहे तर बाहेरील भागात मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढलेली आहे. थोडीशी कसरत करत या झाडीतुन टाक्यात उतरल्यावर या टाक्याचा आतील खांब असलेला भाग पहायला मिळतो. या टाक्याजवळ दुसरे कोरडे पडलेले साधे टाके असुन त्यात देखील झाडी वाढलेली आहे. या वाटेने आपण किल्ल्याच्या दक्षिण सोंडेच्या टोकावर पोहोचतो. येथुन परत फिरल्यावर आपल्याला गडाच्या पश्चिमेस घडीव दगडात बांधलेली सुस्थितीतील तटबंदी व त्याशेजारील बुरुज पहायला मिळतो. पुढे गावाच्या दिशेने सरळ आल्यावर आपल्याला गडावरील एका मोठया वास्तुचे अवशेष व त्याशेजारी बुजलेले पाण्याचे टाके दिसते. किल्ल्याचा उर्वरित माथा म्हणजे पठार असुन या पठारावर मोठया प्रमाणात दगड विखुरलेले आहेत. गावाच्या दिशेने असलेल्या या टोकावर भगवा झेंडा रोवलेला आहे. येथुन संपुर्ण रोहीलागड गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. येथुन सुरवातीला वर्णन केलेल्या वाटेने खाली लेणीकडे उतरता येते अथवा आल्या वाटेने परत जावे हे उत्तम. संपुर्ण गड फिरून परत जाण्यास तीन तास पुरेसे ठरतात. स्थानिकांना या किल्ल्याबद्दल माहिती विचारली असता त्यांनी या गावात पुर्वी रोहिले लोक राहत असल्याने गडास रोहिलागड नाव पडल्याचे सांगितले. विशाल टकले या गावातील दुर्गमित्राने काही गावकऱ्यांच्या मदतीने गडाचे संवर्धनकार्य हाती घेतले आहे. आपण गड पहायला गेल्यास मदतीसाठी विशालला ७५१७८९४६५० या क्रमांकावर फोन करावा.
© Suresh Nimbalkar