RAJDEHER
TYPE : HILL FORT
DISTRICT : JALGAON
HEIGHT : 2180 FEET
GRADE : MEDIUM
जळगाव जिल्हा म्हणजे कोरडा दुष्काळसदृश व कमी झाडी असणारा भूभाग म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच व जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. गडकिल्ल्यांसाठी जास्त प्रसिध्द नसलेल्या या जिल्ह्य़ात नाशिक जळगाव सीमारेषेवर दक्षिणेकडील अजिंठा डोंगररांगेत राजदेहेर उर्फ ढेरी हा डोंगरी किल्ला उभा आहे. या भागात राजदेहेर व राजधेर या नावाचे दोन किल्ले असुन राजधेर हा सातमाळा डोंगररांगेत तर राजदेहेर हा अजिंठा डोंगररांगेच्या सुरवातीला उभा आहे. बलंदड राजधेरशी नावात समानता असली तरी राजदेहेर किल्ला त्यामानाने उपेक्षित आहे. राजदेहेरला भेट देण्यासाठी आपल्याला राजदेहेरवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई-नाशिकहुन येथे जाताना मनमाड-चाळीसगावमार्गे जाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. मनमाड राजदेहेरवाडी हे अंतर ५३ कि.मी. असुन मनमाड-नांदगाव-नायडोंगरी–हिंगणेदेहेरे या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजदेहेरवाडी पर्यंत जाता येते.
...
राजदेहेरवाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी गावापासुन ४ कि.मी. अंतरावर असलेल्या गंगानंदगिरी आश्रमापुढील महादेव मंदिरापासुन किल्ल्यावर जाणारी वाट आहे. मंदिरापर्यंत कच्चा पण व्यवस्थित रस्ता असल्याने गाडी तेथवर जाते पण स्वतःचे वाहन नसल्यास हे अंतर पायी कापावे लागते. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असुन मंदिराच्या आवारात काही शिल्प पहायला मिळतात. किल्ल्याची एक सोंड थेट या मंदिरापर्यंत आलेली असुन दुसरी सोंड लांबवर देहेरवाडीच्या दिशेला आहे. मंदिराकडून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेच्या सुरवातीला उघड्यावरच एक भग्न गणेश मुर्ती व नंदी असुन हि वाट पुढे दोन भागात विभागते. यातील सरळ जाणारी वाट हि या दोन डोंगरामधील घळीतुन किल्ल्यावर जाणारी वाट असुन दुसरी वाट किल्ल्याच्या उजवीकडील सोंडेला वळसा घालुन मागील खिंडीतून वर चढते व डोंगरावरून घळीच्या दिशेने येते. या दोन्ही वाटापैकी कोणत्याही वाटेने गडावर जाता येते. राजदेहेर किल्ला दोन डोंगरावर वसलेला असुन मंदिरापासुन या मळलेल्या पायवाटेने एक तासात आपण किल्ल्याच्या दोन सोंडेमध्ये असलेल्या खिंडीतील उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. घळीतून किल्ल्यावर जाताना वाटेत जागोजाग ढासळलेल्या तटबंदीचे व दरवाजाचे अवशेष दिसुन येतात. घळीच्या उजव्या बाजुच्या डोंगरात कातळात खोदलेले लेणे असुन त्याच्या वरील बाजुस एक लहान गुहा आहे व त्याच्या वरील बाजूस उतारावर खडकात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खिंडीमध्ये व्यालमुख कोरलेले भग्न स्तंभ व कोरीव दगडी अवशेष पहाता या ठिकाणी एखादे मंदिर असावे. येथे कोरलेला कातळ पहाता या ठिकाणी गडाचा प्राचीन मुळ दरवाजा असावा. खिंडीत आल्यावर सर्वप्रथम उजवीकडील डोंगरावर फिरून नंतर डावीकडील डोंगरावर जावे. उजवीकडील डोंगराच्या माथ्यावर आल्यावर संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. घळीतून किल्ल्यावर येणारी वाट या दोन्ही डोंगरावरून माऱ्याच्या टप्प्यात आहे. समुद्रसपाटीपासून २१५८ फुट उंच त्रिकोणी आकाराचा माथा असलेल्या या किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर दोन भागात विभागलेला असुन किल्ल्याचा परीसर साधारण ३० एकर आहे. उजवीकडील डोंगर आकाराने लहान असुन डावीकडील डोंगरावर मुख्य किल्ला व त्याच्या उंचवट्यावर बालेकिल्ला आहे. उजवीकडील डोंगरावर फेरी मारताना सर्वप्रथम उंचवट्याखाली उध्वस्त झालेले एक लेणे पहायला मिळते. या लेण्याच्या पुढील भागात काही वास्तुचे चौथरे असुन त्याच्या पुढील भागात किल्ल्याचा राजदेहेरवाडीच्या दिशेने असलेला बुरुज आहे. या बुरुजाच्या डावीकडे किल्ल्याचा दुसरा उध्वस्त दरवाजा असुन घळीच्या उजवीकडून येणारी वाट या दरवाजातून वर येते. येथुन दरी डावीकडे ठेवत घळीच्या दिशेने परत फिरल्यावर वाटेत एक साचपाण्याचा लहान तलाव दिसतो. घळीत आल्यावर आपण वर चढल्याच्या विरुध्द बाजूस किल्ल्यावर येण्यासाठी अजुन एक लहान दरवाजा आहे. या दरवाजाकडे येणारी वाट हि पिनाकेश्वर महादेव मंदिराकडून वर येते. गडावर येण्यासाठी एकुण तीन दरवाजे आहेत. दरवाजाच्या उजवीकडे असलेल्या बुरुजावर एक कबर आहे. दरवाजा पाहुन झाल्यावर घळीच्या वरील बाजूस येऊन डावीकडुन गडफेरीला सुरवात करावी. या वाटेवर सर्वप्रथम कातळाच्या पोटात कोरलेले एक दोन खांबावर तोललेले लेणे पहायला मिळते. या लेण्याच्या पुढील भागात कातळाच्या पोटात कोरलेले दोन तोंड असलेले एक टाके आहे. या टाक्याच्या पुढील भागात एक गुहा असुन त्यापुढे अजुन एक कातळात कोरलेले टाके आहे. या टाक्यांच्या खालील बाजूस अजुन एक लेणीवजा चार खांब असलेले टाके आहे. यातील कोणत्याही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. या टाक्याच्या वरील बाजूस बालेकिल्ल्याची ढासळलेली तटबंदी दिसते. येथुन पुढे आपण गडाच्या माचीत येतो. गडाच्या माचीवर साचपाण्याचा तलाव असून तलावाच्या बाजूला नंदी व पिंड उघड्यावर पडलेले आहेत. तलावावरुन पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादूका व त्याशेजारी १०-१२ खळगे पहायला मिळतात. माचीच्या निमुळत्या टोकावर भगवा झेंडा रोवलेला असुन येथुन राजदेहेरवाडी व खुप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना डाव्या बाजूस खडकात कोरलेले पाण्याचे कोरडे टाके नजरेस पडते. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत ५ बुरुज असुन हि तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. बालेकिल्ल्याच्या ढासळलेल्या दरवाजातून आत शिरल्यावर उध्वस्त वाड्याचे व काही वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. येथुन खाली घळीकडील दरवाजाकडे उतरताना डोंगर उतारावर काही कोरलेल्या पायऱ्या व वास्तुंचे चौथरे दिसतात. या भागात उतारावर गडाची तटबंदी आजही शिल्लक आहे. घळीत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास दोन तास पुरेसे होतात. गडावर पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी सोबत बाळगावे. गडावर मुक्कामाची वेळ आल्यास पायथ्याशी असलेल्या गंगानंदगिरी महाराजांच्या आश्रमात राहता येते. गडाचा इतिहास पहाता इ.स. १००० ते १२१६ पर्यंत या भागावर पाटण येथे राजधानी असलेल्या निकुंभांची सत्ता होती. इ.स.१२१६– १७च्या दरम्यान हा किल्ला यादवांच्या ताब्यात आला. यादवांचा पाडाव झाल्यावर हा भूभाग अल्लाऊद्दीन खिलजीकडे व नंतर फारुकीं घराण्याकडे गेला. इ.स. १६०१ भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना मुघलांकडून दिलेल्या जहागिरीत राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता. शिवकाळात या किल्ल्याचा उल्लेख नसला तरी १०९ कलमी बखरीतील किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख आहे. कदाचित १६७० च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे १७५२ मध्ये भालकीच्या तहात हा भाग निजामाकडून मराठ्यांकडे आला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला. हि सनद देताना शिबंदीचा खर्च शक्य तितका कमी ठेऊन या दहा हजार रुपयातच गडाची डागडु़जी करावी त्यासाठी वेगळा खर्च दिला जाणार नाही अशी अट घालण्यात आली होती. पुढे १७६४ मधे पेशव्यांनी खानदेशचा सुभेदार नारोकृष्ण याला पत्र पाठवून राजदेहेर किल्ल्याची अवस्था व त्यावरील वस्तुची यादी पुण्याहून पाठवलेल्या कारकुनास देण्यास सांगितले होते. इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार जगजीवनराम व माधवराव या पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसऱ्या बाजीरावाच्या आदेशावरून विठ्ठलराव विंचूरकर यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला. इ.स.१८१८ मध्ये शेवटच्या इंग्रज-मराठे युद्धात लेफ्टंनट कर्नल मॅकडॉवेल याने औरंगाबादमार्गे येऊन १० एप्रिल १८१८ ला चांदवडचा किल्ला घेतला. या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन मॅकडॉवेल याने गड ताब्यात देण्याविषयी किल्लेदार निकम देशमुखांना निरोप पाठवला पण हा निरोप किल्लेदार व आतल्या अरबी सैनिकांनी धुडकावला व लढाईची तयारी केली. किल्ल्यावर मोर्चे बसवून ११ एप्रिलला इंग्रजानी तोफा डागायला सुरवात केली. १२ एप्रिलला मराठ्यांनी ब्रिटीशांकडे निरोप पाठवला कि ते जर सैनिकांचे थकलेले पगार देणार असतील तर किल्ला त्यांच्या हवाली केला जाईल पण धुर्त ब्रिटीशांनी हि अट नाकारली व सैनिकांना त्यांचे खाजगी सामान घेउन जाण्यास परवानगी देऊन दोन तासाचा अवधी दिला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी इंग्रजांनी शेजारच्या टेकडीवर तोफेचे सुट्टे भाग चढवले व ते जोडून रात्री नउ वाजता तोफ माऱ्याला सज्ज केली. येथुन तोफगोळ्यांचा मारा सुरु असताना एक गोळा दारुकोठारावर पडला आणि दारुगोळा जळुन खाक झाला स्फोट झाल्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन मराठा गड उतरून निघून गेले. दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल १८१८ला गड ब्रिटीशांच्या ताब्यात आला. राजदेहेर किल्ला जळगाव जिल्ह्य़ातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असून थोडा लांबचा प्रवास करायला लागला तरी हरकत नाही पण दुर्गप्रेमीनी एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar