RAJGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 4330 FEET

GRADE : MEDIUM

गोनीदांनी उल्लेख केलेला गडांचा राजा आणि राजियांचा गड म्हणजे राजगड. दुर्ग भटकंती करणाऱ्या प्रत्येक दुर्गप्रेमीला आपल्या प्रेमात पाडणारा गड म्हणजे राजगड असेच काहीसे वर्णन राजगडाचे करता येईल. आजच्या पिढीची नाळ या दुर्गांशी जोडणारे दुर्ग विषयक प्रख्यात लेखक प्रा.प्र.के.घाणेकर या दुर्गाचे वर्णन करताना म्हणतात, शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो. केवळ आजच्याच इतिहासकारांनी नव्हे तर जेम्स डग्लस सारख्या इंग्रजी लेखकांनी व मुघलांच्या दरबारी असलेल्या साकी मुस्तैदखान, महंमद हाशीम खालीखान यासारख्या ग्रंथकारांनी देखील राजगडच्या अभेद्यपणाचे वर्णन केले आहे. अशा विविध ग्रंथकारांनी वर्णन केलेला राजांचा गड म्हणजे राजगडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहरापासुन ४८ कि.मी. अंतरावर तर भोर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांत असलेल्या मुरुंबदेव डोंगरावर हा किल्ला वसला आहे. ... राजगडाकडे जाताना एखादी टेकडी किंवा नदी पार करावीच लागते. निसर्गाने हि दुर्गमता बहाल केल्याने राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व मध्यम आकाराचा एक बालेकिल्ला आहे. राजगडच्या बालेकिल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४३३० फुट आहे. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करी मह्त्वपुर्ण स्थान व तीन दिशांना असलेला त्याचा विस्तार पाहुन त्याला तटबंदीचा साज चढवला व त्याचे राजधानीत रुपांतर केलं. आदर्श डोंगरी किल्ल्यात असणारी घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही रचना आपल्याला राजगडात पहायला मिळते. घेरा म्हणजे गडाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश व त्यातील गावे. राजगडचा घेरा जवळपास २० कि.मी. असुन त्यात असलेल्या टेकड्या व दाट जंगल यामुळे राजगडला वेढा घालणे अतिशय कठीण होते. राजगडच्या या घेऱ्यात गुंजवणे, दादवडी, वाजेघर, मळे, भुतोंडे आणि पालखुर्द ही गावे येतात. कोणत्याही गावाकडून किल्ल्याकडे जाताना या चढणीच्या वाटांवर नजर ठेवणारी मेट दिसुन येतात. हा गड संरक्षणाचा दुसरा टप्पा. या मेटांवर रामोशी-बेरड लोकांची वस्ती असे. यामुळे कोणीही आगंतुक आडवाटांवरुन लपतछपत गडावर जाणे शक्य वाजेघर गावातून राजगडवर जाताना चढताना भिकुल्यांचे प्रसिद्ध मेट लागते. राजगडची इतर मेटे काळाच्या ओघात नाहिशी होण्याच्या मार्गावर आहेत. राजगड बिरमडोंगरी।,तीन माच्या तीन द्वारी॥ दोन तपे कारोभारी। जयावरी राहिले॥ ही ओवी राजगडच्या रचनेचे सार्थ वर्णन करते. माची म्हणजे मुख्य किल्ल्याच्या खालील बाजुस तटबंदीने वेढलेली सपाट जागा. येथून प्रत्यक्ष गडाला सुरुवात होते. राजगडाला पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची अशा तीन माच्या असुन या तीनही माच्यांचे लष्करी बांधकाम अजोड आहे. आता राजगडावर जाण्यासाठी अनेक मार्ग असले तरी पाली दरवाजा व गुंजवणे गावातुन चोर दरवाजा या दोन वाटा प्रामुख्याने वापरात आहेत. याशिवाय तोरणा-राजगड अशी भटकंती करत आल्यास आळू दरवाजाने संजीवनी माचीवर प्रवेश होतो. पाली दरवाजा अथवा चोर दरवाजाने गडावर प्रवेश करण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. यातील एका दरवाजाने चढुन दुसऱ्या दरवाजाने उतरणे जास्त सोयीचे आहे. या दोन्ही दरवाजाने आपला गडाच्या प्रशस्त अशा पद्मावती माचीवर प्रवेश होतो. १.पद्मावती माची- चोर दरवाजाने पद्मावती माचीवर प्रवेश केल्यावर समोरच घडीव दगडात बांधलेला गडावरील सर्वात जास्त पाणीसाठा असलेला पद्मावती तलाव दिसतो. या तलावाभोवती भिंत बांधलेली असुन या भिंतीतच तलावात उतरण्यासाठी कमान आहे. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. या तलावाच्या वरील बाजुस दुर्गप्रेमींच्या निवासासाठी बांधलेली धर्मशाळा असुन उजव्या बाजूस पद्मावती मंदिर आहे. महाराजांनी राजगड किल्ला बांधताना येथे असलेल्या मंदिराच्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख येतो. या मंदिरात तीन मुर्ती असुन मुख्य मुर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे तर उजवीकडील लहान मुर्ती शिवकाळातील आहे. या दोन मुर्तीमध्ये शेंदूर फासलेला पद्मावती देवीचा तांदळा आहे. या मंदिरात व धर्मशाळेत मिळुन ५० जणांना गडावर मुक्काम करता येईल. आपण आता सुट्टीच्या दिवशी हि जागा देखील अपुरी पडु लागली आहे. मंदिराशेजारी उजवीकडे पाण्याचे भुमीगत टाके असुन यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिरासमोर असलेली समाधी राणी सईबांई यांची असल्याचे मानले जाते. या मंदिरासमोरच महादेवाचे रामेश्र्वर मंदिर असुन मंदिरात शिवलिंग व हनुमानाची मुर्ती स्थापन केलेली आहे. रामेश्र्वर मंदिराकडून पायऱ्यांनी वर जाताना उजवीकडे एका मोठ्या वाड्याचे अवशेष नजरेस पडतात. राजवाड्याच्या या भागात तटाला लागुन उतारावर एक मोठा तलाव आहे. हा तलाव घोड्तळे म्हणुन ओळखला जातो. राजवाड्यापुढे काही अंतरावर धान्यकोठाराचे अवशेष आहेत. याच्या थोडे पुढे गडावरील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजे किल्ल्याची सदर आहे. या वास्तुखाली तळघर असुन समोर दरीकाठावर दारुगोळा कोठार आहे. पुर्वी या सदरेत एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवला जात असे. या वास्तुजवळ असलेले दारुगोळा कोठार पहाता हि सदर असणे सुसंगत वाटत नाही. ही सदर नसुन दुसरी एखादी वास्तू असावी. सदरेच्या उजवीकडील वाट आपल्याला पाली दरवाजात घेऊन जाते. पाली गावातुन गडावर येणारा हा मार्ग राजमार्ग असल्याने चांगलाच प्रशस्त असुन यावर चढावावर पायऱ्या बांधल्या आहेत. पाली दरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा असुन चांगलाच प्रशस्त आहे. हा दरवाजा पार करून काही पायऱ्या चढुन गेल्यावर दोन बुरुजात बांधलेला गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा संपुर्ण मार्ग दोन्ही बाजुंनी तटबंदीने बंदीस्त केलेला असुन दरवाजाच्या वरील भागात चर्या आहेत. या दरवाजाने आत आल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडी आहेत. यातील उजवीकडील देवडीखाली चौथऱ्यावर झीज झालेला शिलालेख पाहायला मिळतो. येथून सरळ जाणाऱ्या वाटेने आपण पुन्हा सदरेकडे येतो. पद्मावती माची केवळ लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाण असल्याने या माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. यात ब्राम्हणवर्गाची व अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत. पद्मावती माचीच्या तटबंदीवर फेरी मारली असता तटात दोन शौचकुप पाहायला मिळतात. सदरेकडून थोडे पुढे आल्यावर आपण ध्वजस्तंभाजवळ पोहोचतो. या ठिकाणी एक तुटकी तोफ पडलेली आहे. येथे वाटेला तीन फाटे फुटतात. यातील सरळ जाणारा रस्ता बालेकिल्ल्याकडे डावीकडील रस्ता सुवेळा माचीवर तर उजवीकडील रस्ता संजीवनी माचीवर जातो. केवळ टोकालाच नव्हे तर संपुर्ण तटबंदीत चिलखती बुरूज व तशीच दुहेरी-तिहेरी चिलखती तटबंदी हे या दोन्ही माचींचे वेगळेपण आहे. या सर्व माची एकमेकापासुन अलिप्त ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये तटबंदी बांधण्यात आली असुन ये-जा करण्यासाठी दरवाजे ठेवले आहेत. या तटबंदीत असलेला दरवाजा ओलांडुन गेल्यावर सुवेळा माचीकडे जाताना उजव्या बाजुस दरीमध्ये राजगडचा गुंजवणे दरवाजा आहे. हा दरवाजा पाहण्यासाठी आपल्याला खाली दरीत उतरावे लागते. गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक बांधलेल्या तीन दरवाजांची माळ आहे. यातील पहिला दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन साध्या बांधणीचा आहे. दुसऱ्या दरवाजाला कमान असुन शेवटच्या तिसऱ्या दरवाजावर गणेशपट्टी कोरलेली आहे. या गणेशपट्टीखाली कमळाची कळी कोरली असुन तिच्या दोन्ही बाजुस उपडे घट घेतलेल्या दोन सोंडा कोरल्या आहेत. हे शिल्प पहाता हा दरवाजा किल्ल्याच्या मुळ बांधकामातील असुन शिवपुर्व काळातील असावा. हा दरवाजा पाहून झाल्यावर मुळ वाटेवर येऊन सुवेळा माचीच्या दिशेने आपली वाटचाल सुरु करावी. या संपूर्ण माचीचे बांधकाम शिवकाळात झालेले असुन या माचीच्या नावाबद्दलच्या काही कथा ऐकायला मिळतात. या माचीचे एकुण ३ टप्पे पडले असुन पुर्व दिशेला असलेली ही माची टोकावर चिंचोळी होत गेली आहे. माचीच्या सुरवातीस असलेला उंचवटा डुबा म्हणुन ओळखला जातो. या भागात असलेले घरांचे चौथरे म्हणजे कधीकाळी येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिळीबकर या सरदारांची निवासस्थाने होती. या ठिकाणी वाटेवर आपल्याला एक मारुती शिल्प व कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर जाते तर उजवीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाकडे जाते. काळेश्र्वरी बुरूजाच्या वाटेकडे वळल्यावर सुरवातीस काही पाण्याची टाकी पहायला मिळतात. येथुन पुढे काही अंतरावर रामेश्र्वरचे भग्न मंदिर असुन या मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती ठेवलेली आहे. रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस असलेल्या कातळावर गणपती, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडे पुढे आल्यावर दरीकाठावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथुन संजीवनी बुरुजांचे सुंदर दर्शन होते. या ठिकाणी तटबंदीमध्ये तटाबाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा असुन तेथुन खाली उतरणारी वाट मात्र मोडलेली आहे. काळेश्वरी बुरुजाचा हा भाग पाहून झाल्यावर पुन्हा डूब्याकडे यावे व सुवेळा माचीकडे निघावे. येथुन माचीच्या दिशेने थोडे पुढे आल्यावर उजवीकडे एक चौथरा पहायला मिळतो. माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जातांना डावीकडे असलेल्या उंच खडकावर १० फुट व्यासाचे नेढे पहायला मिळते. या नेढ्याच्या पुढील भागात तटबंदीत एक लहान दरवाजा दिसतो पण त्यातुन खाली उतरण्याचा मार्ग मात्र दिसत नाही. हा दरवाजा मढे दरवाजा म्हणुन ओळखला जातो. नेढ्याच्या अलीकडे उजवीकडील तटबंदीत माचीबाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा असुन येथील तटातील भिंतीवर गणपती कोरलेला आहे. येथून पुढे माचीची तटबंदी सुरू होते. ही तटबंदी दोन भागात विभागली असून प्रत्येक भागाच्या टोकाला चिलखती बुरुज बांधलेला आहे. माचीच्या दुसऱ्या भागात असलेली दुहेरी तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील बाजुने भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या भागात खालील बाजुस वाघजाईचे शिल्प आहे. सुवेळा माची पाहुन झाल्यावर मागे फिरून पुन्हा सदरेजवळील ध्वजस्तंभाजवळ यावे. येथुन उजवीकडील वाटेने संजीवनी माचीवर जाता येते. बालेकिल्ल्याखालुन जाणाऱ्या या वाटेने कोणताही गोंगाट न करता शांतपणे संजीवनी माचीकडे जावे कारण बालेकिल्ल्याच्या या पोटात मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळी आहेत. सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. या माचीची लांबी साधारण १ कि.मी. असुन ही माचीसुद्धा ३ टप्प्यांत विभागली आहे. अतिशय सुंदर दिसणाऱ्या या माचीचे बांधकाम आजही सुस्थितीत असुन त्यावरील वास्तु अवशेष बऱ्यापैकी शिल्लक आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा उतरून खाली गेल्यावर उजव्या बाजुच्या तटावरून मागे फिरल्यावर या तटबंदीत तिहेरी तटबंदीने बंदिस्त केलेले तीन बुरुज पहायला मिळतात. गडावर येणाऱ्या पाली दरवाजाच्या मुख्य मार्गावर नजर ठेवण्यासाठी यांची रचना असावी. या माचीवर मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी असुन बांधकाम करताना दगड काढल्याने ती निर्माण झाली आहेत. संजीवनी माचीला एकूण १९ बुरूज असुन तटबंदीच्या आतील बाजुस खंदक खोदुन भुयारी परकोट बांधला आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीत जाण्यासाठी लहान दरवाजे बांधले आहेत. माचीच्या या भागात डावीकडील तटबंदीत असलेला दरवाजा आळू दरवाजा म्हणुन ओळखला जातो. गडावर न जाता थेट बाहेर पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असे. तोरणा गडावर जाण्याचा मार्ग देखील या दरवाजातून बाहेर पडतो. हा दरवाजा काही प्रमाणात ढासळलेला असुन दरवाजावरील शिल्पात वाघाने सांबर पाडल्याचे दर्शविले आहे. येथुन पुढे असलेली माची पुर्णपणे दुहेरी तटबंदी व दुहेरी बुरुजांनी बंदिस्त केली आहे. दोन तटांच्या मधील भागात जाण्यासाठी काही ठिकाणी दगडी पायऱ्या असून माचीच्या तटबंदीत काही ठिकाणी शौचकुप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर प्रचंड मोठा बुरुज असुन याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. संजीवनी माची पाहुन झाल्यावर मागे फिरून पुन्हा सदरेजवळील ध्वजस्तंभाजवळ यावे .येथुन सरळ जाणारी वाट राजगडच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर म्हणजेच बालेकिल्ल्यावर जाते. बालेकिल्ल्याकडे जाणारा हा रस्ता काहीसा अरुंद असुन डावीकडुन बालेकिल्ल्याला वळसा घालून उभी चढण चढावी लागते. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा लागतो. हा दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असुन दरवाजावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याची तटबंदी साधारण ६ फुट उंच असुन त्यात काही ठिकाणी बुरूज बांधलेले आहेत. दरवाजातुन आत शिरल्यावर समोरच जननी मातेचे मंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर अर्धवर्तुळाकार आकारात कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांच्या आकारामुळे हि टाकी चंद्रतळे म्हणुन ओळखली जातात. तळ्याच्या काठावर ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर असुन समोरच टोकावर असलेला बुरुज उत्तर बुरूज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावरून संपुर्ण पद्मावती माची व दुरवरचा प्रदेश नजरेस पडतो. पुर्वी या बुरुजाखालुन गडावर येणारी लहान वाट असल्याचे वाचनात येते पण सध्या या वाटेवर एक प्रचंड मोठा दगड कोसळल्याने हि वाट कायमची बंद झाली आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर इतर काही वास्तुचे अवशेष मोठया प्रमाणात दिसुन येतात. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर हे किल्ले दिसतात. राजगड किल्ला पुर्णपणे फिरायचा असल्यास गडावर एक दिवसाचा मुक्काम आवश्यक आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे या डोंगरावर असलेले वास्तव्य व त्यांच्या नावे असलेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान पहाता हा डोंगर प्राचीन काळापासुनच ज्ञात असावा. या डोंगराला गडाचे स्वरुप सातवाहन काळातच मिळाले असावे. बहमनीकाळात जुजबी स्वरुपाची चौकी अशा अवस्थेत हा किल्ला मुरंबदेव नावाने ओळखला जात असे. बहमनी राज्याचे तुकडे पडल्यावर इ.स. १४९० च्या सुमारास निजामशाही संस्थापक अहमद बहिरी याने पश्चिम महाराष्ट्र ताब्यात घेतल्यावर हा किल्ला निजामशाही अमलाखाली आला. इ.स.१६२५ मध्ये बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पहात असताना मलिकअंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला व शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. आदिलशाहीच्या सैन्याने पुन्हा या किल्ल्यावर हल्ला केला असता सोनाजी त्यात जखमी झाला. यावेळी बाळाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह सोनाजीच्या मदतीस धावुन आले व या लढाईत ते देखील जखमी झाले. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा सन्मान केला. निजामशाही संपल्यावर मुरुंबदेव किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात आला. शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज उपलब्ध नाही पण १६४६ ते १६४७ च्या सुमारास तोरण्यापाठोपाठ हा डॊंगर जिंकून घेतला हे नक्की. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडातील वृत्तानुसार 'शिवाजीने शहामृग पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली. तर सभासद बखरीनुसार मुराबाद म्हणोन डोंगर वसवुन त्याचे नाव राजगड ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हटले आहे. इ.स. १६६० मध्ये शाहिस्तेखान पुण्यात आला असता त्याने राजगडाकडे फौज पाठविलेली होती. ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही अशी माहिती फारसी साधनांमधुन मिळते. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. इ.स. १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्या दाऊदखान व रायसिंग या दोन सरदारांनी राजगडच्या परीसरात स्वारी केली. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली पण मराठ्यांनी केलेल्या तिखट प्रतीकारामुळे मॊगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहानुसार स्वतःकडे ठेवलेल्या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून १२ सप्टेंबर १६६६ला राजगडला पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. स्वराज्याचा वाढता कारभार पाहता राजधानी म्हणुन राजगडची जागा कमी पडु लागली होती. त्यात मिर्झाराजे जयसिंग व शाहिस्तेखान यांच्या स्वारीत शत्रु थेट राजधानीपर्यंत पोहोचला होता. यामुळे शिवाजी महाराजांनी १६७१-१६७२ मध्ये रायगड हे स्थान राजधानी म्हणुन निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली. मराठेशाहीच्या सुरवातीची अतिशय महत्वाची अशी २६ वर्षे राजधानी म्हणुन तसेच राजाराम महाराजांचा जन्म व राणी सईबाईंचे निधन या घटना राजगडावर घडल्या. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर औरंगजेबाचे सुलतानी संकट स्वराज्यावर कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्यावर मोगलानी मराठ्यांचे गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुल खैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले पण लवकरच मराठा फौज राजगडाभोवती गोळा झाली व त्यांनी राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता. ११ नोव्हेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. राजगडाच्या रस्ता दुर्गम असल्याने त्याने एक महिना आधी काही गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले व बुरुजावर तोफांचा भडिमार सुरु केला. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले पण दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. औरंगजेबाने किल्ल्याचे नाव नाबिशहागड ठेवले व इरादतखान यास किल्लेदार नेमले. २९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून किल्ला जिंकून घेतला. किल्ला मराठयांच्या ताब्यात आल्यावर १७०९ मध्ये शाहु महाराजांनी सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी नेमणुक करून दिली. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्यांनी गडाची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारीसुद्धा असत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असुन हा बुलंद, बेलाग आणि बळकट दुर्ग आजही आपल्या सामर्थ्याची ग्वाही देत ताठ मानेने उभा आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!