PRABALGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : RAIGAD
HEIGHT : 2460 FEET
GRADE : MEDIUM
मुंबई-पुणे प्रवास करताना शंकुच्या आकाराची टेकडी आणि त्याच्याशेजारी प्रशस्त माथा असणारा डोंगर सहजपणे आपले लक्ष वेधुन घेतो. दोन डोंगराची ही जोडगोळी म्हणजेच कलावंतीण दुर्ग व किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड. प्रबळगड व त्याच्या बाजूचा कलावंतीणीचा सुळका हे एका खिंडीने एकमेकांपासुन वेगळे झाले आहेत. प्रबळगडावर जाण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग येथे फाटा आहे. पनवेलवरुन सहा आसनी रिक्षा भाड्याने करुन गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकुरवाडी गावापर्यंत जाता येते. याशिवाय पनवेल ते ठाकुरवाडी अशी बससेवा असली तरी ती फारशी सोयीची नाही. प्रबळगड किल्ला माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागलेला असुन माचीवर कलावंतीण सुळका व प्रबळगडचा बालेकिल्ला आहे. म्हणजे एकप्रकारे कलावंतीण हा देखील प्रबळगडचा बालेकिल्ला आहे. गडाच्या माचीवर २०-२५ घरांची वस्ती असुन वस्तीपर्यंत जाण्यासाठी कच्चा मातीचा रस्ता आहे.
...
२००६ पर्यंत जीपसारखे वाहन या रस्त्याने वस्तीच्या अलीकडे असलेल्या सोंडेपर्यंत जात होते पण २००६च्या प्रलयात हा रस्ता अनेक ठिकाणी वाहुन गेला तो आजवर दुरुस्त झाला नाही. साधारण पाउण तासाच्या वाटचालीनंतर आपल्याला गडाचा एक उध्वस्त बुरुज काही पायऱ्या व त्याजवळ बांधलेला कट्टा दिसतो. या ठिकाणाच्या आसपास कोठेतरी गडाचा पहिला दरवाजा असावा असे वाटते. पायथ्यावरून आलेला कच्चा रस्ता या ठिकाणी संपतो. येथे जवळच कातळात कोरलेली गणेशाची व हनुमानाची मुर्ती असुन या मुर्तीला वंदन करून आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो. येथुन कलावंतीण सुळका नजरेसमोर ठेवत अर्ध्या तासात आपण प्रबळमाची वस्तीवर पोहोचतो. पायथ्यापासुन प्रबळमाचीवर येण्यास साधारण दीड तास लागतो. वस्तीच्या उजवीकडे माचीवर शंकराचे मंदिर आहे. प्रबळमाची गावातून समोरच किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्याची सुंदर नागमोडी पायवाट आहे. या खिंडीपर्यंत जाणारी वाट म्हणजे उभा चढ असुन खिंडीत जाईपर्यंत चांगलाच थकवा जाणवतो. या खिंडीतुन कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. हि संपुर्ण पाउलवाट कातळात कोरलेली असुन या वाटेवर दोन ठिकाणी कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात थोडे प्रस्तरारोहण करावे लागते. सुळक्यावर फारच थोडी जागा असुन कुठलेही अवशेष नाहीत. येथे भगवा झेंडा फडकवलेला आहे. होळीच्या दिवशी माचीप्रबळ गावामधील लोक येथे होळीचा सण साजरा करतात. कलावंतीण सुळका व प्रबळगड यामधील खिंडीतुन प्रबळगडच्या कड्याखालुन प्रबळगडाकडे जाताना डाव्या बाजुस कडयाच्या पोटात एक मानवनिर्मित गुहा असुन तिची लांबी जवळपास २५ फुट आहे. या गुहेला आत काटकोनात वळवले असुन गुहेच्या आत २० X २५ फुट आकाराचे प्रशस्त कोठार आहे. हि गुहा पाहुन सरळ जाणाऱ्या पायवाटेने पाउण तासात आपण प्रबळगडच्या माथ्यावर पोहोचतो. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार असुन या पठारावर मोठ्या प्रमाणात जंगल वाढलेले आहे. गडावर एक गणेशमंदिर व त्यात गणपतीची प्राचीन मुर्ती असुन चार पाच पाण्याच्या टाक्या आहेत. यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. गडाच्या तटबंदीत लहानमोठे अकरा बुरुज व दोन उध्वस्त दरवाजे आहेत. यातील काळा बुरुज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या बुरुजावर मोठया प्रमाणात मळलेल्या चुन्याचा ढीग पडलेला आहे. गडावरील बांधकाम करताना ते अर्धवट राहील्याने हा चुना तसाच राहीला असावा. याशिवाय गडावर तीन-चार वास्तुंची अवशेष असुन एका मोठया वाड्याचे अवशेष आहेत. या वाडयाच्या भिंतीत असलेला लहान दरवाजा आजही त्याच्या कमानीसह शिल्लक आहे. गडाच्या माथ्यावरून फेरी मारताना काही ठिकाणी तुटलेली तटबंदी पहायला मिळती. गडमाथ्यावर असलेले दाट जंगल व कारवीचे रान यामुळे वाटा नीट दिसत नसल्याने शक्यतो वाटाड्या सोबत घ्यावा. गडावरून माथेरानचे विविध पाँईंटस् , मोरबे धरण यांचे सुदर दर्शन होते. गडमाथ्यावरून चंदेरी,पेब, इरशाळ, कर्नाळा,पांडवगड हे किल्ले व पसरत जाणारी नवी मुंबई इतका दूरचा परीसर नजरेस पडतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या प्रबळमाची राहण्याची व खाण्याची सोय होते पण जवळच असलेला मुंबईचा सहवास यामुळे येथे सौजन्यायेवजी व्यावसायीकता वाढीस लागलेली आहे असे खेदाने म्हणावे लागते. येथे होत असलेला धांगडधिंगा पहाता गडप्रेमीनी शनिवार- रवीवार व सुट्टीचे दिवस टाळूनच गडावर जावे. गडावरील शांतता व या शांततेचा अनुभव घेत प्रबळमाचीवरून पाहीलेला सुर्यास्त हे सारे आज लयास गेले आहे. उत्तर कोकणात असलेल्या या किल्ल्याची निर्मिती बोरघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आली असावी. गडावर असलेल्या गुहा पहाता याची निर्मिती सातवाहन काळातच झाली असावी व नंतरच्या शिलाहार, यादवकाळात त्याला लष्करी चौकीचे रूप मिळाले असावे. बहामनी राज्याची शकले पडल्यावर हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या शेवटच्या काळात शहाजीराजांनी निजामशाहीचा वारस उभा करून राज्यकारभार स्वतःच्या ताब्यात घेतला. पण मोगल बादशहा शाहजहान व आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांवर पाठवल्या. १९ जून १६३५ रोजी मुघल सरदार खानजमान जुन्नर व शिवनेरी किल्ला जिंकून दख्खनमध्ये उतरला तर आदिलशाही कडून रणदुल्लाखान उतरला. पावसाळा संपताच खानजमान शहाजीराजांच्या मागावर आला असता शहाजीराजे कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. तेथुन कोकणात उतरल्यावर जंजिऱ्याचा सिद्दी व चौलचे पोर्तुगीज यांनी आश्रय नाकारल्यावर ते जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर म्हणजेच प्रबळगडावर आले. येथे काही दिवस थांबल्यावर खान पाठीशी आल्याचे कळताच त्यांनी माहुली गडाकडे कुच केले. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला व उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले. मोगलांनी हा प्रदेश अदिलशहाच्या ताब्यात दिला. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यावर इ.स. १६५६ मध्ये आबाजी महादेव यांनी कल्याण-भिवंडीपासुन रायरीपर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात आणला. यावेळी मुरंजन किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. यावेळी मुरंजन किल्ल्याचे प्रबळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स. १६५६ मधील पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगडचा सामावेश होता. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडल्यावर मराठ्यानी किल्ल्यावर केलेल्या हल्ल्यात मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. केशरसिंहाची आई व दोन लहान मुले मराठयांच्या हातात सापडली. महाराजांच्या आदेशानुसार त्याना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर केलेल्या खोदकामात बरीच संपत्ती सापडली. शिवकाळात आबाजी महादेव हे या किल्याचे सुभेदार असुन येथुनच उत्तर कोकणाचा कारभार चालत असे. इ.स. १८२८ मध्ये उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर परिसरातील रामोशी लोकांनी ब्रिटिशांविरोधात बंड केले. यावेळी उमाजी नाईक यांच्यासह ३०० लोकांची टोळी तळकोकणात उतरली व त्यांनी प्रबळगडाचा आश्रय घेतला. या वेळी त्यांनी परिसरातील जनतेने ब्रिटिशांना वसुल देऊ नये यासाठी जाहीरनामा काढला. प्रबळगडच्या आश्रयाने या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना अनेक दिवस सळो की पळो करून सोडले पण अखेरीस ब्रिटीश सरकारने हे बंड मोडून काढले.
© Suresh Nimbalkar