RAJGURUNAGAR
TYPE : NAGARKOT
DISTRICT : PUNE
पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीच्या काठावर असलेले राजगुरुनगर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या खेड गावाचे हुतात्मा क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या नावावरून राजगुरूनगर असे नामकरण करण्यात आले. खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या गावी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान देत प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा वाडा आहे. पुणे-नाशिक महामार्गावर असलेले राजगुरूनगर हे गाव पुणे शहरापासुन ४० कि.मी. अंतरावर आहे. खेड शहर हे शिवपुर्वकाळापासूनच अस्तीत्वात असल्याने या गावास नगरकोट असणे सहाजिकच आहे. काळाच्या ओघात हा कोट व त्याची तटबंदी जरी नष्ट झाली असली तरी कोटाचा दरवाजा गावाच्या वेशीच्या स्वरूपात आजही शिल्लक आहे. जुन्या खेड गावात आपला प्रवेश हा या वेशीतुनच होतो. या वेशीतुन आत शिरल्यावर गावाच्या दुसऱ्या टोकाला भीमा नदीच्या काठावर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा वाडा आहे. अतिशय प्रशस्त असलेल्या या वाड्याची जरी पडझड झाली असली तरी याचा ठराविक भाग अतिशय उत्तम प्रकारे जतन केलेला आहे.
...
वाड्याचा उर्वरीत भागाचे स्मारक केल्याने त्याची उत्तमप्रकारे देखभाल केली जात आहे. या स्मारकाची भटकंती करताना आपल्याला क्रांतिकारक राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेली खोली पहायला मिळते. हि खोली आजही तिच्या मूळ स्वरूपात जतन केलेली असुन या खोलीजवळ एक बळद अथवा पेव म्हणजे अन्नधान्याचे कोठार आहे. या वाड्याचा स्मारक म्हणुन विकास करताना त्याचे मूळ स्वरूप कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाड्याचा दर्शनी भाग शिल्लक असला तरी आतील दुमजली भाग दुरुस्त करण्यासाठी या बांधकामात पूर्वीप्रमाणे लाकडाचा वापर करण्यात आला आहे. वाड्याच्या आत स्वतंत्र संग्रामावर भाष्य करणारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची माहिती देणारी चित्रे लावलेली आहेत. वाडा पहाताना राजगुरू यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. या वाड्या व्यतिरिक्त आपल्याला राजगुरूनगर शहरात एका जुना घुमट व स्वातंत्र्यसेनानी मोरेश्वर सुतार यांचा वाडा पहायला मिळतो. शाहूमहाराजांनी चाकण येथील वेदशास्त्रसंपन्न रुचेश्वर ब्रम्हे यांस सातारा येथे बोलावून त्यांच्या कडून उपदेश घेतला तेव्हापासून लोक त्यांना 'राजगुरू' असे म्हणू लागले. रुचेश्वर पुढे उंब्रज येथे राहिले. शाहूराजांनी त्यांना सहा गावे इनाम करून दिली. त्यांनी खेड येथे वाडा बांधला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतात क्रांतीचे वारे वहात असताना खेड येथे याच घराण्यातील हरिपंत यांच्या घरी ऑगस्ट १९०८ मध्ये शिवराम यांचा जन्म झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण खेड येथे झाले व पुढील शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड पुणे येथे असताना शिक्षण सोडून ते इ.स.१९२३ साली अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात दाखल झाले. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ते उत्तर प्रदेश व पंजाबमधील लाला लजपतराय व पं. मदनमोहन मालवीय यांच्या आंदोलनात सहभागी झाले. दि. ३० ऑक्टोबर १९२८ या दिवशी झालेल्या सायमन हटाव या आंदोलनावर पंजाबचे पोलीस अधीक्षक स्कॉट व त्याचा सहाय्यक सँडर्स यांनी लाठीहल्ल्याचा आदेश दिला. या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले व १७ नोव्हेंबर रोजी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. खुनाचा बदला घेण्याचा विचाराने चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली एक कट शिजला व भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जयगोपाल त्यात सामील झाले. दि. २७ डिसेंबर १९२८ रोजी स्कॉटच्या कार्यालयात क्रांतिकारक शिरले असता सँडर्स समोर आला. राजगुरूंना तो स्कॉट आहे असे वाटल्याने त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या व त्यात तो जागीच ठार झाला. दि. ३० सप्टेंबर १९२९ रोजी शिवराम हरि राजगुरू पुण्यात पकडले गेले. दि. २५ ऑक्टोबर रोजी खटला उभा राहिला व एकुण १५ जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आले. जयगोपाल हा माफीचा साक्षीदार झाला. न्यायालयाने भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली. दि. २४ मार्च १९३१ रोजी असलेली फाशीची शिक्षा जनआंदोलनाच्या भितीने एक दिवस आधी म्हणजे दि. २३ मार्च १९३१ रोजी देण्यात आली व एका क्रांतीसुर्याचा अस्त झाला. शिवराम हरी राजगुरू हे एक महान क्रांतिकारक म्हणून भारताच्या इतिहासात अमर झाले. जुन्या खेड गावात प्रवेश करताना रस्त्याच्या विरुद्ध बाजुस आपल्याला बुरुज असलेली दगडी तटबंदी,त्यावरील चर्या तसेच तटबंदीत असलेला लहान दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाने आत शिरल्यावर समोरच घडीव दगडांनी बांधलेल्या पाच फुट उंचीच्या चौथऱ्यावर माथ्यावर गोल घुमट असलेली दगडी इमारत पहायला मिळते. साधारण चार एकरवर पसरलेल्या तटबंदीच्या मध्यभागी हि इमारत बांधलेलं असुन या इमारतीच्या डावीकडे एका मशीद आहे. हि इमारत पाहताना आपल्याला काही क्षण विजापुरचा गोल घुमट पाहिल्याचा भास होतो. या घुमटाच्या आवारात काही लहान समाधी चौथरे आहेत. घुमटाच्या इमारतीवर थोड्याफार प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. हि इमारत म्हणजे आदिलशाही काळातील त्याचा मातब्बर सरदार दिलावरखान याची समाधी असलेला घुमट आहे. या इमारतीचा चौथरा साधारण ५ फुट उंच असुन त्याचा आकार ५० x ५० फुट तर इमारतीच्या माथ्यावर मध्यभागी असलेला घुमट साधारण २५ x २५ फुट आकाराचा आहे. इमारतीच्या माथ्यावर चार टोकाला चार लहान मिनार बांधलेले आहेत. घुमटाच्या दरवाजावर अरबी व पर्शियन भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. अरबी भाषेतील शिलालेख म्हणजे कलमा असुन त्यापुढे पर्शियन भाषेत रहमतके हक शुद घर खजा दिलावरखाना मुकाम दरमयानी मिसर बाग व बहक जुई मुदाम. याचे वाचन व भाषांतर भारत इतिहास संशोधन मंडळाचे मुन्शी अब्दुल यांनी केले असुन त्याचा अर्थ ज्याप्रमाणे शहरातील बागेत पाट नेहमी वाहत असतो त्याप्रमाणे दिलावरखानाच्या आत्म्यावर परमेश्वरी कृपा राहो.' यावर हिजरी वर्ष १०२२ म्हणजे इ.स. १६१३ कोरलेले असुन त्यावरून दिलावरखान नावाच्या सरदाराचे हे थडगे असावे व त्याचा कालखंड इ.स.१६१३ असावा असे अनुमान काढता येते. घुमटाच्या आत दोन थडगी असुन त्यातील दुसरे थडगे हे दिलावरखानच्या भावाचे असल्याचे मानले जाते. घुमट पाहुन झाल्यावर डावीकडे मशिदीकडे जाता येते. तीन कमानीवर तोललेली हि मशीद देखील पाच फुट उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेली असुन तिची मोठ्या प्रमाणात पडझड व दगडांची झीज झालेली आहे. या मशीदीवर मोठ्या प्रमाणात फुलांची नक्षी कोरलेली आहे. सध्या या संपुर्ण वास्तुचा ताबा पुरातत्व खात्याकडे आहे. घुमटाचा तटबंदीला फेरी मारली असता त्यात चार टोकाला चार बुरुज पहायला मिळतात. हा संपुर्ण परिसर फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar