PUNTAMBA

TYPE : CITY FORT

DISTRICT : AHMEDNAGAR

HEIGHT : 0

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले पुणतांबा गाव तेथील गोदावरी नदीला असलेला घाट व त्यावरील मध्ययुगीन मंदिरामुळे चांगलाच प्रसिध्द आहे. शनीमहात्म्यात वर्णन केलेले तांबलिंदनापूर व पुण्यस्तंभ हि दोन गावे एकत्र येऊन त्याचे पुणतांबा नगर झाल्याचे मानले जाते. पुर्वी हि दोन्ही गावे गोदावरी नदीच्या दोन्ही काठावर वसली होती पण पुरामुळे हि दोन्ही गावे उध्वस्त झाल्याने त्याचे एक गाव बनल्याची कथा स्थानिकात प्रचलित आहे. गावाची एकुण प्रमाणबद्ध रचना पहाता ते खरे असल्याचे जाणवते. प्राचीन काळापासुनच हे गाव भरभराटीस आल्याने समृद्ध असे हे गाव नगरकोटाच्या आत असणे साहजिकच आहे. पुणतांबा शहर हे मनमाड-दौंड तसेच शिर्डी लोहमार्गावरील रेल्वे स्थानक असुन पुण्याहुन २०० कि.मी. अंतरावर तर मुंबईहुन शिर्डीमार्गे २७५ कि.मी.अंतरावर आहे. शिर्डी ते पुणतांबा हे अंतर फक्त १५ कि.मी.आहे. वाढत्या लोकसंखेमुळे पुणतांबा शहराचा पसारा आज वाढला असला तरी मुख्य गाव हे आजही कोटाच्या आत वसलेले आहे. साधारण १०० एकरवर वसलेल्या या गावाभोवती २ कि.मी. लांबीची तटबंदी असुन या तटबंदीमध्ये ११ वेशी म्हणजे गावात प्रवेश करण्यासाठी ११ दरवाजे असल्याचे गावकरी सांगतात. ... या ११ वेशीना वेगवेगळी नावे होती पण आज एकही वेशीचे नाव स्थानिकांना धडपणे सांगता येत नाही. आज या तटबंदीची पडझड झाली असली तरी बहुतांशी तटबंदी आजही शिल्लक आहे. या गावाला ११ वेशी असल्याचे स्थानिक सांगत असले तरी आज मात्र आपल्याला त्यातील केवळ चार वेशी व त्यांचे दरवाजे पहायला मिळतात. या चारही वेशी प्रशस्त व मोठ्या असुन त्यातुन वाहने सहजपणे ये-जा करतात. पुणतांबा गावात आपला प्रवेश हा धनवटे पाटील वेस या दरवाजाने होतो. हि वेस आजही वापरात असुन या वेशीचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. धनवटे पाटील वेशीचा दरवाजा दोन भक्कम बुरुजात बांधलेला असुन त्याला नव्याने धनवटे पाटील वेस नाव देण्यात आलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस तटबंदीला लागुन दरवाजावर तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या दरवाजाला लागुन काही प्रमाणात कोटाची दगडी तटबंदी पहायला मिळते. गावात आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात दोन ते तीन मजली जुने वाडे पहायला मिळतात. यातील एक वाडा होळकरांचा असल्याचे सांगितले जाते. गावातुन गोदावरी नदीकाठी असलेल्या मामाभाचे मंदीराकडे गेले असता आपण गावाच्या दुसऱ्या वेशीतुन बाहेर पडतो. या वेशीची पडझड झाल्याने तिच्या दरवाजाच्या ठिकाणी नव्याने कमान उभारण्यात आली आहे. या कमानी शेजारी कोटाची तटबंदी असुन नदीच्या दिशेने असलेली हि १ कि.मी. लांबीची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. या तटबंदीचा खालील भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले आहे. तटबंदीत आपल्याला काही ठिकाणी बुरुज पहायला मिळतात. या दरवाजा समोरच मामाभाचे मंदीर आहे. मामाभाचे मंदिर म्हणजे गावाबाहेर असलेल्या दोन मध्ययुगीन काळातील समाधी मंदीरे असुन त्यातील महादेवाची पिंड पहाता या दोन्ही व्यक्ती शैवपंथीय असाव्यात. यातील एका स्माडीवर असलेल्या शिलालेखात हि वास्तु शके १६९३ म्हणजे इ.स.१७७१ मध्ये बांधल्याचा उल्लेख असुन त्यात पुणतांबा गावाचा उल्लेख पुण्यस्तंभ असा केलेला आहे. या मंदिराच्या आवारात बऱ्याच समाध्या असुन आसपास काही मंदीरे पहायला मिळतात. मामाभाचे मंदिर पाहुन झाल्यावर कमानीतुन पुन्हा कोटात शिरावे व तटबंदीला लागुन उजव्या बाजूने आपली पुढील भटकंती सुरु करावी. येथे तटबंदीला लागुन नव्याने काही घरे बांधण्यात आली आहेत. या वाटेने सरळ पुढे आल्यावर आपण कोटाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. दोन चौकोनी वूरुजात बांधलेला हा दरवाजा चांगलाच मोठा असुन या दरवाजाने गोदावरी नदीकाठी असलेल्या घाटावर तसेच मंदीराकडे जाण्यासाठी फरसबंदी (दगडी) वाट बांधलेली आहे. दरवाजाशेजारी असलेल्या बुरुजावर दर्गा बांधलेला आहे. येथे समोरच गोदावरी नदीकाठी महादेव व कार्तिकेय मंदिर आहे. कार्तिकेय मंदिराचे बांधकाम घडीव व कोरीव दगडात केलेले असुन मंदिराच्या कळसाची उंची साधारण चाळीस फुट आहे. मंदिराच्या सभामंडपात शंकराची पिंड असुन आत गर्भगृहात दक्षिणमुखी कार्तिकेय मुर्ती आहे. मंदिराबाहेरील देवकोष्ट्कात गणपती,पार्वती व गंगेची मुर्ती आहे. या मंदिराशेजारी असलेले महादेवाचे मंदिर देखील दगडात बांधलेले असुन या मंदीरात हे मंदिर शके १६१९ म्हणजे इ.स.१६९७ मध्ये परशुराम रामचंद्र पटवर्धन यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. ह शिलालेख व मामाभाचे मंदिरातील शिलालेख पहाता हि सर्व बांधकामे १७ व्या व १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात केली गेली आहेत. महादेव मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारची कोरीव नागशिल्पे ठेवलेली आहेत. या मंदिरांच्या मागील बाजुस नदीकाठी घाट बांधला असुन तो अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे सांगीतले जाते पण मंदिरातील शिलालेख व घाटाचे बांधकाम पहाता हा घाट मंदिरासोबतच बांधला असावा. पुणतांबा येथे गोदावरी दक्षिणवाहिनी वहात असल्याने पुर्वी येथे अंत्यविधीनंतर उत्तरक्रिया व श्राद्ध तसेच मोक्षप्राप्तीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असत. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी येथे महादेव मंदिरासोबत घाट बांधण्यात आला. गावाभोवती असणारा कोट जामखिंडीकर पटवर्धन यांनी बांधल्याचे स्थानिक सांगतात व मंदिरातील शिलालेखात असलेले पटवर्धन नाव पहाता ते संयुक्तिक वाटते. या मंदिरांच्या पुढे काही अंतरावर नदी काठावरच यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे. या मंदीराकडे जाताना आपल्याला कोटाचा चौथा दरवाजा पहायला मिळतो. हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन त्याला आडोसा देण्यासाठी त्यापुढे आडवी भिंत बांधुन त्यात बुरुज बांधण्यात आला आहे. या दरवाजातुन देखील नदीच्या दिशेने फरसबंदी (दगडी) वाट बांधलेली आहे. या दरवाजाच्या समोरच पण नदीच्या दुसऱ्या काठावर यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे. यज्ञसेनी देवीचे मंदीर एका बंदिस्त प्रकारात बांधलेले असुन हा प्राकार म्हणजे मंदीराभोवती एक प्रकारची तटबंदी आहे. या तटबंदीच्या चार टोकावर चार बुरुज असुन बाहेर दरवाजा समोर ३० फुट उंच दीपमाळ आहे. या दिपमाळेच्या आत असलेल्या जिन्याने तिच्या माथ्यावर जाता येते. दिपमाळेशेजारी घडीव दगडात बांधलेला मोठा समाधी चौथरा आहे. नदीकाठच्या या मंदिरांची भटकंती करताना नदीच्या दिशेला असलेली कोटाची तटबंदी व त्यातील बुरुज व्यवस्थित पहाता येतात. या मंदीराशिवाय गावात खंडोबा, कालभैरवनाथ, चांगदेव महाराज यांची प्रमुख मंदीरे आहेत. कोटाच्या आत असलेले पुणतांबा गाव व नदीकाठची मंदीरे पाहण्यासाठी साधारण दोन तास लागतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!