PIMPRI PATHAR
TYPE : FORTRESS
DISTRICT : NAGAR
HEIGHT : 0
GRADE : EASY
पुण्याहुन निघोजमार्गे टाकळी ढोकेश्वरकडे जाताना वाटेत पिंपरी पठार नावाचे लहानसे गाव आहे. या गावाचा येथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या गावात आपल्याला काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला एक लहानसा कोट पहायला मिळतो. पुण्याहुन शिक्रापुर-निघोजमार्गे पिंपरी पठार हे गाव ८८ कि.मी.अंतरावर असुन पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन १८ कि.मी. अंतरावर आहे. पिंपरी पठार गावाच्या कमानीतुन आत शिरल्यावर गावाच्या दुसऱ्या बाजुस गावाबाहेर हा कोट आहे. स्थानिकांना हे ठिकाण कोट म्हणुन परीचीत असल्याने त्यांच्याकडे कोट अशीच विचारणा करावी. चौकोनी आकाराचा हा कोट साधारण पाउण एकरवर पसरलेला असुन कोटाच्या चार टोकावर चार बुरुज आहेत. तटबंदीची पुर्णपणे पडझड झालेली असुन आता शिल्लक असलेली तटबंदी हि साधारण ७-८ फुट उंच आहे. हि संपुर्ण तटबंदी ओबडधोबड दगडात बांधलेली असुन ती सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. कोटाचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन त्याची पुर्णपणे पडझड झालेली आहे.
...
या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडे एक विहीर पहायला मिळते. कोटाच्या दक्षिण तटबंदीला लागुन काही घरांचे अवशेष आहेत. कोटाच्या आतील भागात शेती केली जात असल्याने इतर सर्व अवशेष पुर्णपणे नष्ट झालेले आहेत. संपुर्ण कोट फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. कोटाविषयी गावात स्थानिकांना काहीच माहीत नसल्याने कोटाचा इतिहास अबोल आहे. या भागातील भटकंती करताना या कोटासोबत कान्हूर पठार गढी, टाकळी ढोकेश्वर ,निघोज येथील रांजणखळगे देखील पहाता येतील.
© Suresh Nimbalkar