RAIMOHA
TYPE : FORTRESS
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना शिरूर(कासार) तालुक्यात अहमदनगर-पाथर्डी -बीड महामार्गावरील राइमोहा येथे एखादा भुईकोट शोभावा अशी अर्धवट बांधलेली सुंदर गढी पहायला मिळते. बीड –राइमोहा हे अंतर २८ कि.मी.असुन शिरूर(कासार) या तालुक्याच्या ठिकाणापासुन हि गढी १५ कि.मी.अंतरावर आहे. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. राइमोहा गावाबाहेर असलेल्या एका लहानशा टेकडीवर हि गढी असुन या गढीचा परीसर साधारण साडेचार एकरवर पसरलेला आहे. गढीचे मुख्य गढी व परकोट असे दोन भाग पडलेले असुन गढीच्या पश्चिम दिशेला परकोटाचा प्रशस्त दरवाजा दिसुन येतो.
...
घडीव दगडात बांधलेल्या या प्रशस्त दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या पहायला मिळतात. परकोटाच्या आत दगडी बांधणीतील मोटेची प्रशस्त विहीर वगळता इतर कोणतेही बांधकाम दिसुन येत नाही. मुख्य गढीचा परिसर ३० गुंठ्यावर पसरलेला असुन गढीचे बांधकाम अर्धवट राहिले असल्याचे दिसुन येते. अर्धवट राहिलेले गढीचे बांधकाम म्हणजे पुर्व पश्चिम व दक्षिण दिशेची तटबंदी व त्यात दोन टोकावर असलेले दोन बुरुज. गढीचे दर्शनी बांधकाम पुर्ण झाले असुन हे बांधकाम अतिशय सुंदर आहे. हे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात व चुन्यात केलेले असुन फांजीवरील भाग म्हणजे चर्या विटांनी बांधलेल्या आहेत. गढीच्या दर्शनी भागात उत्तरेला तीन बुरुज असुन यातील दोन बुरुजात दुमजली वाड्याचे बांधकाम केलेले आहे. दरवाजाकडील या दोन बुरुजाच्या वरील भागात खिडक्यांचे झरोके दिसुन येतात. मुख्य दरवाजाची चौकट कमानीदार असुन त्यात असलेल्या लाकडी दरवाजात एक लहान दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी प्रशस्त देवड्या असुन उजवीकडील देवडीच्या आतील बाजुस शौचकुप आहे. आत येऊन काटकोनात डावीकडे वळल्यावर गढीचा दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाला देखील लाकडी दरवाजा असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरून काटकोनात वळल्यावर गढीचा तिसरा दरवाजा आहे.याचा लाकडी दरवाजा नष्ट झाला आहे. हा दरवाजा पार करून आपण चौथ्या दरवाजात येतो. याचा लाकडी दरवाजा शिल्लक असुन त्यात दिंडी दरवाजा आहे. हा दरवाजा पार केल्यावर आपण एका बंदिस्त चौकात पोहोचतो. येथे तीन बाजुस सुंदर कमानी असुन उजवीकडे गडाचा पाचवा दरवाजा आहे. याचा लाकडी दरवाजा शिल्लक असुन यात देखील दिंडी दरवाजा आहे. वळणावळणाचा हा मार्ग अतिशय सुंदर असुन याचे आतील बांधकाम आपल्याला इतिहाकाळात घेऊन जाते. पाचव्या दरवाजाने गढीवर जाणारा मार्ग येथुन जनावरे आत येऊ नये म्हणुन अलीकडे दगड लाऊन बंद केलेला आहे पण शेजारील लहान दरवाजाने माथ्यावर जाता येते. वरील भागात बराचसा ढासळलेला तरीही पहाण्यासारखा सुंदर असा वाडा आहे. येथे आपल्याला चोरवाटा,भुयार, दिवाणखाना,स्वयंपाकघर,विश्रामगृह,शौचकुप,कोठार,कारंजे यासारख्या अनेक वास्तु पहायला मिळतात.गढीच्या उर्वरीत तटबंदीचे काम अपुर्ण असले तरी दक्षिणेकडील भागात एक सुटा बुरुज पहायला मिळतो. या बुरुजात ६० फुट खोल बंदिस्त विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी जिना बांधलेला आहे. विहिरीच्या वरील भागात पाणी शेंदण्यासाठी खिडकी असुन माथ्यावर हवामहल सारखी वास्तु आहे. या विहिरीचे पाणी अतिशय नितळ असुन आजही पिण्यायोग्य आहे. या विहिरीचे पाणी खापरी नळाने गढीत फिरवल्याचे दिसुन येते. येथे आपले गढीदर्शन पुर्ण होते. संपुर्ण गढी नीटपणे पहाण्यास एक तास लागतो. आवर्जुन पहावी अशीच या गढीची रचना आहे. गढीच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गावात हि गढी जहागीरदारांची गढी म्हणुन ओळखली जाते. जहागिरीदारांचे वंशज सुलेमान पठाण हे गावातच रहात असुन त्यांना या गढीविषयी वा त्यांच्या पुर्वजाविषयी फारशी माहीती नाही.
© Suresh Nimbalkar