PIMPALGAON KHADKI

TYPE : NAGARKOT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

मंचर पासुन ५ कि.मी.अंतरावर घोडनदीच्या काठी पिंपळगाव खडकी नावाचे लहानसे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेले हे गाव पुणे शहरापासुन ७० कि.मी.अंतरावर तर मुंबईहुन १८० कि.मी. अंतरावर आहे. पिंपळगाव खडकी येथे जाण्यासाठी मंचर हे सर्वात जवळचे शहर आहे. आज फारसे प्रसिध्द नसलेले हे गाव पेशवेकाळात मात्र एक महत्वाचे ठिकाण होते. होळकरांचे जावई बाबुराव मानाजी वाघमारे-पाटील यांना होळकरांकडुन हे गाव आंदण असल्याने त्यांनी या गावात १०० x १०० फुट आकाराचा भव्य वाडा बांधला तसेच संपुर्ण गावाभोवती तटबंदी उभारली. काळाच्या ओघात त्यांचा वाडा पुर्णपणे नष्ट झाला असुन आज त्याचा केवळ चौथरा शिल्लक आहे. घोडनदी पार करून पिंपळगाव खडकी गावात प्रवेश करताना एखादा भुईकोट किल्ला भासावा असा किल्ल्याचा भव्य दरवाजा नजरेस पडतो. गावाभोवती असलेल्या तटबंदीची पडझड झाली असली तरी हा दरवाजा मात्र आपले सामर्थ्य टिकवून आहे. दोन गोलाकार बुरुजाच्या मध्यात असलेल्या या दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन फांजीवरील बांधकाम मात्र विटांनी केलेले आहे. ... दरवाजाच्या दोन्ही बाजुस शरभ कोरलेले असुन सुशोभीकरणासाठी उठावदार दगडी कमलपुष्प बांधकामात वापरली आहेत. दरवाजाच्या वरील भागात तसेच बुरुजावर विटांनी चर्या बांधलेल्या असुन बंदुकीचा मारा करण्यासाठी बांधलेल्या जंग्या पहायला मिळतात. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन मुख्य दरवाजा बंद असताना ये-जा करण्यासाठी त्यात असलेला लहान दिंडी दरवाजा पहायला मिळतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांना बसण्यासाठी देवड्या असुन आतील बाजूने तटाला लागुन बुरुजावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत. दरवाजा शेजारील घडीव दगडात बांधलेली तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. या दरवाजाने गावात प्रवेश केल्यावर जुनेच पण जीर्णोद्धार केलेले लक्ष्मी नारायण व काळभैरनाथ मंदिर पहायला मिळतात. मंदीरे पाहुन झाल्यावर गावातून सरळ जाणाऱ्या रस्त्याने नदीच्या दिशेने जावे. येथे बाबुराव वाघमारे - पाटील यांची छत्रीवजा समाधी पहायला मिळते. मूळ छत्री केवळ आठ नक्षीदार खांबावरच तोललेली असावी पण नंतरच्या काळात दोन खांबामध्ये विटांचे बांधकाम करून हे बांधकाम बंदीस्त केल्याचे दिसुन येते. बाबुराव वाघमारे - पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अवचितराव वाघमारे - पाटील यांनी उभारलेली हि छत्री म्हणजे मराठा राजपुत बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. या समाधीच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर शिवलिंग व विष्णुपद स्थापन केलेले असुन आत एक मराठी शिलालेख वाचायला मिळतो. त्यावरील मजकुर असा- श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मल्हार राजा नारी लक्ष्मी गौतमा नाम जाता तया उदरली बान्या विराजे I उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . शके १७११ सौम्यनाम संवत्सरे चैत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दिवसी II बाबूरावा व II मानाजी पाटील वाघमारे II मौजे खळकी तर्फ महाळुंगे भार्या उदाबाई II पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पितृ उद्धरणार्थ परलोक साधनार्थ छत्रीचे काम केले असे II अशाच आशयाचा अजून एक शिलालेख आपल्याला नदीच्या घाटाकडे उतरताना असलेल्या दरवाजाच्या वरील भागात पहायला मिळतो. छत्री शेजारी महादेवाचे लहान मंदीर असुन या मंदीरासमोर असलेल्या नंदी मंडपात आपल्याला सुंदर कोरीव नंदी पहायला मिळतो. छत्रीच्या परीसरात आपल्याला वाघमारे – पाटील यांच्या वाड्याचा चौथरा तसेच नगरकोटाच्या तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. छत्रीसमोर काही अंतरावर असलेल्या एका उध्वस्त चौथऱ्यावर शिवलिंग व नंदीमहाराज विराजमान झालेले आहेत. छत्रीच्या मागील बाजुस काही अंतरावर दोन बुरुजात बांधलेला नगरकोटचा दुसरा लहान दरवाजा आहे. या दरवाजावर कोणतेही कोरीवकाम दिसत नाही. छत्री शेजारून वाहात असलेल्या घोडनदीवर अवचितराव वाघमारे–पाटील यांनी सुंदर दगडी घाट बांधलेला असुन छत्रीचा हा परिसर नदीच्या बाजूने तटबंदी बांधून बंदीस्त केलेला आहे. या तटबंदीत नदीच्या घाटावर जाण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. या दरवाजाने पायऱ्या उतरून नदीकाठी घाटावर जाता येते. मघाशी उल्लेख केलेला दुसरा शिलालेख आपल्याला या दरवाजावर पहायला मिळतो. नदीकाठी असलेल्या या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत असुन या तटबंदीच्या दोन टोकावर दोन बुरुज पहायला मिळतात. येथे आपली भटकंती पुर्ण होते. संपुर्ण पिंपळगाव खडकी गाव पाहण्यास एक तास पुरेसा होतो. मल्हारराव होळकर यांना उदाबाई,संतुबाई व खंडेराव अशी तीन अपत्ये होती. त्यातील उदाबाई होळकर यांचा विवाह खडकी पिंपळगाव येथील बाबुराव मानाजी वाघमारे - पाटील यांच्याशी झाला होता. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी उदाबाईस माहेरची चोळीबांगडी म्हणून खडकी पिपंळगाव हे गाव आंदण दिले होते. वाघमारे - पाटील यांनी खडकी पिंपळगाव येथे वाडा बांधला तसेच गावाभोवती संरक्षणासाठी तटबंदी बांधली. पुढे बाबुराव वाघमारे - पाटील यांच्या निधनानंतर उदाबाई व त्यांचे पुत्र अवचितराव वाघमारे - पाटील यांनी त्यांच्या स्मरणार्थ घोडनदीच्या काठी असलेल्या त्यांच्या वाड्याशेजारी त्यांची समाधी उभारली व नदीवर घाटाचे काम केले. त्या आशयाचा शिलालेख आपल्याला समाधीच्या आतील बाजुस व नदीकडील तटबंदीच्या दरवाजावर पहायला मिळतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!