PIMPLADURG

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 3566 FEET

GRADE : MEDIUM

महाराष्ट्रातील अनेक किल्ले त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ठांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्यावरील निसर्गनवलांमुळे प्रसिद्ध आहे. किल्याच्या डोंगरात असणारे नेढे हे सर्वांना परीचीत असलेले निसर्गनवल. अनेक किल्ल्यांवर आपल्याला अशी लहानमोठी नेढी पहायला मिळतात पण महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेढे असल्याच्या मान जातो तो पिंपळा उर्फ़ कंडाळा / कंडाणा या किल्ल्याला. लहानसा चौकीवजा टेहळणीसाठी असलेला हा किल्ला त्यावरील ७० फुट रुंद व ७ फुट उंच आकाराच्या नेढ्यामुळे दुर्गप्रेमीना चांगलाच परीचयाचा आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेला हा किल्ला कळवण या तालुक्याच्या ठिकाणापासुन २५ कि.मी.अंतरावर तर नाशिक शहरापासुन दिंडोरीमार्गे ८५ कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे नाव जरी पिंपळा असले तरी पिंपळे गावापासून हा किल्ला बराच दूर असुन पिंपळे गावापुढील मळगाव बुद्रुक हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. किल्ला दुरून दिसत असला तरी मळगावात पायथ्याशी पोहोचल्यावर तो दिसत नाही. मळगाव गावातील लोक या किल्ल्यास कंडाळा / कंडाणा नावाने ओळखतात. गावाबाहेर असलेल्या लहान बंधाऱ्याच्या काठावर गडावर जाण्यासाठी मळलेली वाट (ढोरवाट) असुन वाट चुकण्याची शक्यता नसल्याने वाटाड्याची गरज नाही. शिवाय किल्ल्याच्या पठारावर एक-दोन घरे असल्याने त्यांची या वाटेवर वहिवाट असते. ... खाजगी वहानाने या बंधाऱ्यावर पोहोचले असता बंधाऱ्याची भिंत रस्त्याला मिळते त्या ठिकाणी एक डोंगर सोंड खाली उतरलेली आहे. येथुनच ऐसपैस पायवाट या डोंगर सोंडेवर जाते. या वाटेने वीस मिनीटात आपण एका पठारावर पोहोचतो व येथुन पिंपळा किल्ल्याचे पहिले दर्शन होते. पठाराच्या वरील टप्प्यावर एक लहान झोपडीवजा घर असुन तेथुनच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. या घराकडे आल्यावर पिंपळा किल्ल्याचे व्यवस्थित दर्शन होते. पिंपळा किल्ल्याचा माथा पुर्वपश्चिम व दक्षिणोत्तर काटकोनात पसरलेला असुन किल्ल्याच्या माथ्याखाली दरीकाठावर कातळाला प्लॅस्टर थापुन त्यात देवीची मुर्ती कोरलेली आहे. या मुर्तीच्या पूजनाला स्थानीक जात असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. पठार व किल्ल्याचा डोंगर एका लहान खिंडीने एकमेकापासुन वेगळे झाले आहेत. या खिंडीत स्थानिकांचा शेंदूर फासलेला वाघदेवाचा तांदळा आहे. येथुन तिरप्या रेषेत कार चढत जाणारी मुरमाड व मातीची वाट आपल्याला किल्ल्याच्या माथ्याखाली आणते व किल्ल्याच्या डोंगरातील प्रशस्त नेढ्याचे दर्शन होते. येथे किल्ल्याच्या माथ्याखाली नेढ्याच्या अलीकडे कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी आहेत. यातील एका टाक्याची साफसफाई करून स्थानिकांनी ते टाके पिण्याच्या पाण्यासाठी वापरात आणले आहे. पाणी काढण्यासाठी पोहऱ्याची गरज आहे. टाक्याच्या उजवीकडे वरील बाजुस अजुन एक नैसर्गिक गुहा असुन या गुहेत जाण्यासाठी काही पायऱ्या कोरलेल्या आहेत. या गुहेचे देखील नेढ्यात रुपांतर होण्याची प्रक्रीया सुरु झाली असुन गुहेतुन वाहणारी हवा थांबविण्यासाठी गुहेचे दुसऱ्या बाजुचे तोंड दगडमाती टाकून बंद करण्यात आले आहे. पाण्याची टाकी व गुहा पाहुन नेढ्यात यावे. पायथ्यापासुन नेढ्यात येण्यासाठी तास-सव्वा तास पुरेसा होतो. नेढ्यात भन्नाट वारा वहात असल्याने गड चढताना आलेला थकवा कोठल्या कोठे पळून जातो व येथुन पाय निघत नाहीत. नेढ्याच्या दर्शनी भागात कातळ फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खळगे कोरलेले आहेत. नेढ्याची उंची कमीजास्त असल्याने कपाळमोक्ष होऊ नये यासाठी सावधगिरीने वावरावे. पावसाळा वगळता १०-१२ जणांना मुक्काम करण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे. नेढ्याच्या डावीकडे किल्ल्याचा पूर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर माथा एकत्र मिळतो त्या बेचक्यातुन माथ्यावर जाणारी वाट आहे. या बेचक्यातुन सोपे प्रस्तरारोहण करत ५ मिनिटात आपण गडमाथ्यावर दाखल होतो. येथे गडाची समुद्रसपाटीपासून उंची ३५६६ फुट आहे. गडमाथ्याची डावीकडील बाजु पुर्णपणे काळ्या कातळाची असुन येथे कातळात कोरलेली पाण्याची कोरडी पडलेली तीन चौकोनी टाकी आहेत. यातील एकाही टाक्यात थेंबभर पाणी नाही. गडाची उजवीकडील बाजु म्हणजे निमुळती सोंड असुन यावर दोनचार खळगे वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. अवशेष नसल्याने गडमाथा पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. माथ्यावरून डोलबारी रांगेतील प्रेमगिरी, साल्हेर-सालोटा,मुल्हेर,मोरा,हरगड हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. माथ्यावरून खाली उतरल्यावर डाव्या बाजूने माथ्याला वळसा घालत पुढे आल्यावर आपण प्लॅस्टर करुन त्यावर कोरलेल्या देवीच्या मूर्तीजवळ पोहोचतो. या मुर्तीच्या उजवीकडे एक शिलालेख कोरलेला असुन त्यावर रंग फासलेला आहे. या शिलालेखात या डोंगराचा उल्लेख कडाज/कंडाळ या नावाने केलेला आहे. शिलालेख पाहुन मागे न वळता पायवाटेने सरळ गेल्यास आपण पुन्हा नेढ्यात पोहोचतो व आपली गडफेरी पुर्ण होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!