PATANKAR GADHI
TYPE : FORTRESS
DISTRICT : SATARA
HEIGHT : 0
GRADE : EASY
मुंबई – कोल्हापूर रस्त्यावरील उंब्रजपासून २८ कि.मी.वर पाटण हे तालुक्याचे गाव आहे. पाटण परिसरातील किल्ल्याची भटकंती करताना आपल्याला पाटण शहरात यावे लागते पण या पाटण शहरात एखादी भुईकोटवजा गढी असावी याची आपल्याला जराही कल्पना नसते. एखादा भुईकोट शोभावा अशी या शहरातील उंचवट्यावर उभी असलेली वास्तु म्हणजे पाटणकर गढी. पाटण शहराच्या मध्यवर्ती भागात उभी असलेली सरदार पाटणकर यांची हि गढी शिक्केकरी वाडा अथवा शिक्का मेंशन म्हणुन ओळखली जाते. गढीचा परिसर साधारण १.५ एकर परिसरावर पसरलेला असुन सभोवताली भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये सद्यस्थितीत (२०२१) दिसणारे एकुण पाच बुरुज असुन यातील चार बुरुज सुस्थितीत तर एक बुरुज ढासळलेला आहे. या बुरुजांमध्ये तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके तसेच जंग्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीत अजुन एखादा बुरुज असावा पण संपुर्ण तटबंदीला फेरी मारता येत नसल्याने ठामपणे सांगता येत नाही. जमिनीपासुन १५-१६ पायऱ्या चढुन गेल्यावर गढीच्या उत्तराभिमुख दरवाजाने आपला गढीत प्रवेश होतो.
...
दरवाजावरील भाग दुमजली असुन याच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांना रहाण्याच्या देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडे सरदार पाटणकर यांचा दुमजली चौसोपी वाडा असुन वाडयाच्या दर्शनी भागात दोन टोकावर दोन लहान बुरुज बांधलेले आहेत. सध्या या वाडयात पाटणकरांचे वंशज माजी आमदार व मंत्री विक्रमसिंह पाटणकर व त्यांचे कुटुंबीय रहात असल्याने मर्यादित भागातच प्रवेश दिला जातो. वाडयाच्या दुसऱ्या टोकावर वाडयाच्या भिंतीला लागुनच राममंदिर बांधलेले आहे. या मंदिरात इ.स १६५६ साली समर्थ रामदासांनी सरदार चांदजीराव पाटणकर यांना भेट दिलेली प्रभु रामचद्रांची पंचधातूची मुर्ती आहे. मंदीराच्या डावीकडील ओवरीत काही जुनी शस्त्रास्त्रे व चित्रे मांडलेली असुन सरदार भीमराव पाटणकर यांची पगडी व तलवार ठेवली आहे. येथे पाटणकर घराण्याची वंशावळ लावलेली असुन घराण्याची माहीती देणारी कागदपत्रे आहेत. मंदिरातुन बाहेर पडल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला गढीबाहेर घेऊन जाते. वाड्यापर्यंत खाजगी वाहने येण्याकरिता तटबंदी फोडुन हा रस्ता बनवलेला आहे. या वाटेने बाहेर पडुन आपल्याला तटबंदी भोवती फेरी मारता येते. या रस्त्याने आपण प्रवेश केलेल्या पायऱ्या जवळ पोहोचतो व आपली गढीची फेरी पुर्ण होते. साळुंखे उर्फ पाटणकर घराण्याची सुरवात चालुक्य राजाच्या काळापासून सुरू होते. इ.स. १५२६च्या सुमारास गुणवंतगड व दंतगिरी परगण्याचे देशमुखी मिळवलेले चालुक्य कुळातील साळुंखे यांचे वंशज तुकोजी आणि रामराव या बंधुची सातारा व कोकण पट्टय़ातील भागाच्या बंदोबस्ताकरता विजापूर दरबाराच्या वतीने नेमणूक झाली. विजापूरच्या कल्याण सुभ्याहून तुकोजी आपले बंधू रामराव यांच्यासमवेत ५ हजारांच्या फौजेसह स्वारीस निघाले. सर्वप्रथम ते सातारा प्रांती आले आणि त्यांनी पाटण परगणा सर केला. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील धामधूम मोडून त्यांनी आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला. या कामगिरीमुळे आदिलशहाने तुकोजीरावांनी जिंकलेला सर्व प्रदेश त्यांच्या तैनातीला नेमून दिला. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. शिवकाळात पाटणकरांच्या घराण्याला पुढे आणणारे नाव म्हणजे नागोजी पाटणकर होय. संताजी घोरपडे आणि चांदजी पाटणकरांनी दक्षिणेत गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी सरदार पाटणकरांना पाटण महालातील ११ व कराड महालातील १ अशी १२ गावे इनाम दिली होती. पाटणकरांबद्दल असलेल्या या पत्रातुन पाटणकरांची निष्ठा व छञपतींची पाटणकरांप्रती असलेली आपुलकी समोर येते.
© Suresh Nimbalkar