PAVANKHIND

TYPE : BATTLEFIELD

DISTRICT : KOLHAPUR

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले ते तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या तानाजी, मुरारबाजी, बाजीप्रभू या वीरांच्या शौर्याच्या बळावर. या सर्व लढायांना बहुतांशी किल्ल्याची पार्श्वभुमी लाभली आहे पण बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानाला पार्श्वभुमी लाभली आहे ती एका खिंडीची. बाजीप्रभु देशपांडेसह इतर मावळ्यांच्या पराक्रमाने व बलिदानाने पावन झालेली गजापुरची खिंड आज पावनखिंड म्हणुन ओळखली जाते. पन्हाळा ते विशाळगड हे अंतर ६० कि.मी.असुन पन्हाळा-पावनखिंड हे अंतर ४५ कि.मी. तर विशाळगड-पावनखिंड हे अंतर १५ कि.मी.आहे. पांढरपाणी येथुन विशाळगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजुस ५ कि.मी.अंतरावर पावनखिंड आहे. पर्यटन खात्याने थेट या खिंडीपर्यंत रस्ता नेला असुन या ठिकाणी मोठा गोलाकार दगडी बुरुज उभा केला आहे. बुरुजावर चढण्यासाठी तसेच खाली दरीच्या तोंडावर जाण्यासाठी ५०-६० पायऱ्या बांधल्या आहेत. ... येथे कासारी नदीचं उगम असुन ती ओढय़ाच्या रूपान येथे प्रवाहीत होते व पुढे वाहात जाते. या ओढयावर पादचारी पुल बांधण्यात आला असुन खाली दरीत उतरण्यासाठी २०-२५ फूट लोखंडी शिडी लावलेली आहे. दरीच्या तोंडावर ढाल-तलवार अन् भगवा झेंडा याचे लोखंडी स्मारक उभे केलेले आहे. शिडीने २०-२५ फुट खाली उतरल्यावर खिंडीत जागोजागी मोठमोठया शिळा पडलेल्या दिसतात. खिंडीची रुंदी फारतर १५ फुट असावी पण समतल असा भाग दिसुन येत नाही. सर्वत्र शिळांचा खच पडलेला आहे. इतिहासात पावनखिंड म्हणुन हेच ठिकाण प्रसिद्ध आहे. या भागात बऱ्यापैकी झाडी असुन पर्यटनासाठी केलेल्या सर्व सोयीमुळे या रणभुमीची दुर्गमताच नष्ट झाली आहे. पावसाळा व शनिवार-रविवार वगळता येथे फारसे कोणी फिरकत नाही. पावनखिंडीचा रणसंग्राम व बाजीप्रभु देशपांडे यांच्याबद्दल शाळेच्या इतिहासातच माहिती मिळत असल्याने नव्याने काही सांगण्याची गरज नाही. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील वतनदार असणाऱ्या कृष्णाजी बांदलांचे दिवाण व पिढीजात देशपांडे होते. हिरडस मावळ ताब्यात घेताना कृष्णाजी बांदल यांच्या मृत्युनंतर शिवाजी महाराजांनी त्यांचे पुत्र रायाजी बांदल व बाजीप्रभु देशपांडे यांना आपलेसे करून घेतले. अफजलखान वधानंतर कोल्हापुर भागात काढलेल्या मोहिमेत बांदलांचे सैन्य महाराजांसोबत होते. २ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास घातलेला वेढा मुसळधार पावसात सुध्दा चालु होता. पन्हाळाजवळ येणाऱ्या इंग्रजांच्या तोफा व स्वराज्यात घुसलेला शाहिस्तेखान हे दुहेरी संकट पहाता महाराजांनी पन्हाळ्यावरून बाहेर पडण्याची योजना बनवली. तहाची बोलणी,शिवाजी बनुन शिवा काशीदचे सिद्धीच्या छावणीत जाणे यामुळे सिद्धीचे सैन्य गाफील झाले व महाराजांना निसटण्याची संधी मिळाली. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, गुरूवार, रात्रीच्या सुमारास बरोबर ६०० हत्यारबंद पायदळ, घेऊन महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळयावरून निसटले. पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी रायाजी बांदल व त्यांचे ६०० बांदलवीर सोबत घेतले होते. शिवा काशीदच्या बलिदानाचा पहिला अंक संपल्यावर सिद्धी जौहरने सिद्धी मसुद याला महाराजांच्या पाठलागावर रवाना केले. मसुदच्या या घोडदळाने महाराजांच्या सैन्याला पांढरपाणी येथे गाठले. येथे जिंकण्यापेक्षा शत्रुला रोखणे महत्वाचे असल्याने कमी सैन्यानिशी सिद्धी मसुदला रोखण्यासाठी रणभूमी म्हणुन पांढरपाणी जवळ असलेल्या गजापुरच्या खिंडीची निवड करण्यात आली. महाराजांनी ४०० मावळे घेऊन विशाळगडाकडे जाणे व उर्वरित ३०० बांदल मावळे येथे थांबुन खिंड लढण्याचे ठरले. यावेळी रायाजी बांदल यांना महाराजांसोबत पाठवून बाजीप्रभुनी येथे थांबलेल्या मावळ्यांचे नेतृत्व केले. महाराज विशाळगडावर पोहोचल्याचे कळवत नाही तोवर ही खिंड लढवणे व नंतर काढता पाय घेणे हेच बाजीप्रभुंचे व येथे थांबलेल्या मावळ्यांचे ध्येय होते. विशाळगडाला असलेला जसवंतराव दळवी व सुर्वे यांचा वेढा तोडुन महाराज गडावर पोहोचले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना करत चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये मावळे तैनात केले. खिंडीत उतरणाऱ्या मसुदच्या सैन्याबरोबर बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव,व असंख्य बांदलवीरांनी रणकंदन मांडले. अंगाला असंख्य जखमा होऊन देखील बाजीप्रभु देशपांडे व त्यांचे मावळे खिंडीत महाराजांची ढाल बनुन उभे होते. महाराज चार वाजता गडावर पोहोचले त्यावेळी घोडखिंडीत बाजीप्रभू -फुलाजी यांच्या बलिदानाचा दुसरा अंक संपला होता. १३ जुलै १९६०च्या या रणसंग्रामाने गजापुरची खिंड पावनखिंड बनली. या युध्दात बांदलांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे १२०० हून अधिक सैनिक मारले गेले. मावळयांनी फुलाजी व बाजीं यांची पार्थिवे विशाळगडावर आणली. गडावर महाराजांच्या उपस्थितीत रायाजी बांदल यांनी फुलाजी व बाजींच्या प्रेतावर अग्निसंस्कार केले. विशाळगडावर पाताळदरी भागात त्यांची दुर्लक्षित समाधी वृंदावने पहायला मिळतात. पावनखिंडितील हा रणसंग्राम अनुभवायला आयुष्यात एकदा तरी इथे जायलाच हवे. टीप- आज पावनखिंड म्हणुन दाखवली जाणारी जागा हीच रणभुमी आहे का याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!