PARWADI

TYPE : GADHI

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे पारवडी किल्ला. अगदी लहान मुलांच्या खेळण्यातील किल्ला वाटावा असा हा किल्ला पुण्याजवळ असुनही फारसा परिचित नाही. सतत उपेक्षित असलेल्या या किल्ल्याची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नाही. चित्रातील किल्ला वाटावा अशा या किल्ल्याची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. पारवडी किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला बारामती तालुक्यातील पारवडी गाव गाठावे लागते. पुणे-पारवडी हे अंतर १०० कि.मी.असुन बारामती- पारवडी हे अंतर १४ कि.मी.आहे. पारवडी गावातील नदीच्या काठावर आजही हा किल्ला मोठया दिमाखात उभा आहे. ... किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता या किल्ल्याची बांधणी शिवकाळा नंतरच झाली असावी. चार टोकाला चार भव्य बुरुज असणारा हा चौकोनी किल्ला साधारण अर्ध्या एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला असुन गडाची लांबी रुंदी १५०x१२५ फुट आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजुंनी तटातुन तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. संपुर्ण किल्ल्याची तटबंदी घडीव दगडांनी बांधलेली असुन तटावरील चर्या मात्र विटांनी बांधलेल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत असल्याने फांजीवरून संपुर्ण गडाला प्रदक्षिणा मारता येते. तटामध्ये बंदुकीच्या गोळ्या मारण्यासाठी जंग्या असुन बुरुजावर बंदुक व तोफांच्या मारगीरीसाठी जंग्या व झरोके ठेवले आहेत. प्रत्येक बुरुजात तटावरच सैनिकांच्या रहाण्यासाठी अथवा दारुगोळा ठेवण्यासाठी तळघर आहेत. तटबंदीवर फेरी मारून खाली उतरल्यावर किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत असलेला गडाचा दुसरा लहान दरवाजा दिसतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत तीन कोठारे असुन तटबंदीच्या आतील बाजुस मोठया प्रमाणात कोनाडे दिसुन येतात. किल्ल्यात फेरी मारताना एका वाड्याचा चौथरा तसेच दोन वास्तुचे अवशेष दिसुन येतात. याशिवाय किल्ल्यात एक विहीर,एक हौद व दक्षिणेकडील तटबंदीत चोरदरवाजा पहायला मिळतो. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गावामध्ये किल्ल्याची माहिती विचारली असता गावडे घराण्याचा किल्ला यापेक्षा जास्त माहिती मिळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!