RASALPUR

TYPE : SARAI

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ असे म्हटले जाते. साधारण सहाशेच्या आसपास दुर्गसंपदा असणाऱ्या महाराष्ट्राइतकी दुर्ग विविधता अन्य कोणत्याही प्रांतात दिसत नाही. या दुर्गांचे गिरीदुर्ग,जलदुर्ग,वनदुर्ग व स्थळदुर्ग असे भाग पडत असले तरी त्यातही काही उपप्रकार आहेत. स्थळदुर्गात भुईकोट,नगरकोट,गढी,सराई असे वेगवेगळे भाग पडतात. सराई हा स्थळदुर्ग प्रकार उत्तर भारतात मोठया प्रमाणात आढळुन येत असला तरी महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही. मध्ययुगीन काळात एका प्रांतातुन दुसऱ्या प्रांतात जाणाऱ्या लष्करी तसेच व्यापारी मार्गावर या किल्लेवजा सराई दिसुन येतात. लढाईच्या काळात लष्करी अधिकारी तेथे मुक्काम करत तर शांततेच्या काळात व्यापारी तेथे मुक्काम करीत. महाराष्ट्रात चौल,फर्दापूर,अजंठा,रसलपूर या ठिकाणी असलेल्या सराई आजही सुस्थितीत दिसुन येतात पण त्यांचा ताबा मात्र स्थानिकांनी राहण्यासाठी अथवा घरे बांधण्यासाठी घेतला असल्याने त्यांचे अस्तित्व अजुन किती काळ राहील याबाबत शंका आहे. ... रसलपूर येथे स्थानिकांच्या विळख्यात अडकलेली व सराईचा किल्ला म्हणुन ओळखली जाणारी अशीच एक वास्तु रसलपूर सराई. शिरपुर-चोपडा-यावल-रावेर-बुऱ्हाणपूर या मध्ययुगीन मार्गावर रावेर हे एक महत्वाचे ठिकाण होते. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात रावेर या तालुक्याच्या शहरापासून २ कि.मी. अंतरावर रसलपूर गाव आहे. या गावाच्या मध्यभागी रसलपूरचा भुईकोट किल्ला म्हणजेच सराई आहे. सराईच्या आसपास नव्याने वसलेल्या घरांमुळे हा किल्ला सहजपणे दिसुन येत नाही. स्थानिक लोक या कोटाला सराईचा किल्ला म्हणुन ओळखतात त्यामुळे त्यांना विचारताना सराईचा किल्ला म्हणुन विचारावे.आयताकृती आकार असलेला हा किल्ला चार एकर परिसरावर पसरलेला असुन त्याला पुर्वेला एक मुख्य दरवाजा व उत्तरेला दुसरा लहान दरवाजा असे दोन दरवाजे आहेत. यातील उत्तरेला असलेला लहान दरवाजा एका घराच्या भिंतीत बंद झालेला असुन तो केवळ बाहेरून पहाता येतो. सराईच्या चारही बाजुला १५ फुट रुंदीचा व तितक्याच खोलीचा खंदक असुन या खंदकाच्या बाहेरील बाजुने काही ठिकाणी खंदकात उतरण्यासाठी कमानीयुक्त पायरीमार्ग आहे. खंदकाच्या दोन्ही बाजु दगडांनी बांधुन काढलेल्या असुन दगडाने बांधलेल्या तटबंदीची उंची साधारण १२ फुट आहे. या खंदकात स्थानिकांनी मोठया प्रमाणात शेण व कचरा टाकलेला असुन खंदक बुजवुन घरे बांधण्यास सुरवात केली आहे. तटबंदीच्या चार टोकाला चार बुरुज असुन बुरुजांचा तटबंदीच्या वरील उंचीचा भाग विटांनी बांधलेला आहे. बुरुजात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. तटाची रुंदी १५ फुट असुन तटाच्या आतुन वर येण्यासाठी जीने आहेत. तटबंदीच्या आत अनेक लहान लहान खोल्या असून सध्या त्यांचा ताबा स्थानिकांनी घेतला आहे. किल्ल्याच्या आत फिरताना दोन लहान विहिरी व एक मशीद पहायला मिळते. कोटाच्या आत वाढत असलेल्या वस्तीने इतर सर्व अवशेष पुर्णपणे नष्ट केले आहेत. कोटाच्या मुख्य दरवाजाबाहेर म्हणजेच पुर्वेस असलेला खंदक पुर्णपणे बुजवलेला असुन दरवाजातील देवडीचा ताबा स्थानिकांच्या घरांनी घेतला आहे. संपुर्ण कोट आत बाहेरून पहाण्यास एक तास पुरेसा होतो. मध्ययुगीन काळात बांधलेली हि सराई केवळ वास्तव्यासाठी असल्याने येथे कोणत्याही ऐतिहासिक घटना घडलेल्या नसाव्यात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!