panhalghar
TYPE : HILL FORT
DISTRICT : RAIGAD
HEIGHT : 620 FEET
GRADE : EASY
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडच का निवडला ह्यामागे अनेक भौगोलिक कारणं आहेत. रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, दौलतगड पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची प्रभावळ असल्याने युध्दशास्त्राच्या दृष्टीने रायगड अधिकच बळकट झाला होता. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. पन्हाळघर दुर्गाची निर्मिती ही नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे शक्य नसले तरी हा किल्ला राजधानीचा उपदुर्ग म्हणुन ओळखला जातो. शिवकाळानंतर अज्ञातवासात गेलेला हा किल्ला पुण्याचे इतिहास संशोधक श्री.सचिन जोशी यांनी २००६ साली नव्याने प्रकाशात आणला. सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या गर्दीत हा लहानसा किल्ला आजही आपले स्थान टिकवून आहे. माणगाव तालुक्यात असलेल्या पन्हाळघरला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे गाव गाठावे लागते.
...
मुंबईहुन लोणेरे गावात शिरताना डावीकडुन एक रस्ता ५ कि.मी.अंतरावरील पन्हाळघर या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात जातो. पन्हाळघर गावाचे खुर्द व बुद्रुक असे दोन भाग असुन पन्हाळघर खुर्द या अदिवासी पाड्यावरून गडावर जाणारी मळलेली वाट आहे. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४८५ फुट आहे. किल्ल्याची उंची जरी कमी असली तरी किल्ल्यावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ आहे. गडाच्या खालील भागात असलेली तटबंदी, बुरुज व दरवाजा पुर्णपणे नष्ट झालेला असुन या वाटेने अर्ध्या तासात आपण एका लहानशा सपाटीवर येऊन पोहोचतो. या सपाटीवर खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी असुन टाक्याच्या पुढील भागात काही प्रमाणात तटबंदीचे दगड पहायला मिळतात. या टाक्यांच्या काठावर बांबू रोवण्यासाठी खळगे दिसुन येतात. टाकी पाहुन पुढे आल्यावर या वाटेचे दोन भाग होतात. एक वाट सरळ वरच्या बाजुला जाते तर दुसरी वाट डावीकडे समांतर वळते. डावीकडील वाटेने कड्याला वळसा मारून सरळ पुढे आल्यावर मातीत बुजलेले अजुन एक टाके दिसते. येथुन वर पहिले असता समोर डोंगर कड्यावर भगवा ध्वज फडकताना दिसतो. हे टाके पाहुन आल्या वाटेने मागे फिरावे व ध्वजस्तंभाकडे जावे. या ध्वजस्तंभाच्या उजवीकडे कड्याला लागुनच कातळात खोदलेले अजुन एक टाके असुन त्याशेजारी मातीत बुजलेले दुसरे टाके आहे. गडावर पाण्याची एकुण ६ टाकी पहायला मिळतात. ध्वजस्तंभाकडून वर जाणारी वाट आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथ्यावर एका वास्तुचा चौथरा व तुरळक तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गडाला फेरी मारत उत्तर बाजुला गेले असता या टोकावर बुरुजाचे अवशेष दिसुन येतात. या बुरुजावरून रायगड किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. बुरुजाशेजारील वाटेने गडाखाली उतरता येते. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. पायथ्यापासुन माथ्यापर्यंत यायला व परत जाण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. पन्हाळघरचा आकार पहाता या किल्ल्यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा उपयोग रायगडाला जाण्याच्या मार्गावर टेहळणीसाठी करण्यासाठी तसेच संदेशवहनासाठी केला जात असावा.
© Suresh Nimbalkar