PRATAPGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : SATARA

HEIGHT : 3510 FEET

GRADE : EASY

किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान ! शिवाजी महाराजांनी मोक्याच्या ठिकाणी बांधलेल्या या बुलंद किल्ल्याच्या स्थान महात्म्याचे वर्णन करताना महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात हा किल्ला बांधल्याचे म्हटले जाते. अफजलखानरूपाने स्वराज्यावर चालून आलेल्या संकटाचा सामना व नाश शिवाजी महाराजांनी याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वर-महाड रस्त्यावर महाबळेश्वरपासून २०कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या भोरप्या नावाच्या डोंगरावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. प्रतापगडाची समुद्र सपाटीपासून उंची ३५०० फुट असून दोन्ही बाजूस ६०० ते ८०० फुट खोल दरी आहे. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग होतात. दोन्ही भागांत पाण्याची उत्तम सोय असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ४००००चौ.फुट तर मुख्य किल्ल्याचे ४२०००चौ.फुट असून दक्षिणेकडील बुरूज ३० ते ५० फुट उंचीचे आहेत. ... महाबळेश्वर येथुन महाडला जाणारी गाडी कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. प्रतापगडावर असणाऱ्या सोयीसुविधा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गाशरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण गडाच्या महादरवाजाकडे निघतो. या वाटेने गडावर जाताना उजव्या बाजुस गडाची तटबंदी असुन या तटबंदीत जागोजागी शत्रुवर बंदुकीचा अथवा बाणांचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. या वाटेने दरवाजाकडे वळण्याआधी डाव्या बाजुस वळणावरच कातळात कोरलेली एक गुहा आहे. हि गुहा पाहुन काही पायर्याव चढून गेल्यावर आपण तटबंदीत लपविलेल्या गडाच्या पश्चिमाभिमुख महादरवाजात पोहोचतो. प्रतापगडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवकालाप्रमाणे आजही महादरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येऊ नये यासाठी दरवाजासमोरील भागात अरुंद जागा ठेवण्यात आली असुन पायऱ्या बांधल्या आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन यातील उजव्या देवडीत एक तोफ ठेवलेली आहे. दरवाजाने आत शिरल्यावर समोरच लांबवर पसरलेली गडाची सोंड व या सोंडेच्या टोकावर असलेला चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाखालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजुस उंचवट्यावर असलेले अफजलखानाची थडगे नजरेस पडते. टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी यावे. येथून पायऱ्याची वाट गडावर गेली आहे. या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण भवानी मंदिरात पोहोचतो. मंदिरात भवानीमातेची प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. भवानीची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा दगड आणायला मंबाजी नाईक पानसरेला नेपाळ नरेश राजा लीलासेनकडे पाठवले होते. मोरोपंत पेशवे याने ललित पंचमीचा सुमुहूर्त गाठून देवीची स्थापना केली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२० साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी तेथे लाकडी मंडप बांधला. भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना असुन यांचा १९३५मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. भवानी मंदिराच्या आवारात ५-६ लहान तोफा असुन मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. देवळाबाहेर काही अंतरावर मोठी दीपमाळ असुन या दीपमाळेवरच्या खुंट्या हत्तीच्या डोक्याच्या आकाराच्या आहेत. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. त्यानंतर सन १६७४ मध्ये राज्याभिषेकासमयी शिवरायांनी देवीला सोन्याची छत्री अर्पण केली होती. इ.स. १९२९ मध्ये देवीचे दागिने व ही सोन्याची छत्री चोरीला गेली. मंदिरामागील पायवाट आपल्याला गडाच्या या बाजूस असलेल्या टोकावर घेऊन जाते. या ठिकाणी तटाला लागुन कातळात कोरलेला तलाव असुन प्रसंगी गडाबाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. पुढील किल्ला पहाण्यासाठी फिरून भवानीमंदिराकडे यावे. मंदिराकडून बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत उजवीकडे हनुमानाची मूर्ती दिसते. मंदिरापासून शे-दोनशे पायऱ्या चढल्यावर एक लहान दरवाजा असुन या दरवाजाने आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. हा किल्ला बांधला जात असताना एक शिवलिंग सापडले व त्याची स्थापना ह्या मंदिरात केली गेली. माथ्यावर देवळासाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी लहानसा बांधीव तलाव आहे. असे आणखी काही पाणीसाठेही गडावर आहेत. या मंदिरासमोरील पडीक चौथरा प्रशस्त सदरेचा असून कित्येक महत्वाचे निर्णय, न्यायनिवाडे, मसलती या सदरेतच झाल्या. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वाड्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्यावर एक शाळा असुन त्याच्याजवळ वेताळाचे मंदिर आहे. येथे उजवीकडे बागेच्या मधोमध शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५ मी. उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळयाची उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुहेरी तटबंदीने बंदिस्त केलेला यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. या दोन बुरुजांच्या मधील भागात नासके तळे व गोडे तळे असे दोन तलाव आहेत. त्याच्यापुढे सूर्य बुरूज आहे. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी यांनी अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगतो. या गडावरुन पश्चिमेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. त्याच्या पूर्वेला महाबळेश्वरचे विस्तृत पठार, आजूबाजूला घनदाट जंगल, खाली पार घाट व पश्चिमेकडे कोकण आहे. येथे आपली ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात. प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास १६५६ मध्ये चंद्रराव मोऱ्याचा पराभव करुन महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर तिथले किल्लेही महाराजांनी जिंकले. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. शिवाजीमहाराजांनी जावळी खोरे जिंकल्या नंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांनी १६५८ मध्ये भोरप्या डोंगरावर हा बुलंद व अभेदय किल्ला बांधला. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. चढे घोडियानिशी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणीन ! जिंदा या मुर्दा !' अशा वल्गना करीत निघालेला अफजलखान, तुळजापूरच्या भवानीला अन् पंढरपूरच्या विठ्ठलाला उपद्रव देत, स्वराज्याकडे धावला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले. १० नोव्हेंबर १६५९ म्हणजे मार्गशीर्ष शु.७ शके १५८१ रोजी शिवरायांची फत्ते झाली. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केल्यावर महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली पण जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. दूपारी २ वाजता शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. जगाच्या इतिहासात जी अनेक युद्ध झाली त्यातील एक अप्रतीम युद्ध इथे झाले. भौगोलिक परिस्थितीचा फायदा स्वतःच्या बाजूने करुन घेऊन शिवाजीराजांनी त्याच्यापेक्षा काही पटीने बलाढ्य अशा आदिलशाही सेनेचा पूर्ण पराभव केला. प्रतिस्पर्ध्याला काही सुगावा लागु न देता काही तासांच्या लढाईत सगळे संपवले गेले. ह्यावेळी शिवाजीराजाकडे अंदाजे सात हजारांचे सैन्य असेल. ह्या युद्धाने आदिलशाहीला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर राजांनी आदिलशाहीवर केलेल्या चौफेर आक्रमणाने उलटवार करण्याचे त्यांचे बळच खचले. प्रतापगड हा शिवशाहीचा भाग्यमणी ठरला. अफझलखानवधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्यावेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सन १६५७ मधे हा गड बांधल्यापासून ते सन १८१८ मधे इंग्रजांनी तो जिंकेपर्यंत तो अजिंक्य राहिला. ह्याला एकच अपवाद होता तो म्हणजे १६८९ साली काही महिने तो मुघलांकडे गेला होता. पण त्यावेळीही तो जिंकून घेतला नव्हता व लगेच परत मराठ्यांनी तो जिंकुन घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!