PARVATGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 3050 FEET

GRADE : HARD

इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड पर्वतगड. पर्वतगड आणि सोनगड हे जोडकिल्ले असुन एका खिंडीने वेगळे झाले आहेत. एक दिवसाच्या भेटीत हे दोनही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नाशिकहून ५०कि.मी.तर सिन्नरहुन केवळ २६ कि.मी. अंतरावर असणारा हा गड सतत उपेक्षित राहिला आहे कारण या गडांची माहिती सहज सापडत नाही. पर्वतगड हा किल्ला भोजापुर गावांमागे सोनगडाशेजारी उभा आहे. स्थानिक लोक पर्वतगडाला पर्वता म्हणुन ओळखतात. आयताकृती आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची पायथ्यापासुन उंची ९५० फुट आहे. ... गडाची लांबी रुंदी १३०० x १००० फुट असुन गडाचे माथ्यावरील क्षेत्रफळ २५ एकरपेक्षा जास्त आहे. सिन्नरपासुन २५ कि.मी.अंतरावर भोजापुर गाव आहे. भोजापुरच्या पुढे ३ कि.मीवर कासारवाडी गाव आहे. या दोनही गावातुन पर्वतगडावर दीड तासात जाता येते. भोजापुर गावातून कासारवाडी गावाकडे जाताना कासारवाडी फाटा येण्यापुर्वी वाटेत एक हनुमान मंदीर आहे. या मंदिरासमोरून उजव्या हाताला जाणारा रस्ता या दुर्ग जोडीकडे जातो. हा रस्ता खुपच खराब असल्याने गाडी वाटेतील दर्गा अथवा शाळेकडेच ठेवावी व शाळेतील नळावरून पिण्याचे पाणी भरून घ्यावे कारण गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गाडी ठेवुन दर्ग्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सोनगड समोर ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण सोनगडा खालील पठारावर येतो. या पठारावर आपल्याला उध्वस्त घरांचे चौथरे दिसुन येतात. यातील एका चौथऱ्यावर एक शिवपिंडी व नंदी ठेवला आहे. या पठारावरून उजव्या बाजूची वाट पर्वतगडला जाते तर सरळ जाणारी वाट सोनगडवर जाते. याशिवाय भोजापूर गावातुन एका सोप्या पायवाटेने सोनगड व पर्वतगड यांच्यामधील खिंडीत येता येते. पठारावरून खिंडीकडे जाताना सर्वप्रथम आपल्याला पाच-सहा बांधीव पायऱ्या लागतात. आपण बरोबर वाटेला असल्याची हि खुण समजावी. या नंतर परत दोन ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढुन पुढे पायवाटेने सोनगडाच्या डोंगराखालून आपण अर्ध्या तासात आपण सोनगड व पर्वतगड यांच्या मधील खिंडीत येतो. खिंडीतून समोरच अस्ताव्यस्त पसरलेला पर्वतगड दिसतो. पर्वतगडावर सहसा कोणी जात नसल्याने मळलेली अशी वाट नाही. खिंडीतून पर्वत गडाच्या उत्तर दिशेला तिरकस वरवर चढत गेल्यावर आपण पर्वतगडच्या भोजापुर गावच्या दिशेने उतरणाऱ्या एका सोंडेखाली येतो. या सोंडेवरून सोपे प्रस्तरारोहण करून आपण पर्वतगडच्या माथ्यावर पोहोचतो. प्रस्तरारोहण करता येणे मात्र गरजेचे आहे. पर्वतगडाला किल्लेपणाच्या कोणत्याही खुणा दिसत नाहीत. माथ्यावर आल्यावर समोरच एक उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या डाव्या बाजुला एक मोठे बांधीव तळे आहे. तळ्याकडे जाताना वाटेत एका ठिकाणी वास्तुचा चौथरा दिसुन येत. गडावर कोणाचाही वावर नसल्याने खूप मोठया प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे असलेले अवशेष गवतात लपले आहेत. तलावाच्या खालील बाजुस उतारावर कातळात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी दिसुन येतात. हि दोनही टाकी शेवाळाने भरली आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. येथुन समोर उंचवट्यावर जाता येते. हा गडाचा सर्वोच्च भाग असुन येथुन संपुर्ण किल्ला व भोजापुर धरण तसेच दूरवरचा प्रदेश दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरतो. हे सर्व पाहुन आल्यावाटेने खाली खिंडीत उतरावे व भोजापुर अथवा सोनगडच्या दिशेने निघावे. इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही. सोनगडच्या पायथ्याशी शाळा व दर्गा असून शाळेत पाण्याची टाकी व नळ असल्याने येथे निवासाची सोय होऊ शकते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!