PATODA BORADE
TYPE : FORTRESS
DISTRICT : JALNA
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. यामुळेच आपल्याला मराठवाडा भटकंती करताना किल्ल्यायेवजी मोठ्या प्रमाणात गढी पहायला मिळतात. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. जालना जिल्ह्यात देखील रोहीलगड व मस्तगड हे दोन किल्ले वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात गढी दिसुन येतात. हे प्रमाण अगदी २० कि.मी. वर एक गढी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. जालना जिल्ह्यातील मंठा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १५ कि.मी.अंतरावर पाटोदा खुर्द गाव असुन महाराष्ट्रात पाटोदा नावाची अनेक गावे असल्याने हे गाव पाटोदा बोराडे म्हणुन ओळखले जाते.
...
गावात प्रवेश करताना दुरूनच उंचावर असलेल्या या गढीची तटबंदी व वरील भागात असलेले आतील प्रवेशद्वार नजरेस पडते. माजी मंत्री बोराडे या गावचे असल्याने पाटोदा बोराडे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आता हे गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत पण पाटोदा बोराडे गढी मात्र त्याला अपवाद आहे. या गढीचे एक वंशज बोराडे हे माजी मंत्री असल्याने त्यांनी हि गढी व्यवस्थित सांभाळलेली आहे. पण आत अनेक नवीन कामे केल्याने गढीचे मूळ स्वरूप मात्र बदललेले आहे. गढीचा एकुण परीसर साधारण अर्धा एकर असुन गढीच्या चार टोकाला असलेल्या चार बुरुजापैकी आज केवळ पश्चिम बाजूचा एकमेव बुरुज शिल्लक आहे. गढीचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन पुर्वी या दरवाजाने आत शिरण्यासाठी ६० पायऱ्या चढाव्या लागत. गाडी गढीत आणण्यासाठी आता हा मार्ग सपाट करण्यात आला आहे. दरवाजाची उंची साधारण १२ फुट असुन दरवाजाचा कमानीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. या कमानीवर खिडकी बांधण्यात आली आहे. दरवाजा शेजारी असलेली तटबंदी कधीकाळी ३५ फुट उंच होती पण आता ती मोठ्या प्रमाणात ढासळलेली असुन काही ठिकाणी नव्याने विटांनी बांधलेली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस असलेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या पुर्णपणे नष्ट झाल्या असुन त्यांचे केवळ चौथरे शिल्लक आहेत. दरवाजाने आत शिरल्यावर समोर प्रशस्त चौक असुन डावीकडे सदरेच्या ठिकाणी नव्याने बांधलेली इमारत आहे तर उजवीकडे घोड्यांच्या तबेल्याच्या ठिकाणी जनावरांचा गोठा आहे. गढीचा दुसरा दरवाजा देखील पुर्वाभिमुख असुन तेथे जाण्यासाठी २५ पायऱ्या चढुन जावे लागते. या दरवाजाच्या दर्शनी भागात नंतरच्या काळात केलेले बांधकाम असुन ते देखील आता मोडकळीस आले आहे. या दरवाजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील भागात विटांची नक्षीदार कमान आहे. या दरवाजाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढलेली असल्याने आत शिरता आले नाही. दुसऱ्या दरवाजा समोरील भाग हे गढीतील सर्वात उंच ठिकाण असुन तेथुन मुख्य दरवाजा व संपुर्ण गावाचा परीसर नजरेस पडतो. गढीतील वंशजांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गढीला पाणीपुरवठा करण्यासाठी आतील बाजुस ६० फुट खोल विहीर होती जी अलीकडील काळात बुजवण्यात आली आहे. हि गढी गावचे वतनदार बोराडे यांच्या मालकीची असुन त्यांचे मूळ आडनाव कदम असे आहे. या गढीचे मूळ मालक कोण हे सांगता येत नसले तरी बोराडे घराण्यातील श्रीमती काशीबाई अप्पासाहेब बोराडे यांना हि गढी मिळाली व सध्या त्यांची पाचवी पिढी या गढीत नांदत आहे. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीची मालकी बोराडे यांची असुन त्यांचे आत वास्तव्य असल्याने त्यांची परवानगी घेणे अगत्याचे ठरते.
© Suresh Nimbalkar