PARNERA

TYPE : HILL FORT

DISTRICT : VAPI

HEIGHT : 570 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात शिवकाळात व पेशवाईत काही किल्ले बांधले गेले. यात शिवकाळात पुनर्बांधणी झालेला एक किल्ला म्हणजे पारनेरा. या भागात असलेला हा एकमेव उंच डोंगर पहाता किल्ल्याच्या दक्षिण दिशेने वाहणारी पार नदी व तिच्या आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना गुजरात राज्यात सामील झाला. शिवकाळात हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. सध्या या डोंगरावर असलेल्या रामेश्वर,चंडीकामाता व कालिकामाता या मंदिरामुळे हा डोंगर किल्ला कमी आणि व तीर्थक्षेत्र म्हणुन जास्त प्रसिध्द आहे. वापी-वलसाड दरम्यान अतुल रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या किल्ल्याला अतुल हे जरी जवळचे रेल्वेस्थानक असले तरी येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्या अनियमीत असल्याने वलसाड येथे उतरुन तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. ... मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून २ कि.मी. आत असलेला हा किल्ला वलसाडहुन १० कि.मी. तर वापीहुन २४ कि.मी.अंतरावर आहे. या दोन्ही ठिकाणाहुन पारनेरा येथे जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. किल्ल्यावर असलेल्या मंदिरामुळे हा किल्ला दुरूनही सहजपणे ओळखता येतो. पारनेरा किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन या दोन्ही बाजुस किल्ल्यावर येणाऱ्या भाविकांसाठी अलीकडील काळात पायऱ्या बांधल्या आहेत. अतुल रेल्वे स्थानकातुन ३ कि.मी. अंतरावर किल्ल्याखाली असलेल्या डुंगरवाडी गावातील पायऱ्यांनी दक्षिण दरवाजाने आपला गडावर प्रवेश होतो तर वलसाड अथवा मुंबई-अहमदाबाद महामार्गाने आल्यास आपण पारनेरा गावातुन उत्तर दरवाजाने किल्ल्यावर पोहोचतो. पारनेरा गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यावर अगदी शेवटपर्यंत छप्पर घातले आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावरील तटबंदीजवळ पोहोचतो. या तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. उत्तरेकडील या तटबंदीबाहेर रामेश्वर महादेवाचे मंदीर आहे. समुद्रसपाटीपासुन ५०० फुट उंचीवर असलेला निमुळत्या आकाराचा हा किल्ला ३ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला असुन किल्ल्याच्या तटबंदीत उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे दोन दरवाजे आहेत. किल्ल्यावर येणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन किल्ल्याचे दोन्ही दरवाजे तसेच ठेवुन काही अंतरावर तटबंदी फोडुन किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्या दुर्गप्रेमींसाठी नसल्याने डावीकडील वाटेने किल्ल्याच्या तटबंदीला वळसा घालत आपण किल्ल्याच्या उत्तर भागात असलेल्या कमानीदार पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या पहारेकऱ्याच्या देवडीत चांदपीर बाबा यांची कबर आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे चंडीकामाता मंदीर, समोर भक्तांसाठी धर्मशाळा तर उजवीकडे तटबंदी फोडुन वर येणाऱ्या पायरी मार्गाशेजारी तीन मोठया तोफा पडलेल्या आहेत. किल्ला आकाराने लहान असुनही माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागला आहे. चंडिका मंदिरामागे असलेला उंचवटा म्हणजे बालेकिल्ला असुन या उंचवट्याखाली दोन्ही बाजुस असलेली सपाटी किल्ल्याची माची आहे. किल्ल्याची माची तटबंदी व आठ बुरुजांनी संरक्षित केलेली असुन बालेकिल्ल्याला केवळ तटबंदी आहे. चंडीकामाता मंदिरामागे जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. बालेकिल्ल्याचा माथा अरुंद असुन त्यावर मोठया प्रमाणात वास्तु अवशेष आहेत. बालेकिल्ल्याच्या एका भागात दुमजली मोठया वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरून पुर्व दिशेच्या माचीवर खडकात खोदुन त्यावर चुन्याचा गिलावा दिलेली दोन पाण्याची टाकी, तीन बुरुज तसेच किल्ल्याची अखंड तटबंदी नजरेस पडते. बालेकिल्ल्यावरून दूरपर्यंत दिसणारी पार नदी व तिच्या आसपासचा परीसर पहाता संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व लक्षात येते. बालेकिल्ल्याच्या टोकाशी असलेल्या पायऱ्या उतरुन आपला कालिकामाता मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. मंदिराच्या पुढील भागात किल्ल्याचा दक्षिण दरवाजा असुन या ठिकाणी तटबंदीला लागुन मोठया प्रमाणात अवशेष आहेत. किल्ल्याचा हा दरवाजा उत्तराभिमुख असुन याची उंची साधारण ६ फुट आहे. या दरवाजाला बुरुजाचे संरक्षण न देता पुढे आलेल्या तटबंदीचे सरंक्षण दिलेले आहे. दक्षिण दरवाजा पाहुन झाल्यावर परत कालिका मंदिरात यावे व तेथुन पश्चिमेकडील माचीवरून आल्या दिशेला चालण्यास सुरवात करावी. या माचीच्या सुरवातीला खडकात खोद्लेली पाण्याची पाच टाकी असुन यातील एका टाकीला चुन्याचा गिलावा केलेला आहे. या टाक्यावर पुल उभारलेला असुन या पुलावरून आपण माचीच्या पुढील भागात येतो. माचीच्या पुढील भागात एका वाड्याचे अवशेष असुन छप्पर व दरवाजे वगळता हि वास्तु आजही पुर्णपणे उभी आहे. येथुन पुढे सुरवातीला पाहिलेल्या तोफांपाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. पुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. पारनेरा किल्ल्याचा मुळ रचनाकार आज इतिहासाला ठाऊक नसला तरी किल्ल्याच्या डोंगर उतारावरील खडकात कोरलेली पाण्याची टाकी पहाता हा किल्ला प्राचीन काळापासुन अस्तित्वात असावा. १५ व्या शतकात रामनगरच्या कोळी राजांच्या ताब्यात असलेला हा किल्ला १५ व्या शतकाच्या शेवटी गुजरातचा सुलतान महंमदशाह बेगडा याने ताब्यात घेतला. १६ व्या शतकात या किल्ल्याचा ताबा पेंढारींकडे गेला. इ.स. १५५१ मध्ये महंमदशाह बेगडा याच्या ताब्यात असलेले दमण पोर्तुगीजांनी जिंकल्यावर तेथील सैन्याने या किल्ल्याचा आश्रय घेतला. त्यावेळी पोर्तुगिजांनी या किल्ल्यावर हल्ला करत मोठया प्रमाणात नासधूस केल्याने किल्ला ओस पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये हा किल्ला नव्याने बांधून काढला. त्यानंतर मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला इ.स.१७८० मध्ये लेफ्टनंट वेल्सच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सैन्याने जिंकून घेतला. इ.स. १८५७च्या उठावानंतर ब्रिटीशानी मोठया प्रमाणात किल्ल्याची नासधुस करत किल्ला उध्वस्त केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!