PANHALA

TYPE : HILL FORT

DISTRICT : KOLHAPUR

HEIGHT : 3140 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळा. याच्या निर्मितीपासुनच नांदता असलेला हा किल्ला आजही नांदता असल्याने याच्या इमारती आजही त्यांच्या मुल अवस्थेत उभ्या आहेत. वाढत्या लोकसंखेमुळे किल्ला गजबजला आहे इतकेच या किल्ल्याबाबत म्हणता येईल. काही काल मराठयांच्या राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर वसला आहे. पन्हाळा कोल्हापुरकरांचे थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिद्ध असल्याने गडावर रहाण्याची व जेवणाची चांगली सोय आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने व बाजीप्रभु देशपांडे यांच्या घोडखिंडीच्य पराक्रमाने पावन झालेला हा किल्ला एकदा तरी पहावा असाच आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी होता. ... बाजीप्रभुंच्या स्वामीनिष्ठेची आणि शिवछत्रपतीच्या पराक्रमाची गाथा सांगणारा आणि सरक्षणच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना जाग्या होतात. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर हा किल्ला वसला आहे. पन्हाळ्याला साधारण १२०० वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला अशा अर्थाचा शीलालेख सापडला आहे. ह्या राजाचा कार्यकाल सन ११७८ ते १२०९ असा होता. त्याने गडावरील तटबुरूज व इतर बरीचशी बांधणी केली होती. या किल्ल्याची माहिती इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात मिळते. त्याची साक्ष पांडवदरा, पोहाळे येथील लेणी आजही देतात. त्यानंतर हा किल्ला नाग जमातीतील लोकांकडे होता. पराशर ऋषींच्या कर्तृत्वामुळे आणि नागांच्या कीर्तीमुळे यास पन्नगालय (पन्नग=सर्प आलय= घर) असे नाव प्राप्त झाले. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला "पराशराश्रम" या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणाऱ्या कमळांमुळे याला "पद्मालय, पर्णालदुर्ग असे ही म्हटले जाई. ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख "ब्रम्हशैल’ या नावाने आहे.सातवाहन काळाचे अवशेष येथे मिळतात. राष्ट्रकुट , चालुक्य, शिलाहार, भोज, यादव ही राजवटीनी येथे राज्य केले. प्रथम शिलाहारवंशी चालुक्य विक्रमादित्य पाचवा याच्या कालावधीत याची बहीण आक्कादेवी किशूकदू , तुरूगिरी (तोरगल) व म्हसवड या भागाचा कारभार चालवीत होती. या भागाची राजधानी त्यावेळी पन्हाळा ही होती. याचे पूर्वीचे नाव ब्रह्मगिरी व नंतर मुसलमानी राजवटीत शहानबी दुर्ग. पुढे शिवरायांच्या काळात पन्हाळा हे नाव पुन्हा रूढ झाले. शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. शिलाहारांचा देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाच्या ताब्यात गेला. बिदरचा बहामणी सेनापती महमुद गवान यांनी पावसाळ्याच्या कालावधीत १४६९ मध्ये ह्या गडावर हल्ला केल्याची एक नोंद आढळते. मुसलमानी आक्रमणानंतर सन १४८९ मधे हा गड विजापूरकर आदिलशीही अधिपत्याखाली गेला. अली अदिलशहा यांने ह्या गडाचे काही दरवाजे व तटाची दुरुस्ती करून गड आणखी बळकट केला. विजापूरकरांची ही पश्चिमेकडील राजधानी होती. इ.स.२८ नोव्हेंबर १६५९मध्ये अफजलवधानंतर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. यावेळी राजांकडे १५ हजार घोडदळ व २० हजार पायदळ सैनिक होते. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला त्यावेळेस महाराज पन्हाळगडावर जवळजवळ तीन ते साडेतीन महिने अडकून पडले होते. शिवाजी महाराजांनी पन्हाळा गडावरून निसटून गुप्तहेरानी शोधून ठेवलेल्या मार्गे ज्याला ‘राजदिंडी’ म्हणतात त्या मार्गाने विशालगडावर जाण्याचा बेत आखला. शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावंत ६०० मावळ्यांसह गड उतरण्यास सुरवात केली व एका दिशेने शिवा काशीद (प्रति शिवाजी महाराज) जो जवळजवळ महाराजासारखा दिसायचा शत्रूला धोका देण्यासाठी तोही काही मावळ्यांसह गड उतरू लागला. सिद्दी जौहरने शिवा काशीदला पकडले तेव्हा त्याला आपली फसगत झाल्याचे समजले. त्याने शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली तेंव्हा बाजीप्रभू यांनी शिवाजी महाराजांना विशाळगडावर जाण्यास सांगून घोडखिंडित आपला भाउ फुलाजी व ३०० मावळ्यांस मागून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या शत्रूस थोपवून ठेवले. शिवाजी महाराज विशालगडावर सुखरूप पोचल्याची तोफाद्वारे देण्यात येणाऱ्या इशाऱ्यापर्यत बाजीप्रभूं यांनी हि खिंड जवळपास ५ ते ६ तास लढवली. तोफांचा आवाज ऐकूनच जखमी झालेल्या बाजीप्रभुनी प्राण सोडले व त्यांच्या स्वराज्यासाठी सांडलेल्या रक्तांच्या थेबांनी ती खिंड पावन झाली. सिद्दी जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुरकरांच्या ताब्यात दिला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला. इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला. त्याच वर्षी रामचंद्र्पंत अमात्यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी "पन्हाळा" ही कोल्हापूरची राजधानी बनविली. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला. इ.स.१७०९ मध्ये ताराराणींने हा किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंतर १७८२ पर्यंत "पन्हाळा" ही कोल्हापूरची राजधानी होती. इ.स. १८२७ मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. प्रसिद्ध केकावलीकार कवी मोरोपंत पराडकर यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता. राजवाडा :- ताराराणींने इ.स. १७०८ मध्ये हा राजवाडा बांधला. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय ,पन्हाळा हायस्कूल व मिलटरी होस्टेल आहे. जवळच खोकड तलाव आहे. ताराराणी राजवाड्याच्या समोर शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. यात शिवछत्रपतींची अश्वारूढ प्रतिमा असुन त्याच्या शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील गुहा आहेत. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. मंदिरा जवळच सोमेश्वर तलाव आहे. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही सज्जाकोठी ही सदरेची इमारत दिसते. ही दुमजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली. सिद्धी जौहरचा वेढा असताना ह्याच कोठीत शिवाजी महाराजाचे वास्तव्य होते आणि येथेच महाराजांची गुप्त खलबते चालत. या प्रांताचा कारभार पाहताना संभाजीमहाराज देखील ह्या कोठीत वास्तव्यास होते. हि गडावरील महत्त्वाची वास्तू आहे. याच्यावरून आपणास जोतिबाचा डोंगर व पन्हाळा परिसर पहावयास मिळतो. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे म्हणून याला. सोमेश्वर (सोमाळे) तलाव म्हणतात. ह्या मंदिरातील सोमेश्वरास महाराजांनी व त्यांच्या मावळ्र्यांनी लक्ष सोनचाफ्र्यांची फुले वाहील्याचा उल्लेख कवी जयराम पिंडे लिखीत पर्णालपर्वताख्यान या काव्य ग्रंथात येतो. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे. अंबरखाना :-अंबरखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. ज्यावेळी हा बालेकिल्ला बांधायला सुरूवात केली त्यावेळी ते बांधकाम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी तटाच्या पायाशी मनुष्यबळी द्यावा असे राजाला सुचवण्यात आले होते. मग राजाने आजुबाजूच्या गावात दवंडी पिटली की जो कोणी स्वखुशीने बळी जाईल त्याच्या वारसांना जमिन, जायदाद आणि धनदौलत देण्यात येईल. ही दवंडी तेलीवाड्यावरील गंगु तेलीणीच्या कानावर पडली. घरात अठरा विश्वे दारिद्रय असलेल्या गंगु तेलीणीने स्वखुशीने बळी जाण्याचा निर्णय घेतला व तसा तो राजाला सांगितला आणि ती त्याप्रमाणे बळी गेली. बांधकाम पूर्ण केल्यावर भोजराजाने अंबरखान्याच्या बाजूलाच गंगु तेलीणीचे स्मारक बांधले. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. गंगा साधारण नव्वद मीटर लांब,पंधरा मीटर व अकरा मीटर उंच आहे. सिंधू पन्नास मीटर लांब, बारा मीटर रुंद व सहा मीटर उंच आहे तर सरस्वती तीस मीटर लांब, अकरा मीटर रुंद व दहा मीटर उंच आहे. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेऱ्या , दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती. या जवळ शिवाजी महाराजांचा राजमहल होता जो इग्रंजानी १९४४ साली उध्वस्त केला. धान्यकोठाराजवळ एक महादेवाचे मंदिर आहे. यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात. चार दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा वाहतुकीच्या दळणवळणसाठी इंग्रजांनी पाडून टाकला. त्याचे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच ‘शिवा काशीद” यांचा पुतळा आहे. त्याच्याजवळ एक तळे आहे. एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा दोन्ही हातात तलवारी घेतलेला आवेशपूर्ण पूर्णाकृती भव्य पुतळा दृष्टीस पडतो. पुतळ्याच्या भव्यतेकडे पाहून बाजीप्रभुंच्या शारीरिक क्षमतेची कल्पना येते. हे शिल्प जरी प्रेरणा देणारे असले तरी ह्या वीराची व फुलाजी प्रभू ह्या त्याच्या भावाची विशाळगडावरील समाधी मात्र अतीशय दुर्लक्षित स्थितीत आहे. पन्हाळा ओळखला जातो तो लढवय्या व पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे याच्या गाथेने. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यची स्थापना आपल्या ज्या शिलेदारांच्या मदतीने प्रस्थापित केली त्यातील एक बांदल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे एक निष्ठावान सेनापती होते ज्यांनी या स्वराजासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. रेडे महाल :- पन्हाळ गडावर एक भव्य आणि आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुत: ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. पण या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहाता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा. खासांच्या निवासासाठी याची योजना असावी. सध्या तेथे जनता बाझार आहे. रेडे महालाच्या पुढे एक छोटे गढी वजा मंदिर आहे, हे छ. राजारामांचा पूत्र संभाजी(१७१४-१७६०) याचे आहे. मंदिरात शिलालेख आहे, तर मंदिराच्या आवारात विहीर व घोड्याच्या पागा आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात सहा तोफा रांगेने ठेवलेल्या दिसून येतात. संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे. तीन दरवाजा :-हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. यात एकापाटोपाट असे तीन दरवाजे आहेत हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. या दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. याच दरवाजावर श्रीगणेशची मूर्ती असून त्याच्या दोन्ही बाजूला सिंहाच्या पंजात हत्ती असलेली शरभशिल्प कोरलेले आहेत. तसेच पहिल्या दरवाजावर फारशी भाषेतील एक शीलालेख दिसतो. तीन दरवाजातून आत आल्यावर आपणाला विष्णूचौक व विष्णुतीर्थ नावाची विहीर पहावास मिळेल. तीन दरवाजाजवळ हनुमाननाचे मंदिर व त्याकाळीतील मूर्ती आहे. लगतची घुमटी ही दारूखान्याची इमारत आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला तेव्हा याच दरवाजात सोनचाफ्याची फुले उधळून शिवरायांचे स्वागत झाले. व शेवटी याच दरवाजातून इग्रंजानीही आक्रमण केले. तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची काळ्या दगडांची वास्तू दिसते.या वास्तुला अंधारबाव (श्रुंगार बाव) म्हणतात. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. विहिरीतील पाण्याचे स्त्रोत पाण्याची कमतरता भासू देत नसत. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे. गडाच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे.येथे २ बुरुज असून त्यामध्ये खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे. या बुरूजावरून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशेवर नजर ठेवता येते. त्याच्या पलीकडे दिसते ते मसाईचे पठार. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील पांडवलेणी इथून सात मैलावर आहेत. पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आत मध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती म्हणुन यांना पराशर गुहा म्हणतात. पराशर गुहेकडून खाली उतरल्यावर नागझरी हे गडावर बारमाही वाहणारे पाण्याचे दगडात बांधलेले कुंड असुन यातील पाणी लोहयुक्त आहे. याच्यासमोरच विठ्ठल मंदिर असुन खालील अंगाला हरिहरेश्वर मंदिर आहे. पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्याय असलेला बुरुज आहे, त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज म्हणतात. वाघ दरवाजा : हा सुद्धा गडावरील एक कौशल्यपूर्ण बांधकाम केलेला दरवाजा आहे. या दरवाज्यावर टोपीधारक गणपती आहे याच्याजवळ तबक बाग आहे. याला समांतर तत्बंदीतून राजदिंडी ही वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवराय सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. याशिवाय कविवर्य मोरोपंत यांच्या जन्मजागी आज मोरोपंत वाचनालयाची आधुनिक वास्तू उभी आहे. त्यालगतच थोड्या अंतरावर पन्हाळयाची प्रसिद्ध चवदार पाण्याची कापूरबांव नावाची विहीर आहे. गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत. गडावर पायी जाण्याची मजा काही औरच आहे. गडाच्या पायथ्यापासून ते वरच्या चार दरवाजा, तिन दरवाजा, वाघ दरवाजा व राजदिंडीकडे जाणा-या वाटा आहेत. तशाच इतर काही चोरवाटा देखिल आहेत. गडाचा अर्धा तट नैसर्गिक कड्यांनी सुरक्षित झाला आहे. तरी काही ठिकाणचा भाग तट बांधून अधिक सुरक्षित केला आहे. उरलेल्या अर्ध्या भागाला पाच ते दहा मीटर रुंद तटाने घेरले आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!