RASHIN
TYPE : FORTRESS
DISTRICT : AHMEDNAGAR
महाराष्ट्रात कर्जत नावाने ओळखले जाणारे दोन तालुका आहेत. यातील एक तालुका रायगड जिल्ह्यात आहे तर दुसरा अहमदनगर जिल्ह्यात. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणारे राशीन हे एक ऐतिहासिक गाव. या गावात असलेले जगदंबा मंदिर हे राशीन गावचे तसेच पंचक्रोशीतील अनेक लोकांचे कुलदैवत आहे. मध्ययुगीन काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर राशीन गावाचा वैभवशाली वारसा आहे. या मंदिराशिवाय मध्ययुगीन काळाशी नाते सांगणाऱ्या अजून काही वास्तु गावात आहे. पण काही भटकी मंडळी व इतिहास अभ्यासक वगळता इतरांना या वास्तु फारशा माहित नाहीत. या वास्तु म्हणजे भोसले घराण्यातील तीन व्यक्तींच्या समाधी, काळे देशमुख यांची गढी तसेच गावाभोवती जीर्ण अवस्थेत असलेले नगरकोटाचे अवशेष. या सर्व वास्तु राशीन गावाचे मध्ययुगीन काळात इतिहासाशी असलेले नाते घट्ट करतात. कर्जत तालुक्यात असलेले राशीन हे गाव कर्जत या तालुक्याच्या ठिकाणाहून १६ कि.मी.अंतरावर तर दौंड शहरापासून सिद्धटेक मार्गे ४२ कि.मी.अंतरावर आहे.
...
पुणे - सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून हे गाव फक्त २८ कि.मी अंतरावर आहे. राशीन गावात असलेली काळे देशमुख यांची गढी गावाच्या मध्यवर्ती भागात असून गावात प्रवेश करताना दुरूनच जगदंबा मंदीर व त्याच्या परिसरात असलेल्या तीन समाधी पहायला मिळतात. गावाभोवती असलेला नगरकोट आता पूर्णपणे नष्ट झाला असून त्याचे केवळ दोन बुरुज अवशेष रुपात शिल्लक आहेत. गावात असलेली गढी हे आपले सर्वप्रथम ध्येय असल्याने आपण सर्व प्रथम या गढीची फेरी आटोपून घेऊ. आयताकृती आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असून गढीची तीन बाजुची तटबंदी व त्यात असलेले दोन बुरूज आजही चांगल्या स्थितीत आहे. गढीची एका बाजूस असलेली तटबंदी पाडुन त्या ठिकाणी नव्याने बांधलेले घर आहे. या घरात बापूसाहेब काळे देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. गढीची तटबंदी साधारण २५ फुट उंच असून तिचे तळातील १०-१२ फुटाचे बांधकाम दगडांनी व त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या बांधकामात काही ठिकाणी घडीव दगडांचा वापर केलेला आहे. बांधकामाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. गढीच्या आत शिरल्यावर दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्याचे रुपांतर आता कार्यालयात करण्यात आले आहे. आत दरवाजासमोर असलेली वास्तु वगळता इतर वास्तुंची पडझड झाली असून काही वास्तु नव्याने बांधण्यात आल्या आहेत. गढीच्या आतील भागात कोणतीही मूळ वास्तु शिल्लक नसल्याने १५ मिनिटात आपली गढीची फेरी पूर्ण होते. गढी पाहून झाल्यावर गावाबाहेर असलेल्या जगदंबा मंदिराकडे यावे. या मंदिराच्या प्रांगणाबाहेर तीन मोठ्या समाधी असुन या समाधी छत्रपती भोसले घराण्यातील शरीफजी, त्रिंबकजी आणि त्यांच्या पत्नीच्या असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. . हे शरीफजी भोसले म्हणजे शहाजीराजेंचे बंधू होत. राशीन गावची पाटीलकी भोसले घराण्याकडे तर देशमुखी काळे घराण्याकडे होती. जगदंबा मंदिर गावाच्या दक्षिण भागात असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडे एक भला मोठा नगारखाना आहे. जगदंबा मंदिराची रचना तीन भागात केलेली असून त्याचे बाहेरील प्रांगण, दगडी प्रदक्षिणा मार्ग व सभामंडप असे तीन भाग पडतात.तटबंदीच्या आत असलेल्या या मंदिराच्या आत तटाला लागुन चारही बाजूंनी ओव-या आहेत. मंदिरासमोर दोन दीपमाळा असुन या दीपमाळा आत शिरून हलवल्यास हलतात असे सांगतात पण आत जाण्याचा मार्ग बंद असल्याने आम्हाला हा अनुभव घेता आला नाही. हे दरवाजे फक्त दसऱ्याच्या दिवशी उघडले जातात. मंदिर परिसरात आपल्याला अनेक वीरगळ व सतीशीळा पहायला मिळतात. देवीचे मुख्य मंदिर मध्ययुगीन काळातील असुन ओव-या आणि प्रवेशद्वार २५० वर्षापूर्वी पेशवाईतील सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांनी बांधल्याचा मराठी व एक संस्कुत असे दोन शिलालेख येथे आहेत. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर असलेल्या शिलालेखात देवीचा 'श्री यमाई' असा उल्लेख येतो. मंदिराच्या आवारात एकुण चार शिलालेख वाचायला मिळतात. यातील एका शिलालेखात सुपे येथील गंधे कुलकर्णी यांनी शके १६६० मध्ये काही ओवरया बांधल्याचा उल्लेख येतो. याशिवाय उर्वरित बांधकाम राशीन येथील शेटे घराण्यातील व्यक्तींनी केल्याची साक्ष उर्वरित शिलालेख देतात. गर्भगृहात यमाई देवीची चतुर्भूज मूर्ती असून देवीच्या उजव्या बाजूला तुकाई हे तुळजापुरचे स्थान आहे. राशीनच्या इतिहासाचा सर्वात जुना पुरावा म्हणजे इ.स.७०० मधील विनयादित्य चालुक्य आणि इ.स.८०७ मधील राष्ट्रकुट गोविंद तिसरा याचे येथे सापडलेले ताम्रपट होते. या ताम्रपटात राशीनचा "भुक्ती" असा उल्लेख येतो. निजामशाहीच्या अस्तानंतर दक्षिणेत मोगलांचा अंमल बसला त्यावेळी राशीन येथील पाटीलकी भोसले घराण्याकडे होती. हे भोसले श्री छत्रपती शिवाजीराजे यांचे चुलते शरीफजी भोसल्यांचे वंशज आहेत. शरीफजी आणि त्यांचा मुलगा त्र्यंबकजी हे औरंगजेबांच्या चाकरीत असताना औरंगजेबाने त्यांना भिवथडीकडे रवानगी केले तेव्हापासुन हे घराणे येथेच स्थायिक झाले. औरंगजेबाने राशीन जवळ औरंगपुर नावाची पेठ बसविण्याचा हुकुम दिला. देवीच्या मंदिर परीसरात असलेली मंगळवार पेठ म्हणजे जुनी औरंगपुर पेठ आहे. इ.स.१७५८ मध्ये अहमदनगर किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला त्या कविजंग सरदाराचे राशीन हे जहागिरीचे गांव होते. त्यानंतर अहमदनगर आणि राशीनसह आसपासचा परीसर मराठ्यांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar