PARNER

TYPE : NAGARKOT

DISTRICT : AHMADNAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

अहमदनगर म्हणजे बेलाग किल्ले, सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक गढ्या असणारा जिल्हा. या नगर जिल्ह्यात पारनेर या तालुक्याच्या गावी पारनेरचा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट आहे म्हणण्यापेक्षा होता म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण कधीकाळी पारनेर गाव या कोटात वसले होते पण शहर वाढल्याने किल्ल्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की पारनेर हे तालुक्याचे गाव आहे. कधीकाळी पारनेर गावाचे संरक्षण करण्यासाठी गावाभोवती तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. गावाच्या सर्व बाजूला २ दरवाजे व २० फुटी तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केले होते. आजही पारनेर शहरात किल्ल्याचा २० फूट उंच दरवाजा व त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज पहायला मिळतात. गावात शिवाजी महाराज रोड या रस्त्याच्या दोन्ही टोकाला या भुइकोटाचे दोन दरवाजे व बुरूज केवळ नाममात्र उरले आहेत. ... जामगाव पारनेर रस्त्याने आपण जेथुन पारनेरमध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी या कोटाचा पहिला दरवाजा असुन या दरवाजा समोरच म्हणजे गावाच्या वेशीवरच मारुतीचे मंदीर आहे. या मंदिराच्या आवारातच चार विरगळ अर्धवट गाडलेल्या अवस्थेत दिसुन येतात. कोटाचा दरवाजा नव्याने रंगवलेला असुन या दरवाजाशेजारील एक बुरूज पुर्णपणे नष्ट झालेला आहे तर दुसरा अवाढव्य बुरूज आपले अस्तित्व कसेबसे टिकवून आहे. दरवाजा व बुरूज याच्या उंचीवरून या कोटाची तटबंदी वीस फुटापर्यंत असल्याचा अंदाज करता येतो. कोटाच्या ढासळलेल्या अवशेषांतील पंजात हत्ती पकडलेले शरभशिल्प व एक कोरीव मुर्ती मारुती मंदिराशेजारी उघड्यावरच उनपाऊस खात झिजत पडली आहे.शिवाजी महाराज रोडने कोटाच्या जवळा-पारनेर रोडच्या दिशेला असणाऱ्या दुसऱ्या दरवाजाकडे जाताना वाटेत तीन चार ठिकाणी जुने वाडे व त्यांचे अवशेष दिसतात. कोटाच्या या दुसऱ्या दरवाजाशेजारील दोनही बुरूज शिल्लक असुन यातील एका बुरुजावर बाहेरील बाजुस तीन दगडावर देवनागरी लिपीत कोरलेला एक शिलालेख दिसुन येतो. दोनही बुरुजाच्या बाहेर खालील बाजुस पाणी बाहेर सोडण्यासाठी व्याघ्रमुख बसविलेले आहेत. या दरवाजाच्या बाहेरदेखील समोरील बाजुस कोरीव दगडी खांब असलेले प्राचीन शनी मारुती मंदीर आहे. या मंदिराच्या आवारात देखील एक शरभशिल्प, दोन विरगळ व एक तोफगोळा दिसुन येतो. या दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजुस काही अंतरावर एक दगडी बांधकामातील चौकोनी आकाराची पायऱ्या असणारी बारव असुन या बारवमध्ये देवनागरी लिपीत शके १६८८ असे कोरलेला एक शिलालेख आहे. हि बारव वापरात नसल्याने तिच्यात मोठया प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. या बारवच्या समोरच काही अंतरावर एक दर्गा दिसुन येतो. कोटाच्या मुख्य दरवाजाला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी कोटाच्या दुसऱ्या दरवाजापासून साधारणपणे ३०० फुट अंतरावर परकोट बांधला असुन वाटेवरच परकोटाचा ढासळलेला दरवाजा व त्याशेजारील दहा फुट उंचीचे दोन बुरूज पहाता येतात. या परकोटाच्या समोरच नव्याने बांधलेले गणेशमंदिर आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण कोट पहायला अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!