PANHALEKAJI

TYPE : SHAIV/BUDDHIST/NATHPANTHIY CAVES

DISTRICT : RATNAGIRI

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात असलेले पन्हाळेकाझी गाव येथील कोरीव लेणी समुहांसाठी प्रसिद्ध आहे. पन्हाळेकाझी गावाला किल्ल्याचा ऐतिहासिक तर लेण्यांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. खेड अथवा दापोली या दोन्ही ठिकाणाहुन पन्हाळेकाझी हे गाव साधारण ३० कि.मी.अंतरावर असुन खेडहून आल्यास वाकवली-फणसू मार्गे आपण लेणी समुहाजवळ येतो तर दापोली-दाभोळ मार्गाने आल्यास तेरेवायंगणी-गव्हाणे मार्गे आधी गावात व नंतर लेणी समुहाजवळ पोहोचतो. मुख्य मार्गापासुन या दोन्ही मार्गांनी पन्हाळेकाझी गाव १८ कि.मी.आत असुन रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. कोटजाई नदीच्या काठावर हिरव्यागर्द वनराईत इ.स.तिस-या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत कोरलेला पन्हाळेकाजी हा २९ लेण्यांचा समूह आहे. यातील २९ वे लेणे गौरलेणे नावाने ओळखले जाते. इ.स.१९७०-७१ च्या दरम्यान दापोली तालुक्यात पन्हाळे गावातील केशव पांडुरंग जाधव या शेतकऱ्याला शेत नांगरताना एका दगडी पेटीत काही ताम्रपट मिळाले. ... त्यानंतर दाभोळचे इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्यामार्फत पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या प्राध्यापिका शोभना गोखले यांनी त्याचे वाचन केले. त्यानुसार १९७२ साली पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केल्यावर कोटजाई नदीच्या गाळाखाली लपलेला २८ लेण्यांचा समूह प्रकाशात आला. पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. एन.एम. देशपांडे यांनी या लेण्यांचा अभ्यास करून त्यावर प्रबंध सादर केला. येथे दिलेली माहिती डॉ. एन.एम.देशपांडे यांच्या लेखातील संदर्भाने दिली आहे. सातवाहन काळात कोकणात हीनयान बौद्धपंथाचा प्रसार झाला व अनेक विहार, चैत्यगृहे स्थापली गेली. पन्हाळेकाजी येथील विहार खोदण्याची सुरुवात साधारण २–३ शतकात झाली असावी. या २८ लेण्यांपैकी १,२,३ क्रमांकाची लेणी विहार असून यातील मंडपाचे छतावर मध्यभागी लाकडी बांधकाम दाखवले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस सात बुद्धमुर्ती कोरलेल्या आहेत. ४,५,६,७,८,९ हे विहार या लेणी समुहातील सर्वात जुनी लेणी आहेत. ४ व ५ क्रमांकाच्या गुहा निवासासाठी असुन ५ क्रमांकाच्या लेणीत भिंतीत कोरलेला स्तुप दिसुन येतो. सहा क्रमांकाचे लेणे विहार असल्याचे दिसते. आठव्या शतकाच्या प्रारंभी बौद्ध धर्मातील तांत्रिक वज्रयान पंथाचे वर्चस्व वाढल्यावर हीनयान पंथीय लेण्यात वज्रयान पंथीयांकडून फेरबदल केले गेले. सहाव्या लेणीतील गर्भगृह वाढून विहाराचे रुपांतर अक्षोभ्य मंदिरात केले गेले. ६ व्या लेणीला जोडूनच ७, ८, ९ क्रमांकाची लेणी आहेत. ७ व्या लेण्याच्या खालील बाजुस एक अर्धवट कोरलेले लेणे आहे. लेणी क्रमांक आठच्या गर्भगृहात मस्तकहीन अक्षोभ्याची मूर्ती आहे. १० क्रमांकाची लेणी तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीने महत्त्वाची लेणी असुन यात हत्ती-सिंह असलेल्या सप्तरत अधिष्ठानावर महाचंडरोषणाची मूर्ती पहायला मिळते. महाचंडरोषणाची व अक्षोभाची मुर्ती चालुक्यकालीन असुन दहाव्या शतकातील असावी. लेणी क्रमांक ११, १२ व १३ यातील १२ व्या लेण्याची रचना २ व ६ प्रमाणेच आहे. १४ व्या लेण्याच्या प्रांगणात एका दगडावर पादुका कोरलेल्या असुन प्रवेशद्वाराचे बाजूस सहा-सहा अशी एकूण बारा शिल्पे आहेत. त्यातील पहिल्या चौकोनात छत्राखाली मच्छिंद्रनाथांचे शिल्प असुन त्यांचा डावा हाथ कुबडीवर ठेवलेला आहे तर उजवा हात समोरील स्त्रीकडून वस्तु घेण्यासाठी वर केलेला आहे. डाव्या बाजूच्या मधल्या चौकोनात चौरंगीनाथांची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हातपाय वेगळे दाखवले आहेत. त्याच्या जवळची मुर्ती गोरक्षनाथांची असावी. उर्वरित सर्व मुर्ती वेगवेगळ्या योगी नाथांच्या असुन लेण्याच्या दरवाजावर गणेशमुर्ती कोरलेली आहे. १५ वे लेणे वज्रयानपंथी असुन नंतरच्या काळात याच्या ओसरीत ५ फुट उंच गणपतीची मूर्ती ठेऊन हे लेणे गाणपत्य पूजेसाठी वापरले गेले. या लेण्याच्या ललाट बिंबावर देखील गणेशमूर्ती कोरलेली आहे. १६व्या लेण्याजवळ एक बांधीव चौथरा दिसतो. १७ व १८ वे लेणे बौद्धकालीन असुन १९, २०, २१, २२ व २३ हि लेणी शिलाहार कालीन आहेत. यातील १९ वे लेणे ११ व्या शतकात एकाश्म देवालय म्हणून कोरले गेले. या देवळातील स्तंभ आणि गर्भगृह एकाश्म असून त्यात शिवलिंगाची स्थापना होती. या लेण्यात गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग तर मागील भिंतीत दोन्ही बाजूस समोरासमोर देवकोष्टके आहेत. यावरून हे मंदिर पंचायतन असावे असे वाटते. सभामंडपाच्या छतावर मध्यभागी कमळपुष्प व इतर शिल्पे कोरलेली असून इतर भागात रामायण व महाभारतातील प्रसंगाचे शिल्पपट कोरले आहेत. या लेण्यात एक जोडपे शिवलिंगाची पूजा करत असल्याचे शिल्प कोरलेले आहे. २१ क्रमांकाचे लेणे येथे असलेल्या गणेश मुर्तीमुळे गणेशलेणे म्हणुन ओळखले जाते. २२ क्रमांकाच्या लेण्यात मुखमंडपात गणेश व सरस्वतीच्या प्रतिमा कोरल्या असुन गर्भगृहात नाथपंथीय साधुची मूर्ती कोरली आहे. २३ क्रमांकाचे लेणे अर्धवट घडवलेले मंदिर आहे. २४ ते २८ हि लेणी आकाराने लहान असून यात वेगळे असे काहीच दिसत नाही. यातील २५ क्रमांकाच्या लेण्याच्या प्रांगणात एकाश्म शिवमंदिर कोरले आहे. या लेणीसमूहापासून काही अंतरावर असलेले २९ वे लेणे गौरलेणे म्हणून ओळखले जाते. या लेण्याच्या मध्यभागी पटांगण असून दरवाजासमोर तीन लहान लेणी आहेत. येथील भिंतीत असलेल्या खाचा पहाता या पटांगणावर छप्पर घालण्याची सोय दिसून येते. यातील मधल्या लेण्यात शिवलिंग असुन दरवाजावर गंगा-यमुना शिल्पे आहेत. पटांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत लक्ष्मी, गणेश व सरस्वती मुर्ती कोरलेल्या असुन समोरील भिंतीत गर्भगृह कोरलेले आहे. गर्भगृहाच्या देवकोष्टकात गंगा-यमुना घटासह दाखविल्या असून दरवाजाच्या उजव्या बाजूस सवत्स धेनूशिल्प आहे. लेण्यात प्रकाश येण्यासाठी उजवीकडे भिंतीत चार छिद्रे आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीत एका कोनाडयात माशाचे मच्छिंद्रनाथात रूपांतर झाल्याचा प्रसंग कोरला आहे. इतर भिंतींवर चौकोनात अनेक नाथसाधुंच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. उजवीकडील भिंतीत चतुर्भुज त्रिपूरसुंदरी कोरलेली असुन डावीकडील भिंतीत जटाधारी नाथसिद्धाची मूर्ती कोरली आहे. या लेण्यात लहानमोठी अशी एकूण ८५ शिल्पे कोरलेली असुन ही सर्व शिल्पे बहुतांशी नाथसाधूंची आहेत. संपुर्ण लेणी डोळसपणे पहाण्यासाठी चार तास लागतात. लेण्यासमोर तसेच पन्हाळेकाजी गावात चहापाण्याची सोय आहे. शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता. शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची राजधानी प्रणालकदुर्ग येथे होती. पन्हाळेकाजी लेणी पाहून गावात जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर पन्हाळेकाजी गाव व त्यानंतर प्रणालकदुर्ग लागतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!