PIMPLA
TYPE : NAGARKOT
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
GRADE : EASY
अहमदनगर-बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर पिंपळा नावाचे लहानसे खेडेगाव आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेले हे गाव आष्टी या तालुक्याच्या ठिकाणाहुन खुंटेफळ मार्गे २५ कि.मी. अंतरावर असुन अहमदनगर शहरापासुन टाकळी काझी-आठवड-नांदुरमार्गे ३६ कि.मी.अंतरावर आहे. अहमदनगरहुन पिपळा येथे जाण्याचा दुसरा मार्ग नारायण दोहो- उक्कडगाव –मांडवे असा असुन हे अंतर ३० कि.मी.आहे पण गाडीमार्ग व्यवस्थित नसल्याने पहिला मार्ग जास्त सोयीचा आहे. याशिवाय अहमदनगर-लोणी-धानोरा मार्गे देखील पिंपळा गावात जाता येते. फारसे परीचीत नसलेले हे गाव माझ्या नजरेत येण्याचे कारण म्हणजे या गावाभोवती असलेला कोट व गावातील वाडे. सुबत्ता असल्याने कधीकाळी नगरदुर्गाच्या आत वसलेले हे गाव आज मात्र इतिहासाच्या पानातुन हरवलेले आहे. शिंदे-पवार यासारख्या मातब्बर मराठ्यांचे गावात वाडे असल्याने संरक्षणासाठी या संपुर्ण गावाभोवती तटबंदी व बुरुज होते. काळाच्या ओघात काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली असुन वाढत्या लोकवस्तीने उर्वरीत तटबंदीचा घास घेतला आहे. आज या नगरदुर्गाचा मुख्य दरवाजा, त्याशेजारील दोन बुरुज व काही प्रमाणात तटबंदी शिल्लक आहे. दोन बुरुजात बांधलेला हा दरवाजा पश्चिमाभिमुख असुन दरवाजा समोर जिर्णोद्धार केलेले मारुतीचे मंदिर आहे.
...
दरवाजाची कमान आजही उभी असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या चौकीचे चौथरे आहेत. दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस घडीव दगडात बांधलेला समाधी चौथरा असुन त्यावर शिवलिंग कोरलेले आहे. या चौथऱ्या समोरच दगडी बांधणीतील पेशवेकालीन शिवमंदिर असुन त्यासमोर नंदिमंडप आहे. या शिव मंदीरात दोन विरगळ पहायला मिळतात. याशिवाय गावाच्या पुर्व भागात असलेला कोटाचा दुसरा दरवाजा पडझडीने धोकादायक झाल्याने अलीकडील काळात पाडला गेला. गावात शिंदे -पवार यांचे जुने वाडे असुन तेथे कोणी रहात नसल्याने कुलुपात बंदिस्त झाले आहेत. (पावसामुळे या वाड्यांची छायाचित्रे घेता आली नाहीत). कोटाचा परीसर व वाडे फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar